VIDEO: भोजपुरी गाण्यावर नाचणाऱ्या विदेशी नागरिकांचा व्हिडियो जर्मनीतील आहे. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपची चर्चा केवळ मैदानावरील सामन्यांमुळे नाही तर, मैदानाबाहेर गोष्टींमुळेदेखील होत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडियोने चांगलीच धूम केली आहे. यामध्ये विदेशी नागरिक एका लोकप्रिय भोजपूरी गाण्यावर बेभान होऊन धिरकताना दिसतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडियो इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपदरम्यानचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

12 जून रोजी शेयर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये 18 सेंकदाची एक व्हिडियो क्लिप शेयर केली आहे. यामध्ये विदेशी नागरिक लोकप्रिय भोजपूरी गाण्यावर नाचताना दिसतात. एका ट्रकमध्ये डीजे साऊंड ठेवलेले असून एक व्यक्ती भारताचा तिरंगा फडकावतानाही दिसतो. व्हिडियो कॅप्शनमध्ये म्हटले की, इंग्लंड येथील नागरीकावर वर्ल्ड कपचे परीणाम.

तथ्य पडताळणी

पोस्टमधील व्हिडियोची सत्यता तपासण्यासाठी इन-व्हिड टूलचा वापर करून तांत्रिक विश्लेषण केले. व्हिडियोतील एका फ्रेमला झूम करून पाहिल्यास ट्रकवर BERLIN असे लिहिलेले दिसते. जर हा व्हिडियो इंग्लडंमधील मानला तर, तेथे बर्लिन (जर्मनीची राजधानी) का लिहिलेले असेल? क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये जर्मनीचा संघ असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे व्हिडियोबाबत शंका निर्माण होते.

हा धागा पकडून मग Berlin Dancing on Indian Song असे सर्च केल्यावर एका ट्विटर युजरने हा व्हिडियो बर्लिनमधील Karneval Der Kulturen Event या महोत्सवातील असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने या महोत्सवातील इतर भारतीय गाणे वाजवल्याचा व्हिडियोदेखील शेयर केला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. मग आम्ही Karneval Der Kulturen काय आहे याचा शोध घेतला.

अर्काइव्ह

बर्लिनमध्ये दरवर्षी कार्निव्हल ऑफ कल्चर (Karneval Der Kulturen) हा सांस्कृतिक महोत्सव घेण्यात येतो. याची सुरुवात 1995 साली झाली होती. तेव्हापासून उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा महोत्सव बर्लिन शहरात आयोजित केला जातो. यामध्ये जगभरातील विविध देशांमधील नागरिक आपापल्या संस्कृतीचे प्रदर्शन करतात. बहुसांस्कृतिक संगीत, खाद्यपदार्थ आणि नृत्य असा अनोखा मेळावा यावर्षी 7 ते 10 जूनदरम्यान झाला. या चार दिवसीय महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे Straßenumzug ही मिरवणूक. बर्लिनच्या रस्त्यांवरून निघणाऱ्या या मिरवणुकीत विविध देशांतील नागरिक सहभाग घेऊन आपापल्या देशातील संस्कृतीची झलक दाखवतात. यंदा ही मिरवणूक 9 जून रोजी निघाली होती. महोत्सवाविषयी ENJOY BERLIN येथे सविस्तर वाचा.

अर्काइव्ह

अधिक शोध घेतल्यावर या महोत्सवातील विविध व्हिडियो समोर आले. एका युजरने शेयर केलेल्या ट्विटमध्ये भोजपुरी गाण्याच्या व्हिडियोमध्ये दिसणारा ट्रक दिसतो. इन-व्हिड टूलद्वारे त्याचे विश्लेषण केल्यावर त्या ट्रकवर BERLIN INDIAWAALE असे लिहिल्याचे आढळले. बर्लिनमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी 2015 मध्ये बर्लिन इंडियावाले हा ग्रुप सुरू केला होता. कार्निव्हल ऑफ कल्चरमध्ये दरवर्षी भारतीय संस्कृतीचे वैविध्यपूर्ण दर्शन घडविण्याचे काम या ग्रुपचे सदस्य करतात. त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटला येथे भेट देऊ शकता. बर्लिन इंडियावाले ग्रुपच्या फेसबुक पेजवर या महोत्सवाचे विविध फोटो आणि व्हिडियो शेयर करण्यात आले आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोने   बर्लिन इंडियावाले ग्रुपशी ईमेलद्वारे संपर्क केला असता, त्यांनी सदरील व्हायरल व्हिडियो बर्लिनचाच असल्याची पुष्टी दिली. त्यांनी सांगितले की, हा व्हिडियो 9 जून 2019 रोजी काढण्यात आला होता. यामध्ये जो ट्रक दिसत आहे तो बर्लिन इंडियावाले ग्रुपचाच आहे. हा ट्रक Gneisenaustrasse येथे होता. त्या दिवशीची मिरवणूक Yorkstrasse/Möckernstrasse ते Herrmannplatz दरम्यान निघाली होती.

निष्कर्ष

भोजपुरी गाण्यावर विदेशी नागरिक थिरकण्याचा व्हिडियो इंग्लंडमधील नाही. हा व्हिडियो जर्मनीतील बर्लिन शहरातील आहे. 7 ते 10 जून दरम्यान झालेल्या कार्निव्हल ऑफ कल्चरमध्ये हा व्हिडियो काढण्यात आला होता. त्यामुळे सदरील व्हिडियो इंग्लंडमधील असल्याचा दावा असत्य ठरतो.

Avatar

Title:VIDEO: भोजपुरी गाण्यावर नाचणाऱ्या विदेशी नागरिकांचा व्हिडियो जर्मनीतील आहे. वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False