मतदारांचे पाया पडणारे हे नेते गुजरातचे शिक्षणमंत्री नाहीत; दिल्लीतील जुना फोटो व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

गुजरात विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तशी प्रचाराची रणधुमाळी जोर पकडत आहे. सर्वच पक्षांचे नेते सभा आणि रॅली काढण्यात व्यस्त असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी घरोघरी जाऊनही ते प्रचार करीत आहेत. 

अशाच एका व्हायरल फोटोमध्ये एक नेता महिलेच्या पाया पडत आहे. हा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, ते गुजरातचे शिक्षणमंत्री जीतू वघाणी असून त्यांच्यावर मतांसाठी लोकांच्या पाया पडण्याची वेळ आली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. या फोटोमध्ये गुजरातचे शिक्षणमंत्री नाहीत.

काय आहे दावा ?

पाया पडणाऱ्या नेत्याचा फोटो शेअर करून म्हटले आहे की, गुजरातचे शिक्षणमंत्री जीतू वाघाणी विधानसभा निवडणूक प्रचारात मतदारांच्या पाया पडत आहेत. गुजरातमध्ये इतका विकास झाला आहे की भाजपच्या नेत्यांना लोकांचे पाय धरावे लागत आहेत. याला म्हणतात नरेंद्र मोदीचे ‘गुजरात मॉडल.’” 

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

या फोटोला गुगलवर सर्च केले असता कळाले की, पाया पडणारे हे नेते गुजरातमधील नसून दिल्लीचे आहेत. 

या घटनेचा ‘वन इंडिया’ नामक युट्युब चॅनलवर दोन वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ उपलब्ध आहे. त्यासोबतच्या माहितीनुसार, ते भाजपचे नेते संजय सिंह आहेत. 2020 साली झालेल्या दिल्ली विधानसभेच्या प्रचारात संजय सिंह एका ज्येष्ठ महिलेच्या पाया पडले होते. 

संजय सिंह पश्चिम दिल्लीच्या विकासपूरी विधानसभा क्षेत्रातून भाजपचे उमेदवार होते. व्हायरल फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने त्यांच्याशी संपर्क साधला. 

व्हायरल दाव्याचे खंडन करताना त्यांनी सांगितले की, “या फोटोत मीच पाया पडत आहे. मागच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा हा फोटो आहे. हा फोटो आता चुकीच्या दाव्यासह फोटो शेअर केला जात आहे. या फोटोचा गुजरात निवडणुकीशी काही संबंध नाही.”

निष्कर्ष

या वरून सिद्ध होते की, व्हायरल फोटोमध्ये मतदारांच्या पाया पडताना दिसणारे नेते गुजरातचे शिक्षणमंत्री जीतू वघाणी नाहीत. हा फोटो दिल्लीतील भाजप नेते संजय सिंह यांचा आहे. (तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मतदारांचे पाया पडणारे हे नेते गुजरातचे शिक्षणमंत्री नाहीत; दिल्लीतील जुना फोटो व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading