
नवी दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेत मान्यवर राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधानांनी हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये नेदरलँडच्या पंतप्रधानच्या हातून कॉफी पडल्यावर ते स्वत: फरशी पुसताना दिसतात.
दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ नवी दिल्लीच्या जी-20 शिखर परिषदेदरम्यानचा आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ जी-20 शिखर परिषदेतदरम्यानचा नाही. जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह पसरविला जात आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओ शेअर करताना युजर्स लिहितात की, “New Delhi, 10/9/2023, डचचे प्रधानमंत्री ह्यांच्या हातून कॉफी चा कप पडला, त्यावर त्यांनी काय केले बघा.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ पाच वर्षांपूर्वीचा आहे.
युरोन्यूजच्या वेबसाईटनुसार, 5 जून 2018 रोजी नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे संसदेत जात असताना त्यांच्या हातातून कॉफीचा कप खाली पडला. यानंतर पंतप्रधान रुटे यांनी स्वतःच मॉप (सफाई करण्याचा पोछा) हाती घेऊन त्या ठिकाणी सफाई केली होती.
तसेच यावेळी पंतप्रधान रुटे यांनी डच संसदेतील सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुकदेखील केले होते.

युरोन्यूजच्या युट्यूब चॅनलवरदेखील हा व्हिडिओ उपलब्ध आहे.
G20 शिखर परिषद
नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे 9 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील G20 शिखर परिषदेसाठी भारत मंडपम येथे पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले होते.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, डच पंतप्रधानांकडून कॉफी पडल्यावर फरशी पुसतानाचा व्हिडिओ पाच वर्षांपूर्वीचा आहे. ही घटना दिल्लीच्या जी-20 शिखर परिषदेत घडली नव्हती. चुकीच्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:नेदरलँडच्या पंतप्रधानांनी जी-20 दरम्यान स्वतःच फरशीवर सांडलेली कॉफी पुसली का?
Written By: Sagar RawateResult: Missing Context
