सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी विद्यमान सरकारला कंटाळून राजीनामा दिला होता का?

Mixture राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

गेल्या दोन महिन्यांत चार सनदी अधिकाऱ्यांनी विद्यमान सरकारची धोरणे आणि हस्तक्षेपाला कंटाळून राजीनामे दिले आहेत. दादर-नगर हवेली येथील कन्नन गोपीनाथन यांनी सरकारच्या काश्मीर धोरणाला विरोध करीत वयाच्या 33 व्या वर्षी राजीनामा दिला. सुभाष चंद्र गर्ग यांची कमी महत्त्वाच्या पदावर बदली केल्यामुळे निवृत्तीच्या दोन वर्षे आधीच राजीनामा दिला. कर्नाटकातील एस. शशिकांत सेंठिल यांनी लोकशाहीची गळचेपी होत असल्याची टीका करीत राजीनामा दिला. निती आयोगाचे उप-चेयरमन यांचे अतिरिक्त मुख्य सचिव कशिश मित्तल यांची अरुणाचल प्रदेशमध्ये बदली केल्यामुळे नाराज होत राजीनामा दिला. अशी उदाहरणे समोर असताना यामध्ये आणखी एक नाव समोर येत आहे. ते म्हणजे विदर्भातील किशोर गजभिये यांचे.

सध्या गजभिये यांच्या मुलाखतीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते सरकारच्या धोरणांवर प्रखर टीका करीत आहेत. या व्हिडियोसोबत दावा केला जात आहे की, त्यांनी विद्यमान सरकारवर टीका करीत राजीनामा दिला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये गजभिये विद्यमान सरकारवर टीका करताना म्हणतात की, सरकारचे मंत्री खोटे बोलतात, खोटे आकडे दाखवून विकास दाखविला जात आहे, भीषण दुष्काळ आणि बरोजगारीचे मोठे संकट देशावर आले आहे. अर्थव्यवस्थाच ढासळत असल्याने देशात धोक्याची घंटा वाजत आहे. भाजपने सत्तेत आल्यावर विकासवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी केवळ भारत-पाकिस्तान, मंदिर-मस्जिद अशा भावना भडकाऊ मुद्द्यांना प्राधान्य दिले. नोटबंदी म्हणजे काळा पैसा व्हाईट करण्याचा मोठा स्कॅम होता. या सरकारच्या काळात बँकेचे थकित कर्ज वाढले आहे. लोककल्याणाच्या योजना बंद करण्याचे षडयंत्र सुरू आहे.

व्हिडियोवर लिहिले की, हे आपल्या देशातील कलेक्टर आहेत. त्यांनी राजीनामा दिला.

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये हा व्यक्ती कोण आहे हे दिलेले नाही. त्यामुळे सर्वप्रथम ते कोण आहेत याचा शोध घेतला. यांडेक्सवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडियो किशोर गजभिये यांचा आहे. किशोर गजभिये यांनी काँग्रेसच्या तिकिटावर रामटेक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. 

कोण आहेत किशोर गजभिये?

निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी सर्वप्रथम 2013 साली विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी 2014 साली उत्तर नागपूर मतदार संघातून भाजपच्या डॉ. मिलिंद माने यांना लोकसभेत आव्हान दिला होते. या निवडणुकीमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. विशेष म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या नितीन राऊत यांच्यापेक्षा त्यांनी जास्त मते मिळवली होती.

मग 2018 साली त्यांनी बसपाला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना पक्षातर्फे रामटेक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीतही त्यांच्या पराभव झाला होता.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया

गजभिये यांनी निवृत्ती कधी घेतली?

किशोर गजभिये 1987 बॅचचे सनदी अधिकारी होते. निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले होते. इकोनॉमिक टाईम्सच्या 6 जानेवारी 2010 रोजीच्या बातमीनुसार, गजभिये यांनी त्यासाली स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यांच्या सेवेची सुमारे दहा वर्षे बाकी राहिलेली असतानाच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

मूळ बातमी येथे वाचा – इकोनॉमिक टाईम्स 

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी विद्यमान सरकारवर नाराज होऊन राजीनामा दिला नव्हता. गजभिये यांनी 2010 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. यानंतर त्यांनी 2014 आणि 2019 साली लोकसभा निवडणुकसुद्धा लढविली होती. त्यामुळे ही पोस्ट अर्धसत्य ठरते.

Avatar

Title:सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी विद्यमान सरकारला कंटाळून राजीनामा दिला होता का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Mixture


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •