FAKE NEWS: हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची नावे बदलण्यात आलेली नाहीत

False सामाजिक

हैदराबाद सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील चार आरोपींचे नाव आणि धर्माविषयी सोशल मीडिया अनेक चुकीचे मेसेज फिरत आहेत. हैदराबाद पोलिसांनी चार पैकी तीन आरोपींची नावे बदलून त्यांचे दुसऱ्या धर्माप्रमाणे नाव नोंदविण्यात आले, असा दावा केला जात आहे. गाजियाबाद येथील यति नासिंहानंद सरस्वती यांनीदेखील व्हिडियोद्वारे हा दावा केला. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली. 

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसुबक 

तथ्य पडताळणी

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे एका महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार व नंतर तिची जाळून हत्या केल्याची खळबळजनक घटना 28 नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी सायबराबाद पोलिसांनी 24 तासांच्या आत चार आरोपींना अटक केली होती. विविध मीडिया वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आरोपींची नावे – ट्रकचालक मोहम्मद पाशा (आरिफ), जोलू शिवा, चिंताकुंटा चेन्नाकेशावुलू, जोलू नवीन – अशी आहेत.

सायबराबाद पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्समध्येसुद्धा हीच नावे सांगितली होती. प्रेस कॉन्सफरन्सचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

सदरील घटनेची नोंद ज्या शादनगर ठाण्यात आहे तेथील निरीक्षक श्रीधर कुमार यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला. सोशल मीडियावर केला जाणारा दावा पूर्णतः खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. केस फाईलमधील अधिकृत कागदपत्राची एक कॉपी त्यांनी फॅक्ट क्रेसेंडोला पाठवली. त्यातील माहितीनुसार आरोपींची नावे अशी :

1. मोहम्मद अली मोहम्मद आरिफ (26, जि. नारायणपेठ) – ट्रक चालक

2. जोलू शिवा (20, जि. नारायणपेठ) – ट्रक क्लिनर

3. जोलू नवीन कुमार (20, जि. नारायणपेठ) – ट्रक क्लिनर

4. चिंताकुंटा चेन्नाकेशावुलू (21, जि. नारायणपेठ) – ट्रक क्लिनर

अधिकृत कागदपत्रामध्ये कुठेही उर्फ लिहून नावात बदल किंवा इतर धर्माचे नाव दिलेले नाही. फॅक्ट क्रेसेंडोने शमशाबाद येथील पोलीस उपायुक्त एन. प्रकाश रेड्डी यांच्याशी संपर्क केला. त्यांनीदेखील सदरील पोस्टमधील दावे पूर्णतः खोटे असल्याचे सांगितले. “या प्रकरणासंबंधी खोटी माहिती पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कोणीही खोटी माहिती पसरवू नये”, असे आवाहन त्यांनी केले.

निष्कर्ष

हैदराबाद सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींची नावे बदलण्यात आलेली नाहीत. हा दावा पूर्णतः खोटा आहे. हैदराबाद पोलिसांनी याचे खंडन केले असून, अफवा न पसरविण्याचे आवाहनदेखील केले आहे. आपल्याकडेदेखील या संबंधी काही संशयास्पद माहिती असल्यास पडताळणीसाठी आम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवा.

Avatar

Title:FAKE NEWS: हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची नावे बदलण्यात आलेली नाहीत

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False