
प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर कोविडमुळे झालेल्या भयावह परिस्थितीवर कळकळीने बोलणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यासोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ रोहित सरदाना यांचा शेवटचा व्हिडिओ आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओतील व्यक्ती रोहित सरदाना नसून, पत्रकार नवीन कुमार आहेत.
काय आहे दावा?
चार मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एक मास्क लावलेली व्यक्ती कोरोना परिस्थितीवर भाष्य करीत आहे. कोविडच्या काळात सरकार कसे अपयशी ठरले, सगळी व्यवस्था कशी ढासळली, सामान्य माणूस या संकटात कसा एकटा पडला, असे कळकळीने ही व्यक्ती सांगते.
“हिंदु-मुस्लिम, मंदिर-मशीद ही लढाई सोडून आपण आरोग्य आणि शिक्षणाच्या मुद्दावर जोर दिला पाहिजे. का नाही मंदिरातील सर्व संपत्ती कोरोना रुग्णांसाठी खुली केली जात? का नाही सगळ्या मशिदींमध्ये कोविड सेंटर सुरु केले जात? आपल्या पुढच्या पीढीला आपल्याला असे हतबल झालेले पाहायचे नसेल तर या गोष्टीवर विचार करा,” असे ही व्यक्ती म्हणते.
हा व्हिडिओ शेअर करून युजर्स म्हणत आहेत की, रोहित सरदाना यांचा हा शेवटचा व्हिडिओ असून, त्यांनी जाण्यापूर्वी हा संदेश दिला.
तथ्य पडताळणी
व्हिडिओ नीट पाहिल्यावर ‘दो बोल’ असा लोगो दिसतो. त्यानुसार शोध घेतल्यावर या नावाचे एक युट्यूब चॅनेल आढळले. या चॅनेलवर 26 एप्रिल 20201 रोजी प्रसारित झालेला व्हिडिओ आढळला. हा व्हिडिओ आणि व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकसारखाच आहे.
व्हिडिओच्या शीर्षाकातच म्हटले आहे की, हा व्हिडिओ नवीन कुमार नामक पत्रकाराचा आहे. “मौत के मुंह से बाहर आये पत्रकार नविन कुमार ने रोते रोते बयान किया देश का दर्द।” असे या व्हिडिओचे टायटल आहे.
यानंतर फॅक्ट क्रेसेंडो हिंदीने थेट नवीन कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ त्यांचाच आहे. सध्या ते दवाखान्यात उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक शोध घेतल्यावर आर्टिकल 19 इंडिया नावाच्या फेसबुक पेजवर नवीन कुमार यांनी 26 एप्रिल रोजी केलेल्या फेसबुक लाईव्हचा संपूर्ण 35 मिनिटांचा व्हिडिओ सापडला.
या लाईव्ह व्हिडिओतून चार मिनिटांचीय क्लिप एडिट करून फिरवली जात आहे.
रोहित सरदाना यांचे 30 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना नोएडा-स्थित दवाखान्यात भरती करण्यात आले होते.
फॅक्ट क्रेसेंडो हिंदीने ‘आज तक’ वाहिनीकडेसुद्धा या व्हिडिओबद्दल विचारणा केली. त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ रोहित सरदाना यांचा नसल्याचे स्पष्ट केले. हा व्हिडिओ पत्रकार नवीन कुमार यांचाच आहे.
निष्कर्ष
पत्रकार नवीन कुमार यांचा व्हिडिओ चुकीच्या माहितीसह वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचा शेवटचा व्हिडिओ म्हणून शेअर केला जात आहे. वाचकांनी याची नोंद घ्यावी.

Title:रोहित सरदाना यांचा हा शेवटचा व्हिडिओ नाही; जाणुन घ्या व्हिडिओतील व्यक्ती कोण आहे
Fact Check By: Agastya DeokarResult: False
