FACT CHECK: हा व्हिडियो नरेंद्र मोदींच्या यंदाच्या शपथविधीचा नाही. तो 2014 मधील आहे

False राजकीय | Political

लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर करण्यात आला. तीनशेपेक्षा जास्त जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे. त्यामुळे भाजप समर्थकांना आनंद होणे स्वभाविक आहे. सोशल मीडियावर काही उत्साही समर्थकांनी तर मोदींचा दुसऱ्या शपथविधीचा व्हिडियोदेखील शेयर करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी याला खरे मानून लाईक आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची सत्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये

पोस्टमध्ये एका मिनिटाचा व्हिडियो 23 मे रोजी शेयर करण्यात आला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपध घेत आहेत. व्हिडियोवर लिहिले की, मोदींच्या शपथविधीचा व्हिडियो सर्वात आधी आपल्याकडे आला.

तथ्य पडताळणी

पंतप्रधानपदाची शपथ राष्ट्रपती देत असतात. व्हिडियोमध्ये प्रणव मुखर्जी मोदींना शपथ देत आहेत. परंतु, भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत. तेच यंदा पंतप्रधानाची शपथ देणार आहेत. त्यामुळे हा व्हिडियो यावर्षीचा नाही.

इंटरनेटवर शोध घेतला असता हा व्हिडियो 2014 साली मोदींच्या प्रथम शपथविधीचा असल्याचे समोर आले. पंतप्रधान कार्यालयाच्या यूट्यूब चॅनेलवर मोदी शपथ घेतानाचा तीन मिनिटांचा व्हिडियो उपलब्ध आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. पीआयबीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार त्याच दिवशी राष्ट्रपतींनी मोदींच्या मंत्रीमंडळाची नियुक्ती केली. यामध्ये 23 केंद्रीय मंत्री आणि 12 केंद्रीय राज्यमंत्र्यांचा समावेश होता. संपूर्ण यादी येथे पाहा – पीआयबी

तेव्हाच्या शपथ समारोहाचा फोटो तुम्ही खाली पाहू शकता.

मग यंदा पंतप्रदानांचा शपथविधी कधी आहे?

विजेत्या भारतीय जनता पक्षाने अद्याप मोदींच्या शपथविधीची तारीख अधिकृतरीत्या घोषित केलेली नाही. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, 28 ते 30 मेदरम्यान हा सोहळा होऊ शकता. गेल्यापेक्षा अधिक भव्य स्वरुपात यंदाचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळत आहे. या सोहळ्याला अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड आणि फ्रान्स अशा पी-5 देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केले जाणार असल्याची शक्यता आहे.

मूळ बातमी येथे वाचा – झी बिझनेसअर्काइव्ह

निष्कर्ष

पोस्टमधील व्हिडियो यंदाचा नसून 2014 साली मोदींच्या प्रथम शपधविधीचा आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:FACT CHECK: हा व्हिडियो नरेंद्र मोदींच्या यंदाच्या शपथविधीचा नाही. तो 2014 मधील आहे

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False