Fact Check : केरळमधील attikkad हे इस्लामी गाव, लक्षद्वीपमध्ये 100 टक्के लोक मुस्लीम झाले का?

False राजकीय | Political सामाजिक

जरा केरळ मधे जावुन बघा क़ाय चालू आहे, पाचुची बेटे म्हणून आपण लक्षद्वीपला गौरवतो तिथले सर्वच्या सर्व 36 बेटे 100% मुसलमान वस्तीचे झाले आहे. Indrajeet Patole यांनी ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये केरळमध्ये इस्लामी देश वसविण्यात आला असून मुस्लिमांनी अतिक्कड नावाचे स्वतंत्र इस्लामी गाव वसविल्याचे म्हटले आहे. या गावात संविधान नव्हे तर शरिया कायदा लागू करण्यात आला आहे. शाळा, कॉलेज, मोबाईल, निवडणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. हिंदू, बौध्द, ख्रिश्चनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. मशिदींमधून अरबी भाषेचे शिक्षण देण्यातयेत आहे. गावातील 20 मुल्लीम सिरीयात गेले असून ISIS मध्ये भरती झाले आहेत. असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

केरळमधील attikkad नावाचे गाव अस्तित्वात आहे का? या गावात नेमके काय चालू आहे. लक्षद्वीपमधील स्थिती नेमकी काय आहे, याचा शोध आम्ही घेतला. गुगलवर आम्ही हा शब्द टाकून शोध घेतला असता पत्तीक्कड असे दाखवण्यात आले. 

या परिणामात मिळालेले CNN-News18 या वृत्तवाहिनीचे 14 जुलै 2016 चे वृत्त आम्ही पाहिले. या वृत्तात केरळच्या या गावातून काही युवक बेपत्ता झाल्याचे म्हटले आहे. उत्तर केरळमधील निलामपूर जंगलातील मल्लापूरम जिल्ह्यातील अट्टीकाड या गावात 50 च्या आसपास घरे आहेत. त्यात 200 च्या आसपास लोक राहतात. यात प्रामुख्याने लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. उत्तमरित्या बांधलेली घरे, मोटारसायकली आणि कार असे या गावात पाहावयास मिळते. यमनमधील एका दमाज-सलाफी या समुहाच्या विचारधारेवर या गावातील लोकांचा विश्वास असल्याचे येथील एक गावकरी पत्रकाराला सांगत असल्याचे या व्हिडिओत आपण पाहू शकतो. फोन, टीव्ही आणि गॅजेट्स यापासून हे लोक दूर राहत असून सलाफी ही विचारधारा ते बाळगत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. निवडणूक ही बाब अइस्लामिक असल्याचे हे लोक मानतात. शेती आणि शेळीपालन हा गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय असल्याचे सांगण्यात येते. येथील अनेक जण यमनमध्ये आणि श्रीलंकेत दमाज-सलाफीचे आणि कुराणचे शिक्षण घेण्यास गेल्याचे सांगण्यात येते. हदीस आणि कुराणचे शिक्षण देणारी एक शाळाही या व्हिडिओत दाखविण्यात आली आहे. हा संपूर्ण व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. 

बीबीसीनेही 3 जून 2017 रोजी या गावाबद्दल एक व्हिडिओ बनविल्याचे दिसून येते. त्यांनी या वृत्तात सलफी व्हिलेज अतिक्कड गाव या वृत्तात म्हटले आहे. यात नऊ वर्षापूर्वी इस्लाम मानणाऱ्यांनी मुख्य प्रवाहापासून दूर आपले वेगळे गाव वसविल्याचे म्हटले आहे. या गावातील 20 मुले गायब झाल्यानंतर हे गाव चर्चेत आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे युवक सिरीयातील इसिस या दहशतवादी संघटनेत सामील झालेले आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या युवकांचा आणि गावकऱ्यांचा काहीही संबंध नाही. या युवकांमुळे गावाची बदनामी झाली आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत एका गावकऱ्याने आपण अन्य गावकऱ्यांपासून वेगळे झालो ही आपली चूक असल्याचे म्हटले आहे. हे गाव म्हणजे एक प्लॉप प्रोजेक्ट असल्याचे हा गावकरी म्हणत आहे. समाजात आजही उदारमतवादी मुस्लिमांची संख्या अधिक असल्याचे बीबीसीचे हे वृत्त सांगते. 

सीएनएन-न्यूज18 या गावातील शाळेतील एका शिक्षकाची मुलाखतही आपल्या खालील ग्राउंड रिपोर्टमध्ये दाखवली आहे. यात हा शिक्षक आता शाळेत कोणतेही वर्ग भरत नसल्याचे तेथे कोणतीही मशीद आणि मदरसा नसल्याचे सांगत आहे. या वृत्तात पोलीस या ठिकाणी भेट देत असल्याचेही दिसून येत आहे. 

