तथ्य पडताळणीः अक्षय कुमारने शहिदांसाठी दीड दिवसांत 7 कोटी रुपये जमविले का?

Mixture राष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

(Image is for representation purpose only. Source: The Indian Express)

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या कुटुंबियांना देशभरातून भरभरून आर्थिक मदत करण्यात आली. यामध्ये अनेक सेलिब्रेटींनीदेखील स्वतः पुढे होऊन लोकांना देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

याबाबतीत सिनेअभिनेता अक्षय कुमार नेहमीच आघाडीवर असतो. पुलवामा हल्ल्यानंतरही त्याने शहिदांना मदत करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, अक्षयच्या दानशूरपणाची प्रचिती देणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या.

या बातम्यांनुसार, अक्षय कुमारने शहिदांसाठी केवळ दीड दिवसांत 7 कोटी रुपयांची मदत जमा केली. फॅक्ट क्रेसेंडोने या बातमीची पडताळणी केली.

लोकसत्ताने वरील बातमी फेसबुक पेजवरून 17 फेब्रुवारी रोजी सर्वप्रथम पोस्ट केली होती. या बातमीला पडताळणी करेपर्यंत 1700 पेक्षा जास्तवेळा शेयर करण्यात आले. तसेच स्टार मराठी या संकेतस्थळानेदेखील अशीच बातमी दिली होती.

अर्काइव्ह

लोकसत्ताच्या बातमीमध्ये शीर्षकाप्रमाणे स्पष्ट म्हटले की, अक्षय कुमारने शहिदांसाठी तब्बल सात कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. भारत के वीर या अ‍ॅपच्या माध्यमातून अक्षयने दीड दिवसांत एवढी आर्थिक मदत जमा केली. एवढेच नाही तर त्याने स्वतः या निधीमध्ये पाच कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. तसेच अक्षय कुमारने 2017 मध्ये भारत के वीर या अ‍ॅपची सुरवात केली.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ताअर्काइव्ह

लोकसत्ताने हे वृत्त पीपिंगमून या संकेतस्थळावरील बातमीच्या आधारावर दिलेले आहे. इंग्रजीमधील मूळ बातमी येथे वाचा – पीपिंगमूनअर्काइव्ह

स्टार मराठीने दिलेल्या बातमीमध्येही वरील दावा करण्यात आला आहे. ती मूळ बातमी येथे वाचा – स्टार मराठीअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रसेंडोने सर्वप्रथम भारत के वीर हे अ‍ॅप/पोर्टल कोणाचे आहे याचा शोध घेतला. भारत सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे हे वेब पोर्टल/अ‍ॅप सुरू करण्यात आले होते. ‘भारत के वीर’ ही एक विश्वस्त संस्था आहे. केंद्रीय निमलष्करी दल, बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एनडीआरएफ, एनएसजी, एसआयबी आणि आसाम रायफल्सच्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना या माध्यमातून मदत केली जाते.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सीआरपीएफच्या शौर्य दिनानिमित्त 9 एप्रिल 2017 रोजी हे पोर्टल लाँच केले होते. गृह खात्याने तशी रीतसर प्रेसनोटदेखील काढली होती. म्हणजे भारत के वीर हे केंद्रीय गृह खात्याचे पोर्टल/ अ‍ॅप आहे. त्याची अधिकृत वेबसाईट – http://www.bharatkeveer.gov.in  – ही आहे.

मग अक्षय कुमारचा याच्याशी काय संबंध?

अक्षय कुमारने शहिदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी अशा प्रकारच्या पोर्टलची कल्पना सरकारला सुचविली होती. भारत के वीर वेबसाईटच्या लाँचप्रसंगी खुद्द अक्षय कुमारने प्रमुख पाहुणा या नात्याने यामागची कहाणी सांगितली. आपल्या भाषणात त्याने सांगितले की, एका माहितीपटात दहशतवादी संघटना कशाप्रकारे मृत पावलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करतात हे दाखविले होते. त्यावरून मला एक कल्पना सुचली की, आपणही जवानांच्या कुटुंबियांना थेट मदत करण्यासाठी पर्याय उपलब्ध केला पाहिजे, जेणेकरून सामान्य नागरिकदेखील मदत करू शकतील.

पीआयबी इंडियाच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर अक्षय कुमारचे हे भाषण पाहू शकता.

त्याचप्रमाणे गृह खात्याच्या अधिकृत प्रेसनोटमध्येदेखील अक्षय कुमारने हे पोर्टल विकसित करण्याची कल्पना सुचविल्याचे म्हटले आहे. त्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह आणि गृहसचिव राजीव मेहर्षी यांनी अक्षय कुमारला धन्यवाद दिले. तसेच अक्षय कुमार हा भारत के वीर ट्रस्टचा सात विश्वस्तांपैकी एक आहे. मात्र, भारत के वीर हा भारत सरकारचा उपक्रम आहे.

मूळ प्रेसनोट येथे वाचा – पीआयबी

यावरून हे सिद्ध होते की, भारत के वीर पोर्टल/अ‍ॅप गृह खात्याअंर्गत येते. त्यामुळे भारत के वीरच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम अक्षयने गोळा केली, हे विधान असत्य ठरते. ती रक्कम लोकांनी दिलेली असते.

मग दीड दिवसांत 7 कोटी जमा झाले का?

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 पेक्षा जास्त सीआरपीएफचे जवान शहिद झाले. या घटनेने हादरून गेलेल्या देशवासियांनी हल्ल्यात मरण पावलेल्या जवानांच्या कुटुंबियांना सढळ हाताने मदत केली.

राष्ट्रीय मीडियाने पीटीआयच्या आधारावर 16 फेब्रुवारी रोजी दिलेल्या बातमीनुसार, हल्ल्यानंतर केवळ 36 तासांच्या आतमध्ये भारत के वीर या पोर्टलच्या माध्यमातून सुमारे 7 कोटी रुपयांची मदत जमा झाली होती. बीएसएफचे महानिरीक्षक अमित लोढा यांनी पीटीआयला ही माहिती दिली होती.

मूळ बातमी येथे वाचा – मनीकंट्रोलअर्काइव्ह

तसेच महाराष्ट्र टाईम्सनेदेखील अशी बातमी दिली आहे की, ‘भारत के वीर’ या वेबसाइटच्या माध्यमातून गेल्या ३६ तासांत सात कोटींचा मदतनिधी जमा झाला आहे. मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स

म्हणजे 36 तासांमध्ये (दीड दिवस) खरंच भारत के वीरच्या माध्यमातून 7 कोटी रुपये मदतनिधी जमा झाला होता. पण तो अक्षय कुमारने जमा केला असा कुठेही उल्लेख नाही.

राहिली गोष्ट अक्षय कुमारने 5 कोटींची मदत केल्याची तर याची कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती उपलब्ध नाही. अनेक वृत्तस्थळांनी अक्षय कुमार शहिदांना 5 कोटी रुपये देणार असल्याचे म्हटले आहे, मात्र त्याचा कोणताही पुरावा दिलेला नाही.

हिंदुस्थान टाईम्सने 18 फेब्रुवारीला दिलेल्या बातमीत अक्षय कुमार शहिद जवानांच्या कुटुंबियांसाठी 5 कोटी रुपये देणार असे म्हटले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीवर त्यांनी ही बातमी केली आहे. ते सूत्र कोण? येथे सांगितलेले नाही. तसेच तो पाच कोटी देणार म्हटले आहे, दिले असे म्हटलेले नाही.

मूळ बातमी येथे वाचा – हिंदुस्थान टाईम्सअर्काइव्ह

ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विटरवर घोषित केले होते की, ते शहिद झालेल्या जवानाच्या कुटुंबियांना ते प्रत्येकी 5 लाख रुपये म्हणजेच एकुण 2.5 कोटींची मदत करणार आहेत. तसे अक्षय कुमारने स्वतः किती मदत केली याची घोषणा केलेली नाही.

अर्काइव्ह

अक्षय कुमारने ट्विटरवरून भारत के वीर या पोर्टलच्या माध्यमातून जितकी होईल तितकी मदत करण्याचे देशवासियांना आवाहन केले होते.

अर्काइव्ह

पडताळणीत आम्हाला हिंदुस्थान टाईम्सची एक बातमी आढळली, ज्यामध्ये अक्षय कुमारने राजस्थानमधील सुंद्रावली, भरतपुर येथील शहिद जवान जीतराम गुर्जर यांच्या पत्नीला 15 लाख रुपयांची मदत केल्याचे म्हटले आहे.

शहिद जवान जीत यांचे लहान भाऊ विक्रमसिहं यांनी या मदतीसाठी अक्षय कुमारचे आभार मानले. “आमची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. माझा भाऊ जीत याच्याच कमाईचा आम्हाला आधार होता. अक्षय कुमार यांनी निकडीच्या वेळी मदत केल्याने खूप पाठबळ मिळाले.

मूळ बातमी येथे वाचा – हिंदुस्थान टाईम्सअर्काइव्ह

निष्कर्ष

पुलवामा हल्ल्यानंतर खरंच दीड दिवसांत 7 कोटी रुपयांची भारत की वीरच्या माध्यमातून मदत जमा झाली होती. मात्र, भारत के वीर हा केंद्रिय गृह मंत्रालायचा उपक्रम आहे. अक्षय कुमार यांनी केवळ भारत के वीरची कल्पना सुचविली होती. त्यामुळे त्यातून जमा झालेला निधी त्यांनी गोळा केला, असे म्हणता येत नाही. त्यामुळे लोकसत्ताची ही बातमी अर्धसत्य आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणीः अक्षय कुमारने शहिदांसाठी दीड दिवसांत 7 कोटी रुपये जमविले का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: Mixture


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •