FACT CHECK: ‘सिंगल’ तरुणांना गर्लफ्रेंड मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या उमेदवाराचे सत्य काय?

False राजकीय

विधानसभा निवडणुकीला केवळ चार दिवस शिल्लक राहिलेले असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोण काय करील याचा काही नेम नाही. मोठी मोठी स्वप्ने दाखवणाऱ्या पक्षांबरोबरच उमेदवारसुद्धा स्थानिक पातळीवर विविध आश्वासने देत असतात. यंदाच्या निवडणुकीत चक्क महिला उमेदवारानेच ‘गाव तेथे बिअर बार’ अशी घोषणा देत बेरोजगारांना दारू विक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आश्वासन दिले. हे काय कमी होते म्हणून आता एक उमेदवार ‘सिंगल’ तरुणांना गर्लफ्रेंड मिळवून देण्याच्या हमीवर मत मागत असल्याचा दावा केला जात आहे.

सोशल मीडियावर गाजत असेलेल्या एका व्हिडियोमध्ये काँग्रेस पक्षाची टोपी घातलेल्या उमेदवाराचा फोटो दाखवून कथित न्यूज अँकर बातमी देत आहे की, इस चुनावी माहौल में बडी खबर ये आ रही है की, फोटो में दिखने वाले इस शख्स को आपके शहर की बैठक से नेव्हर सिंगल पार्टी के वरिष्ठ नेता के तौर पर चुना गया है. वे दावा करते है की, अगर उन्हे प्रधानमंत्री बनाया गया तो देश की हर एक नवयुवक को रिलेशनसिप फंडिंग्स पहुँचायी जाएगी और देश का हर एक नवयुवक अकेलापन और तन्हाई से बच जाएगा. तो आओ हम सब मिलके इस दिलदार नेता को वोट दे, क्योंकि प्यार में पडेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली.

तथ्य पडताळणी

तीस सेंकदाच्या या व्हिडियोमध्ये हिंदी भाषेच्या अनेक चुका आहेत. तसेच यातील माहिती व्यंगात्मक वाटते. मग या व्हिडियोचे मूळ शोधण्यासाठी यातील स्क्रीनशॉट घेऊन यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा युट्यूबवर हाच व्हिडियो वेगवेगळ्या फोटोंसह आढळून आला. त्यातील एक उदाहरण तुम्ही खाली पाहू शकता.

आमच्याकडे आलेल्या व्हिडियोमध्ये काँग्रेसचे चिन्ह असलेली टोपी घातलेल्या व्यक्तीचा फोटो आहे, तर वरील व्हिडियोमध्ये वेगळाच फोटो आहे. यावरून हा व्हिडियो एडिट करून तयार करण्यात आला असेल असे लक्षात येते. व्हिडियोच्या डाव्या बाजूस वर BOO असे लिहिलेले आहे. हा धागा पकडून शोध घेतल्यावर कळाले की, BOO नावाचे एक व्हिडियो स्टेटस तयार करण्याचे मोबाईल अ‍ॅप आहे.

या अ‍ॅपमध्ये फोटोपासून विविध प्रकारचे व्हिडियो तयार करता येतात. बर्थ डे, अ‍ॅनिव्हर्सरी, लिरिकल व्हिडियो स्टेटस अशा अनेक प्रकारच्या टेम्पलेट अ‍ॅपमध्ये आहेत. याच अ‍ॅपमधील ब्रेकिंग न्यूज टेम्पलेट वापरून फॅक्ट क्रेसेंडोने वरील व्हिडियोमध्ये “Put Any Phot Here” असे लिहिलेला फोटो असणारा व्हिडियो तयार केला. तो तुम्ही खाली पाहू शकता.

याचा अर्थ की, हे BOO अ‍ॅपद्वारे कोणताही फोटो वापरून हा व्हिडियो तयार केला जाऊ शकतो.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, नेव्हर सिंगल पार्टीचे उमेदवाराची बातमी देणारा व्हिडियो खोटा आहे. सिंगल तरुणांना गर्लफ्रेंड मिळवून देण्याचा वायदा, हा केवळ व्यंग आहे. BOO अ‍ॅपद्वारे हा व्हिडियो तयार करण्यात आला आहे. त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका.

Avatar

Title:FACT CHECK: ‘सिंगल’ तरुणांना गर्लफ्रेंड मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या उमेदवाराचे सत्य काय?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False