मोदींना दागिने चोरताना पकडल्यामुळे घराबाहेर काढण्यात आले होते? वाचा सत्य

False राजकीय राष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी त्यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याची पोस्ट फिरत आहे. या पोस्टमध्ये अमर उजाला या हिंदी दैनिकाच्या वेबसाईटवरील बातमीचा दाखला देत म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी संन्यास घेतला नव्हता. ते तर घरातून दागिने चोरी करताना पकडले गेले होते. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढण्यात आले होते. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

अर्काइव्ह

मारूती भुजबळ या युजरने वरील पोस्ट 23 मार्च रोजी शेयर केली होती. सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत लिहिले की, घरातले दागिने चोरून पळून जाणारा आज चौकीदार झालाय.

तथ्य पडताळणी

या पोस्टमध्ये अमर उजालाच्या वेबसाईटवरील बातमीचे कात्रण आहे. 2 जून 2016 रोजीच्या या बातमीत म्हटले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी एक खळबळजनक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी संन्यास घेतल्याची गोष्ट खोटी आहे. खरं तर घरी चोरी करताना मोदी पकडले गेले होते. त्यामुळे त्यांना घरातून काढून देण्यात आले. यानंतर त्यांची गुजरातमधील एका कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनसोबत भेट झाली. या डॉनने मोदींना त्यांच्या घरात आसरा दिला. पंतप्रधान कार्यालयाने या संबंधी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

सर्वप्रथम आम्ही या बातमीची सत्यता तपासण्यासाठी अमर उजालाच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली. तेथे आम्हाला प्रल्हाद मोदी असे काही म्हटल्याची कोणतीही बातमी आढळली नाही. उलट 2 जून 2016 रोजीचाच एक खुलासा सापडला. त्यामुध्ये अमर उजालाने स्पष्टपणे अशी काही बातमी दिल्याचे नाकारले आहे. तसेच घडलेल्या प्रकाराची निंदा करीत या खोट्या बातमीसाठी जबाबदार असलेल्या दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही अमर उजालाने म्हटले आहे.

मूळ खुलासा येथे वाचा – अमर उजालाअर्काइव्ह

यानंतर मग आम्ही पोस्टमधील बातमी आणि अमर उजालाच्या वेबसाईटवरील बातमीची तुलना केली. त्यातून पोस्टमधील बातमीतील अनेक विसंगती समोर आल्या.

1. डेटलाईन

व्हायरल पोस्टमधील बातमीच्या तारखेचा फॉरमॅट – वेळ, वार, दिनांक, महिना, वर्ष – असा आहे. परंतु, अमर उजालाच्या अधिकृत वेबसाईटवरील बातम्यांची डेटलाईन – वार, दिनांक, महिना, वर्ष, वेळ – अशी आहे. प्रत्येक वृत्तपत्र/स्थळ यांची ठरलेले लेआऊट/डिझाईन असते. यामध्ये डेटलाईनची स्टाईलदेखील निश्चित असते.

पोस्टमध्ये वेळ आधी आहे, तर वेबसाईटमध्ये ती शेवटी आहे. तसेच पोस्टमध्ये वार आणि महिना देवनागरीतून आहे, तर वेबसाईटवर रोमन/इंग्रजीतून आहे. तसेच पोस्टमध्ये 24-Hour टाईम फॉरमॅट आहे, तर वेबसाईटवर 12-Hour फॉरमॅट आहे.

2. फोटो कॅप्शन

स्टाईलनुसार फोटो कॅप्शनची पद्धतदेखील ठरलेली असते. पोस्टमध्ये नरेंद्र आणि प्रल्हाद मोदी यांच्या फोटोखाली – संन्यासी या चोर, क्या है मोदी? – असे डाव्याबाजूला कॅप्शन दिले आहे. परंतु अमर उजालाच्या वेबसाईटवर कॅप्शन मध्यभागी (सेंटर) असते.

पोस्टमध्ये फोटोचा स्रोतदेखील PC: India Today असा दिला आहे. मूळ वेबसाईटवर स्रोत देवनागरी/हिंदीतूनच देण्यात येतो. तसेच जर ही बातमी अमर उजालाची असती तर, ते इंडिया टुडेचा फोटो का वापरतील? ते कोणताही फाईल फोटो वापरू शकले असते.

यावरून हे सिद्ध होते की, पोस्टमधील बातमी अमर उजालाच्या अधिकृत वेबसाईटवरील नाही.

या बातमीचा फोटो सुमारे अडीच वर्षांपूर्वी जेव्हा समोर आला होता तेव्हा अनेक दैनिक आणि वाहिन्यांनी याची सत्यता तपासली होती. एबीपी न्यूजने प्रल्हाद मोदींशी संपर्क साधून याची पडताळणी केली होती. तेव्हा प्रल्हाद मोदींनी या बातमीचे खंडन करीत कोणत्याही दैनिकाला अशी मुलाखत दिली नसल्याचे म्हटले होते. याबद्दल हिंदी आणि इंग्रजी भाषेतील वृत्त येथे वाचू शकता.

निष्कर्ष

पोस्टमधील बातमी खोटी असल्याचे प्रल्हाद मोदी आणि अमर उजाला दोघांनीही स्पष्ट केले आहे. तसेच पोस्टमधील बातमी अमर उजालाच्या वेबसाईटवरील फॉरमॅटशी विसंगत आहे. त्यामुळे ही बातमी आणि पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:मोदींना दागिने चोरताना पकडल्यामुळे घराबाहेर काढण्यात आले होते? वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •