FACT CHECK: नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धडा अभ्यासक्रमातून रद्द केला आहे का?

False राष्ट्रीय

महाराष्ट्राची उपराजधानीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सध्या देशपातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बी.ए. इतिहास पदावीच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश केल्याने वाद निर्माण झाला आहे. अनेक संघटनांनी विद्यापीठाने अभ्यासक्रमात केलेल्या या बदलावर आक्षेप घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहेत की, वाढत्या दबावाखाली नागपूर विद्यापीठाने आपला निर्णय रद्द करीत आरएसएसचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे प्रकरण?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून बी. ए. इतिहासाच्या दुसऱ्या वर्षातील अभ्यासक्रमात बदल करून भारताचा इतिहास 1885 ते 1947 या कालखंडाच्या तिसऱ्या घटकात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रनिर्माणातील भूमिका’ या विषयाचा समावेश केला आहे. यावरून विद्यापीठावर टीका केली जात आहे. अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश केल्याबाबत काँग्रेसने निषेध व्यक्त केला असून, इतर राजकीय संघटना व पक्षांनी विद्यापीठाच्या या निर्णायावर आक्षेप घेतला आहे. (संदर्भ- महाराष्ट्र टाईम्स)

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही नागपूर विद्यापीठाच्या अधिकृत वेबासाईटला भेट देऊन तेथे अभ्यासक्रम तपासला. वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, बी. ए. इतिहासाच्या सुधारीत अभ्यासक्रमात दुसऱ्या वर्षांच्या चौथ्या सत्रात घटक तीनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) राष्ट्रनिर्माणातील भूमिका असा धडा आहे. याचा स्क्रीनशॉट खाली दिला आहे. याचा अर्थ की, विद्यापीठाच्या वेबसाईटवरून अद्याप तरी संबंधित धडा वगळण्यात आला नसल्याचे दिसून येते.

मूळ अभ्यासक्रम येथे पाहा – नागपूर विद्यापीठ

यासंबंध बातम्यांची तपासणी केली असता, आरएसएस संबंधी धडा वगळण्यात आल्याची कोणतीही बातमी आढळली नाही. दरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धडा काढण्यात यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली आहे. जनार्दन मून यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यावर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पदवी कार्सला संघाचा धडा टाकून डाव्या विचारसणीचा धडा वगळण्यात आला आहे. त्याबाबत विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले होते. परंतु, त्या निवेदनावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स

फॅक्ट क्रेसेंडोने मग नागपूर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी श्याम धोंड यांच्याशी संपर्क साधून यासंबंधी विचारणा केली. त्यांनी सांगितले की, इतिहास अभ्यास मंडळाने बी.ए. इतिहासाच्या दुसऱ्या वर्षात समाविष्ट केलेला “आरएसएसचे राष्ट्रनिर्माणातील योगदान” हा धडा अद्याप वगळण्यात आलेला नाही. तसा कोणताही निर्णय विद्यापीठाने घेतलेला नाही.

नागूपर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे (इतिहास) अध्यक्ष डॉ. श्याम कोरेटी यांनीसुद्धा फॅक्ट क्रेसेंडोशी बोलताना धडा वगळ्याण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले. 

कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी म्हटले की, केवळ नागपूर विद्यापीठच नाही तर देशातील इतरही विद्यापीठांमध्ये संघाचा इतिहास शिकविला जातो. इतर विविध संस्थांसमवेत संघालादेखील नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळाले तर, त्याला विरोध का? मूळ बातमीचे कात्रण येथे वाचा – लोकमत

लोकसत्ताशी बोलताना मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शर्मा यांनी माहिती दिली की, गेल्या 17 वर्षांपासून नागपूर विद्यापीठात एम. ए. इतिहासाच्या अभ्यासक्रमात संघाचा इतिहास समाविष्ट आहे. फॅक्ट क्रेसेंडोने नागपूर विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन एम. ए. अभ्यासक्रमाची तपासणी केली. एम. ए. इतिहासाच्या चौथ्या सत्रातील आधुनिक विदर्भाचा इतिहास पेपरच्या चौथ्या घटकामध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा समावेश असल्याचे आढळले. मूळ अभ्यासक्रम येथे पाहा – एम.ए. इतिहास अभ्यासक्रम

निष्कर्ष

नागपूर विद्यापीठाने बी. ए. इतिहासाच्या पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : राष्ट्रनिर्माणातील भूमिका’ हा धडा अद्याप वगळलेला नाही, असे जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले. हा धडा अभ्यासक्रमातून काढावा, अशी विनंती करणारी याचिका नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली असून, बुधावरी (17 जुलै) यावर सुनावणी अपेक्षित आहे. त्यामुळे धडा वगळण्याची पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK: नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धडा अभ्यासक्रमातून रद्द केला आहे का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False