RAPID FC: जवाहरलाल नेहरू यांचे वडिल मुस्लिम नव्हते. तो व्हायरल मेसेज खोटा आहे. वाचा सत्य

False राजकीय | Political

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जीना आणि काश्मीरचे मुख्यमंत्री शेख मोहम्मद अब्दुल्ला हे एकमेकांचे सावत्र भाऊ होते, असा धदांत खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये नेहरू कुटुंबाविषयी अनेक धक्कादायक व चुकीचे दावे करण्यात आले आहेत. जसे की,  मोतीलाल नेहरूंच्या पाच पत्नी होत्या,  नेहरूंचे खरे वडिल मुबारक अली होते,  इंदिरा गांधीच्या पतीचे खरे नाव जहांगीर फिरोज खान होते.

जवाहरलाल नेहरू यांचे वैयक्तिक सहाय्यक एम. ओ. मथाई यांच्या पुस्तकातून ही माहिती बाहेर आल्याचा मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे. अनेकजण याला खरं मानून शेयरदेखील करीत आहेत.

परंतु, हे सगळं खोटं आहे.

मूळ मेसेज येथे वाचा – फेसबुकफेसबुक

खरं काय आहे?

‘फॅक्ट क्रेसेंडो मराठी’ने 21 ऑगस्ट 2019 रोजी या मेसेजची पडताळणी करून सत्य बाहेर आणले होते. त्यानुसार, एम. ओ. मथाई यांनी 1946 ते 1959 दरम्यान पं. जवाहरलाल नेहरू यांचे खासगी सचिव म्हणून काम केले होते. परंतु, हेरगिरीच्या आरोपाखाली त्यांना राजीनामा द्यावा लागला. 

मथाई यांनी Reminiscences of the Nehru Age (1978) आणि My Days with Nehru (1979) ही दोन आत्मचरित्रे लिहिली. दोन्ही पुस्तकांमध्ये थुसू रहमान बाई किंवा मुबारक अली या दोन नावांचा उल्लेखसुद्धा नाही. मोतीलाल नेहरूंविषयीदेखील मथाई यांनी काहीच आक्षेपार्ह लिहिलेले नाही.

मोतीलाल नेहरू यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते. ते काश्मीर ब्राह्मण होते. शेवटचा मुघल सम्राट बहादुर शहा द्वितीय यांच्या दरबाराते ते दिल्लीचे कोतवाल होते. परंतु, 1857 च्या उठावानंतर गंगाधर यांची नोकरी गेली आणि ते आग्रा येथे स्थायिक झाले. 1861 साली त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी 6 मे 1861 रोजी मोतीलाल यांचा जन्म झाला.

मोहम्मद अली जीना यांचा जन्म 1875 किंवा 1876 साली तर मोतीलाल नेहरू यांचा जन्म 1861 साली. म्हणजे जिना यांच्या जन्मावेळी मोतीलाल नेहरू 14-15 वर्षांचे होते. जीना यांच्या वडिलांचे नाव जिन्नाभाई पुंजा असे होते. ते गुजरातहून कराचीला स्थायिक झाले होते. जीना यांचे पुर्वज हिंदू होते. ते गुजरातमधील लोहाना समाजातील होते. परंतु, जीना यांच्या आजोबांना जातीतून बहिष्कृत केल्याने त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. याचा अर्थ की, मोतीलाल हे जीना यांचे वडिल नव्हते.

यावरून स्पष्ट होते की, हा मेसेज पूर्णतः खोटा आहे. अधिक सविस्तर येथे वाचा:

FACT CHECK: जवाहरलाल नेहरू, मोहम्मद अली जीना आणि शेख अब्दुल्ला हे सावत्र भाऊ होते का?

Avatar

Title:RAPID FC: जवाहरलाल नेहरू यांचे वडिल मुस्लिम नव्हते. तो व्हायरल मेसेज खोटा आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False