FACT CHECK: खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये नेमके कोण जिंकले?

False राजकीय | Political

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाले. भाजप-सेनेच्या युतीने राज्यात सत्ता कायम राखली असली तरी, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अधिक जागा जिंकल्या. त्यामुळे सोशल मीडियावर दिवसभर कार्यकर्ते आणि नेत्यांचे समर्थक सोशल मीडियावर आपापल्या उमेदवाऱ्याच्या विजयाचा उत्सव साजरा करीत होते. खडकवासला मतदारसंघामधून भाजपला पराभूत करीत राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांनी विजय मिळवल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये

सचिन दोडके यांचे कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करतानाचा एक व्हिडियो शेयर करून दावा केला आहे की, महाराष्ट्रातील पहिला विजय खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला जिंकला श्री सचिन भाऊ दोडके.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

खडकवासला मतदारसंघामध्ये भाजपचे भिमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके यांच्यामध्ये प्रमुख लढत होती. दोहोंमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले होते. मतदारसंघाच्या फेररचनेनंतर 2009 मध्ये निर्माण झालेल्या खडकवासला मतदारसंघातून मनसेचे रमेश वांजळे निवडून आले होते. त्यांचे निधन झाल्याने, पोटनिवडणुकीत तापकीर निवडून आले. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये तापकीर पुन्हा विजयी झाली. त्यामुळे यंदा खडकवासलामध्ये कोण जिंकणार हे ठरवणारी लढत चुरशीची ठरली.

मूळ निकाल येथे पाहा – निवडणूक आयोग निकाल

परंतु, अखेर कोण जिंकले याचा शोध घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेले निकाल पाहिले. तेव्हा असे लक्षात आले की, भाजपच्या तापकीर यांनी राष्ट्रवादीच्या दोडके यांचा पराभव केला. तापकिर यांनी दोडके यांचा 2595 मतांना पराभव केला. त्यांना एकुण 1 लाख 20 हजार 518 मते मिळाली. दोडके यांना 1 लाख 17 हजार 772 मते मिळाली.

मूळ निकाल येथे पाहा – निवडणूक आयोग निकाल

सकाळ वृत्तपत्रामध्येदेखील बातमी आली की, पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भिमराव तापकीर 2500 मतांनी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांचा त्यांनी पराभव केला. खडकवासला येथून भिमराव तापकीर यांनी विजयश्री खेचून आणाला. त्यांना सचिन दोडके यांनी टफ फाईट दिली खरी मात्र, मतदारांनी तापकीर यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला.

मूळ बातमी येथे वाचा – सकाळ

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, खडकवासला येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन दोडके यांचा विजय झालेला नाही. या मतदारसंघातून भाजपच्या भिमराव तापकीर यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे सोशल मीडियावर केला जाणारा दावा चुकीचा आहे.

Avatar

Title:FACT CHECK: खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये नेमके कोण जिंकले?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False