ऑक्सिजन कमी झाल्यावर मनानेच होमिओपॅथी औषध Aspidosperma Q 20 घेऊ नका; वाचा सत्य

Coronavirus False

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा भीषण तुटवडा जाणवत आहे. अशा आपात्कालिन परिस्थितीमध्ये अशास्त्रीय आणि तद्दन खोट्या घरगुती उपयांचे मेसेज फिरत आहेत. 

अशाच एका मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर Aspidosperma Q 20 नावाचे होमिओपॅथी औषध घेतल्यावर लगेच पातळी सुरळीत होते.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पोस्टमधील दावा खोटा आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही उपाय करू नये.

काय आहे दावा?

व्हायरल मेसेजमध्ये म्हटले की, शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास कुठलीही वाट न पाहता ASPIDOSPERMA Q(mother tincher) किंवा BLATTA ORIENTALIS Q(mother tincher) 20 (drops) थेंब एक कप पाण्यामध्ये घेतल्यास ऑक्सिजन लेव्हल त्वरित  नॉर्मल होते आणि दीर्घ काळ टिकून राहते.  हे एक होमिओपॅथिक औषध आहे! ऑक्सिजन शोधण्यात वेळ वाया घालवू नका.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

Aspidosperma हा फुलांच्या झाडाचा एक प्रकार आहे. होमिओपथीमध्ये या झाडाच्या साली आणि पानांचा वापर औषध म्हणून केला जातो.

इंटरनेटवर शोध घेतल्यावर हेल्थ डेस्क नावाच्या वेबसाईटवरील एक लेख आढळला. त्यात स्पष्ट म्हटले आहे की, हे औषध ऑक्सिजनची पातळी वाढवते याला आधार देणारे पुरेसे पुरावे नाहीत.

आयुष मंत्रालयानेसुद्धा Aspidosperma Q औषधाबाबतचा दावा फेटाळून लावला आहे.

“ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर Aspidosperma Q औषध घेऊन पातळी वाढते हा दावा खोटा आहे. अशा निराधार मेसेजवर विश्वास ठेवू नये. कोविड-19 संबंधी कोणतीही अशास्त्रीय उपचार पद्धती व माहिती शेअर न करण्याचे आयुष मंत्रालयाद्वारे आवाहन करण्यात येत आहे,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर काय करावे याचा निर्णय पूर्णतः डॉक्टरांचा असतो. त्यामुळे मनानेच कोणतेही उपचार करू नये, असेदेखील आयुष मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्रीय पत्र व सूचना मंत्रलयानेदेखील Aspidosperma Q औषधासंबंधाचा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.

“Aspidosperma Q हे औषध ऑक्सिजन पातळी वाढवते हा दावा चुकीचा आहे. या उद्देशासाठी हे औषध घेऊ नये,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, Aspidosperma Q 20 हे औषध ऑक्सिजनची पातळी वाढवते हा दावा खोटा आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध मनाने घेऊ नये.

Avatar

Title:ऑक्सिजन कमी झाल्यावर मनानेच होमिओपॅथी औषध Aspidosperma Q 20 घेऊ नका; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False