टाटा कंपनीच्या मीठाचा कारखाना म्हणून फेक व्हिडियो व्हायरल. पाहा सत्य काय आहे

False सामाजिक

दिवाळीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांचा मोठा धोका असतो. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक राहुन खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. याच दरम्यान एक व्हिडियो सोशल मीडियावर लोकांना चिंतेत पाडत आहे. या व्हिडियोतून टाटा कंपनीचे मीठ किती गलिच्छरीत्या तयार केले जाते हे दाखविल्याचा दावा करण्यात येत आहेत. जमिनीवर ठेवलेले मीठ पॅकेटमध्ये भरताना यामध्ये दिसते. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे व्हिडियोमध्ये?

सुमारे अडीच मिनिटांच्या व्हिडियोमध्ये काही महिला कामगार हाताने टाटा सॉल्ट नामक पॅकेटमध्ये मीठ भरताना दिसतात. या पाकिटाचे मग वजन काट्यावर वजन केले जाते. त्यानंतर एक लहान मुलगी मशीनवर पाकिटाला सील करून बंद करते. व्हिडियोत रामदेव बाबा सॉल्ट नावाच्या गोण्यासुद्धा दिसतात. व्हिडियोच्या शेवटी पोलिससुद्धा तेथे पोहोचतात. सदरील व्हिडियो शेयर करताना युजरने म्हटले की, टाटा सॉल्ट असो किंवा रामदेव बाबा नमक, मीठ खरेदी करताना काळजी घ्या.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हिडियोच्या शेवटी एक पोलिस अधिकारी दिसतो. याचा अर्थ या कारखान्यावर पोलिसांनी कारवाई केल्याची शक्यता आहे. त्यामुळे गुगलवर जेव्हा टाटा सॉल्ट फॅक्टर रेड असे सर्च केले तेव्हा टाटा सॉल्टच्या अधिकृत वेबसाईटवर कंपनीचा खुलासा सापडला. यामध्ये स्पष्ट म्हटले की, सदरील व्हिडियो टाटा सॉल्टच्या कारखान्याचा नाही. हा व्हिडियो मुळात भेसळयुक्त मीठ टाटा सॉल्ट म्हणून विकणाऱ्या कारखान्यावर टाकलेल्या धाडीचा आहे. कंपनीच्या फेसबुक अकाउंटवरसुद्धा याचा खुलासा करण्यात आला आहे. तो तुम्ही येथे वाचू शकता.

कंपनी वेबसाईट – Tata Salt

टाटा सॉल्ट कंपनीने हिंदुस्तान टाईम्सच्या एका बातमीची लिंक दिली आहे. 11 ऑक्टोबर 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या या बातमीनुसार, मोहालीजवळील सुंद्रा गावात टाटा सॉल्टच्या नावाखाली भेसळयुक्त मीठ तयार करणाऱ्या कारखान्यावर पंजाब पोलीस व टाटा सॉल्टच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. हा व्हिडियो या धाड सुरू होण्यापूर्वीचा आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र सिंग यांनी माहिती दिली की, या फॅक्टरीमध्ये विविध ब्रँड्सच्या नावे भेसळयुक्त उत्पादने तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांसह ही कारवाई करण्यात आली.

मूळ बातमी येथे वाचा – हिंदुस्थान टाईम्सअर्काइव्ह

याचा अर्थ की, व्हिडियोत दिसणारा कारखाना टाटा सॉल्ट कंपनीची खरी फॅक्टरी नाही. किंवा ती रामदेव बाबा मीठाचीसुद्धा फॅक्टरी नाही. टाटा कंपनीतर्फे देशभरात अशा बनवाट कारखान्यांवर धाड टाकण्याची कारवाई केली जाते. 25 ऑक्टोबरलाच मेरठ शहरात खोटे टाटा सॉल्ट तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड पडली होती.

मूळ बातमी येथे वाचा – पत्रिकाअर्काइव्ह

मग योग्य टाटा मीठ कसे निवडणार?

टाटा सॉल्ट कंपनीच्या युट्युब चॅनेलवर चांगले व शुद्ध मीठ ओळखण्याचा एक सोपा उपाय सांगितलेला आहे. करायचं एवढंच की चमच्याभर मीठ एक ग्लास पाण्यात टाकायचे. मग चमच्याने पाण्यात मीठ मिक्स करायचे. टाटा सॉल्ट मीठ पाण्यात पूर्णतः विरघळून जाते. जर ते पूर्ण नाही विरघळले तर समजावे की, ते मीठ भेसळयुक्त आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडियो पाहा.

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडियो टाटा सॉल्ट कंपनीच्या कारखान्याचा नाही. मोहाली जवळील एका गावात बनावट मीठ तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीचा तो व्हिडियो आहे. त्यामुळे धाडीचा व्हिडियो टाटा सॉल्टची फॅक्टर म्हणून पसरविणे चूक आहे.

Avatar

Title:टाटा कंपनीच्या मीठाचा कारखाना म्हणून फेक व्हिडियो व्हायरल. पाहा सत्य काय आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False