उत्तरप्रदेश सरकारने ‘दीपोत्सव’ कार्यक्रमावर खरंच 133 कोटी रुपये खर्च केले का? वाचा सत्य

False राजकीय

दिवाळीनिमित्त उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या शहरात ‘दीपोत्सव 2019’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. याअंतर्गत शनिवारी (26 ऑक्टोबर) सायंकाळी शरयू घाट ते राम पायडीपर्यंत अंदाजे साडेपाच लाख दिवे लावण्यात आले. एवढ्या मोठ्या संख्येने दिवे लावण्याचा हा जागतिक विक्रम ठरला. लाखो दिव्यांनी उजळून निघालेल्या नदीतीरावर हजारो लोकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.

गेल्या वर्षी याच ठिकाणी सुमारे तीन लाख दिवे लावण्यात आले होते. यंदा हा विक्रम मोडित काढत अधिक भव्य स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परंतु, उत्तर प्रदेश सरकारची आर्थिक स्थिती आधीच वाईट असताना असे भव्यदिव्य कार्यक्रमावर उधळपट्टी करण्यावरून टीका होत आहे. यावर्षीच्या ‘दीपोत्सव’ कार्यक्रमावर उत्तर प्रदेश सरकारने सुमारे 133 कोटी रुपये खर्च केल्याची टीका सोशल मीडियावर केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये या कार्यक्रमातील एक व्हिडियो शेयर करून म्हटले की, उत्तर प्रदेशात दीपोत्सवासाठी 133 कोटी रुपये खर्च करून विश्व रेकॉर्ड झाल्यानंतर विझलेल्या दिव्यातील तेल गोळा करताना भारताचं उद्याचं भविष्य.

तथ्य पडताळणी

दीपोत्सव 2019 या कार्यक्रमाच्या आयोजनात नेमका किती खर्च झाला याची माहिती शोधत असताना दैनिक जागरण वृत्तपत्राची एक बातमी आढळली. 23 ऑक्टोबर रोजीच्या या बातमीनुसार, उत्तर प्रदेश सरकारने यावर्षी दीपोत्सव कार्यक्रमाला ‘राज्य मेळा’चा दर्जा देण्याच निर्णय घेतला होता. योगींच्या कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिली. तसेच या मेळाव्यासाठी यंदा 1 कोटी 33 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. 

मूळ बातमी येथे वाचा – दैनिक जागरणअर्काइव्ह

कॅबिनेटने मंजुरी दिली म्हणजे याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारच्या वेबसाईटवर नक्कीच उपलब्ध असणार. तेथे शोध घेतल्यावर 22 ऑक्टोबर रोजी कॅबिनेट मंत्रीमंडळाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती अपलोड केली असल्याचे आढळले. त्यानुसार, दीपोत्सव सोहळ्याला ‘राज्य मेळा’चा दर्जा बहाल करण्यात आला. राज्य सरकारकडून अयोध्याचे जिल्हाधिकारी या कार्यक्रमाचे आयोजन करतील. यावर्षीच्या कार्याक्रमासाठी 132.70 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

मूळ निर्ण येथे वाचा – उत्तर प्रदेश सरकार

शासन आदेशात 132.70 लाख रुपये असा उल्लेख आहे. याचा अर्थ की, 1 कोटी 33 लाख रुपये. त्यामुळे माध्यमांमध्ये अनेकांनी 1.33 ऐवजी 133 कोटी अशी चुकीची माहिती दिली.

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, उत्तर प्रदेश सरकारतर्फे आयोजित ‘दीपोत्सव 2019’ सोहळ्यासाठी कॅबिनेटने 1 कोटी 33 लाख रुपयांचा खर्च मंजुर केला होता. त्यामुळे 133 कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती चुकीची आहे. म्हणून ही पोस्ट वाचकांना सत्य माहिती देत नाही.

Avatar

Title:उत्तरप्रदेश सरकारने ‘दीपोत्सव’ कार्यक्रमावर खरंच 133 कोटी रुपये खर्च केले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False