बीबीसीने 3 जानेवारी 2017 रोजी दिलेल्या वृत्तानुसार या गावात आता केवळ दहा कुटूंब राहिली आहेत. या गावात यमनमधील कट्टरता मानणारे अतिकट्टरतावादी आणि अन्य मुस्लीम अशी फुट पडली आहे. येथील गावकरी यासिर अमानत यांच्या मते आता येथे सर्वधर्मीयांनी राहण्यास यावे. पोलिसांचीही या गावावर करडी नजर आहे. केरळमधील उदारमतवादी मुस्लिमांनी या गावाविरोधात मोर्चा काढल्याचेही या वृत्तात दिसून येते.

बीबीसीचे सविस्तर वृत्तArchive

केरळमध्ये काही मुस्लिमांनी वेगळे गाव वसविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत असले तरी या गावांमध्ये संविधान लागू आहे. वेगळे गाव वसविणे ही देखील आपली चूक असल्याचे त्यांनी मान्य केलेले आहे. या पोस्टमध्ये करण्यात आलेल्या लक्षद्वीपमधील 36 बेटे ही शंभर टक्के मुस्लीमयुक्त झाल्याच्या दाव्याचीही आम्ही पडताळणी केली. विकिपीडियावर आम्हाला लक्षद्वीप बेटाची खालील माहिती दिसून आली.  

विकिपीडिया / Archive

मराठी माती या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार हा द्वीपसमूह 27 बेटांचा बनलेला आहे. त्यातील केवळ 10 बेटांवर मनुष्यवस्ती आहे. लोकसत्ताने (Archive) दिलेल्या एका वृत्तानुसार लक्षद्वीप बेटावरील मिनीकॉय, कावारती, अंद्रोत येथे नौदलाचे तळ आहेत. बित्रा बेटावर नौदलाचा तळ उभारण्यास सरकारने 2014 मध्ये मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र टाईम्सने (Archive) 7 सप्टेंबर 2017 रोजी दिलेल्या वृत्तानुसार लक्षद्वीप समूहातील जैवविविधतेने समृद्ध असलेले ‘पराली १’ बेट किनारा खचल्याने (अपक्षरण) पूर्णपणे नष्ट झाले आहे. किनारा खचण्याची प्रक्रिया सुरू असल्याने या परिसरातील आणखी चार बेटे बुडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. लोकमतने (Archive) दिलेल्या एका वृत्तातही लक्षद्वीप हा २९ लहान-मोठ्या बेटांचा समूह आहे. त्यापैकी निम्म्या बेटांवर आदिम जमातींची वस्ती आहे. लक्षद्वीपचे प्रशासक फारुक खान यांनी याबाबतची माहिती दिल्याचे म्हटले आहे. विकीपीडियावर इंग्रजी भाषेत देण्यात आलेल्या माहितीत लक्षद्वीप बेटांचा समूह हा मुस्लिमबहूल असल्याचे म्हटले असून हिंदू, ख्रिश्चन आणि अन्य धर्मीयांचेही येथे अस्तित्वात असल्याचे दिसून येत आहे.  

विकीपीडिया / Archive

निष्कर्ष 

केरळमधील अतिक्कड हे गाव काही मुस्लीम बांधवांनी निर्माण केले होते. या वसाहतीत शाळा देखील होती. यातील काही तरुण दहशतवादाकडे वळाल्याने हे गांव प्रकाशझोतात आले. या गावात अन्य धर्मीयांना बंदी करण्यात आल्याचे कुठेही म्हटलेले नाही. या गावातील अनेक जण मतभेद झाल्याने गाव सोडून निघुन गेले आहेत. एका गावकऱ्याने ही आपली चूक असल्याचे म्हटले आहे. या गावाला सरकारने स्वतंत्र दर्जा दिल्याचेही स्पष्ट होत नाही. पोलीस यंत्रणा गावात दिसून येते. लक्षद्वीप बेटांचा समूह हा मुस्लिमबहूल असला तरी येथे हिंदू, ख्रिश्चन आणि अन्य धर्मीय नागरिक आहेत. या पोस्टमधील दावे 2016-17 मधील म्हणजेच जुने आहेत. सध्यस्थितीत यातील अनेक दावे असत्य असल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे. 

Avatar

Title:Fact Check : केरळमधील attikkad हे इस्लामी गाव, लक्षद्वीपमध्ये 100 टक्के लोक मुस्लीम झाले का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False