VIDEO: फटाक्यांवर बंदी असूनही योगी आदित्यनाथ यांनी फटाके फोडले का? वाचा सत्य

False राजकीय

उत्तर प्रदेशमध्ये सरकारने दिवाळीदरम्यान 12 जिल्ह्यांमध्ये फटाकेबंदीचे आदेस काढले होते. तसेच फटाकेविक्री करणाऱ्या अनेक दुकानदारांवर कडक कारवाईसुद्धा केली होती. अशाच एका कारवाईमध्ये पोलिस फटाकेविक्रेत्याला अटक करून घेऊन जात असताना त्याच्या सहा वर्षांच्या मुलीने रडत रडत याला विरोध केल्याचा व्हिडिओ बराच गाजला होता.

अशा पार्श्वभूमीवर सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ फटाके फोडतानाचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, एकीकडे सरकार फटाके बंदी आणि विक्रेत्यांवर कारवाई करीत आहे आणि दुसरीकडे खुद्द मुख्यमंत्रीच फटाके फोडून दिवाळी साजरी करीत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. योगी आदित्यनाथ फटाके फोडतानाचा व्हिडिओ गेल्या ऑगस्ट महिन्यातील आहे. तो दिवाळी दरम्यानचा नाही.

काय आहे दावा?

सोशल मीडियावरील व्हायरल क्लिपमध्ये एका बाजूला पोलिसांसमोर वडिलांना अटक करू नका म्हणणाऱ्या मुलीचा व्हिडिओ आणि दुसऱ्या बाजूला योगी आदित्यनाथ फटाके फोडत असल्याचा व्हिडिओ दिलेला आहे. त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप करीत लिहिले की, हे दोन्ही व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील आहेत. एकीकडे फटाके विक्रेत्याला पोलिस अटक करीत आहेत तर, दुसरीकडे मुख्यमंत्रीच फटाक्यांसह दिवाळी साजरी करीत आहेत.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हे तपासले की, योगी आदित्यनाथ फटाके फोडतानाचा व्हिडिओ कधीचा आहे. की-फ्रेम्सवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ यंदाच्या दिवाळीतील नाही. तो तर गेल्या ऑगस्ट महिन्यातील आहे.

ANI वृत्तस्थळाने 4 ऑगस्ट 2020 रोजी हा व्हिडिओ ट्विटर शेयर करून म्हटले होते की, आयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिरांच्या भूमिपूजनाच्या आदल्या दिवशी योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ येथील शासकीय निवासस्थानी फटाके फोडून ‘दीपोत्सव’ साजरा केला होता.

अर्काइव्ह

यावरून स्पष्ट होते की, योगी आदित्यनाथ यांचा फटाके फोडतानाचा व्हिडिओ फटाकेबंदी लागू होण्यापूर्वी तीन महिन्यांआधीचा आहे. त्याला यंदाच्या दिवाळीतील म्हणून पसरविले जात आहे.

जसे की वर म्हटल्याप्रमाणे, उत्तर प्रदेशमध्ये प्रदूषणाला आळा घालण्यासाठी 12 जिल्ह्यांमध्ये पूर्णतः फटाकेबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. ही बंदी दिवाळी ते नववर्षापर्यंत लागू राहणार आहे.

बंदी असूनही फटाके विक्री करणाऱ्या अनेक दुकानांवर पोलिसांनी कारवाईची मोहिम हाती घेतली होते. बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा बाजार येथे 13 नोव्हेंबर रोजी अशीच कारवाई करण्यात आली होती. यामध्ये एका फटाकेविक्रेत्याला पोलिस घेऊन जात असताना त्याची भेदरलेली मुलगी पाणावलेल्या डोळ्यांनी विणवणी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अर्काइव्ह

पोलिसांच्या अशा असंवेदनशील कारवाईवरून टीका होऊ लागल्यानंतर प्रशासनाने या मुलीच्या वडिलांना सोडून दिले. तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या मुलीच्या घरी जाऊन तिला मिठाई देत तिची समजूत घातली व दिवाळी साजरी केली. 

“या लहान मुलीच्या मनात पोलिसांविषयी राग व गैरसमज राहू नये म्हणून आम्ही तिला भेटलो,” असे खुर्जा येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मीडियाला सांगितले.

अर्काइव्ह

निष्कर्ष

योगी आदित्यानाथ यांचा ऑगस्ट महिन्यातील फटाके फोडतानाचा व्हिडिओ यंदाच्या दिवाळीचा म्हणून शेयर केला जात आहे.

Avatar

Title:फटाक्यांवर बंदी असूनही योगी आदित्यनाथ यांनी फटाके फोडले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False