
जी-20 शिखर परिषदेदरम्यान दिल्लीत रस्त्यावरील गरीब वस्त्यांना हिरव्या कपड्यामागे लपविण्यात आले, या दाव्यासह एक फोटो व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती व्हायरल फोटो दिल्लीचा नसून, मुंबईतील आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये इमारतीला हिरव्या कपड्याने झाकलेले दिसते आणि त्यावर जी-20 शिखर परिषदेची पोस्टर दिसत आहे.
युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये “तुम्ही #G20Summit2023 साठी घाणेरडे फूटपाथ कव्हर करू शकता…पण तुम्ही गरिबी कशी लपवाल? पंतप्रधान..??”

मूळ पोस्ट – ट्विटर
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर नेशनल हेराल्ड इंडिया या वेबसाईने 17 डिसेंबर 2022 रोजी हा फोटो प्रकाशित केल्याचे आढळले. फोटोसोबत दिलेल्या माहितीनुसार जी-20 च्या कार्यक्रमापूर्वी मुंबईमध्ये महापालिका अधिकाऱ्यांनी झोपडपट्ट्यांसमोर हिरवा कपडा लावून त्या लपविण्याचा प्रयत्न केला होता.

मूळ पोस्ट – नेशनल हेराल्ड इंडिया
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) देखील स्पष्ट केले की, व्हायरल फोटो गेल्यावर्षीच्या मुंबई जी-20 शिखर परिषददरम्यानचा आहे. सध्याचा दिल्लीच्या शिखर परिषदेशी या फोटोचा काही संबंध नाही.
दिल्लीत हटविण्यात आलेल्या झोपडपट्ट्या
जवळच G-20 शिखर परिषदेचे आयोजन होत असल्यामुळे दिल्लीच्या जनता शिबिर झोपडपट्टीतील रहिवाशांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले होते.
दिल्ली उच्च न्यायालयात या विरोधात अपील करूनदेखील शेवटी शेकडो लोकांना बेघर व्हावे लागले, ज्या लोकांनी बेकायदेशीरपणे भूभाग ताब्यात घेतलेला आहे, त्यांना मे महिण्याच्या अखेरीस जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. 7 सप्टेंबर रोजी बेकायदेशीररीत्या संपादित केलेल्या भूभाग विरोधात अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला फोटो नुकतेच दिल्लीमध्ये झालेल्या जी-20 शिखर परिषदेशी संबंधित नाही. हा फोटो गेल्या वर्षीच्या मुंबई जी-20 शिखर परिषदेचा आहे. चुकीच्या दाव्यासह जुना फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:रस्त्यावरील झोपडपट्टी झाकण्याचा फोटो दिल्ली जी-20 शिखर परिषदेचा नसून मुंबईचा आहे; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Misleading
