चीनी हॅकर्समुळे व्हॉट्सअ‍ॅप डीपी न ठेवण्याचा तो मेसेज खोटा आहे. वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

भारत आणि चीनचे संबंध ताणल्यानंतर सोशल मीडियावर फेक मेसेजचा ऊत आला आहे. आता दिल्ली पोलिस आयुक्तांच्या नावाने मेसेज फिरतोय की, आयसीस आणि चीनी हॅकर्स भारतीय युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप डीपी चोरून त्याचा गैरवापर करणार आहेत. त्यामुळे काही दिवस व्हॉट्सअ‍ॅपवर प्रोफाईल फोटो ठेवू नये.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हा मेसेज पूर्णतः खोटा असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे मेसेजमध्ये?

isisi.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील व्हायरल मेसेजमध्ये दोन प्रमुख बाबी आहेत. एक म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपच्या सीईओने ही माहिती दिली आहे आणि दिल्ली पोलिस आयुक्त ए. के. मित्तल यांनी जनतेला त्याप्रमाणे आवाहन केले आहे.

पण दिल्लीच्या विद्यमान पोलिस आयुक्तांचे नाव एस. एन. श्रीवास्तव आहे. दिल्ली पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर शोध घेतला असता ए. के. मित्तल नावाचे कोणताही अधिकारी पोलिस आयुक्त झाले नसल्याचे आढळले.

शिवाय मेसेजमध्ये दिलेला मोबाईल क्रमांकदेखील बंद आहे. ट्रुकॉलर या अ‍ॅपवर हा क्रमांक अरशद अली यांचा असल्याचे दिसते. परंतु, तो क्रमांक स्पॅम म्हणून दाखवण्यात येतो.

व्हॉट्सअ‍ॅपतर्फेदेखील अशी माहिती देण्यात आलेली नाही. सदरील मेसेज व्हायरल होऊ लागल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपचे संपर्कप्रमुख कार्ल वूग यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, “सदरील मेसेजमधील माहिती निव्वळ अफवा आहे. आमचे तंत्रज्ञान हॅकर्सच्या हल्ल्यापासून सुरक्षा करण्यास सक्षम आहे.”

विशेष म्हणजे हा मेसेज 2016 पासून इंटरनेटवर पसरविला जात आहे. त्यावेळी या मेसेजमध्ये केवळ आयसीसचा उल्लेख होता. आता यामध्ये चीनी हॅकर्सची भर घालून जुनाच मेसेज व्हायरल केला जात आहे.

मागे 2016 मध्ये जेव्हा हा मेसेज फिरत होता तेव्हादेखील तो खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. इंडियन एक्सप्रेसने याबाबत बातमीदेखील प्रसिद्ध केली होती. या मेसेजकडे दुर्लक्ष करण्याचे त्यात म्हटले होते.

inxe.png

मूळ बातमी येथे वाचा – इंडियन एक्सप्रेसअर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, दिल्ली पोलिस आयुक्तांच्या नावे खोटा मेसेज व्हायरल होत आहे. आयसीस व चीनी हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅप डीपीचा गैरवापर करणार असल्याचा मेसेज अफवा आहे. 

तरीदेखील व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईल पिक्चरची (डीपी) काळजी असेल तो कोण पाहू शकतो हे आपण ठरवू शकतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जा. मग अकाउंटमध्ये प्रायव्हसी पर्याय निवडा. तेथे प्रोफाईल फोटोवर क्लिक करा मग ‘माय कॉन्टॅक्ट’ किंवा ‘नोबडी’ हा पर्याय निवडू शकता. 

Avatar

Title:चीनी हॅकर्समुळे व्हॉट्सअ‍ॅप डीपी न ठेवण्याचा तो मेसेज खोटा आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •