
महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष महाराष्ट्र विकास आघाडीच्या रुपाने एकत्र आले आहेत. त्याचवेळी शिवसेनेने आपल्या लोगोत बदल केला असून भविष्यातील मोहिमेसाठी नवीन लोगो घेतला आहे. नवीन धर्मनिरपेक्ष शिवसेना अशा माहितीसह एक छायाचित्र समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे, पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९ आणि अमित राजुरकर पाटील यांनीही हे छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
शिवसेनेने आपल्या लोगोत खरंच बदल केला आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी आम्हाला शिवसेना डॉट ओआरजी या शिवसेनेच्या अधिकृत संकेतस्थळावर एक छायाचित्र दिसून आले. हे छायाचित्र शिवसेनेच्या प्रचारगीताच्या व्हिडिओत आहे.
मग आम्हाला प्रश्न पडला की शिवसेनेचे समाजमाध्यमात पसरविण्यात येत असलेले हे छायाचित्र आले कुठून त्यामुळे आम्ही आमचा शोध जारी ठेवला. त्यावेळी आम्हाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे एक पॅरोडी अकाऊंट दिसून आले. यावर असलेले एक ट्विटही दिसून आले. या अकाऊंटवर विडंबन म्हणून प्रसिध्द करण्यात आलेले हे छायाचित्रच आता समाजमाध्यमात शिवसेनेचा नवा लोगो म्हणून पसरत असल्याचे दिसून येत आहे.
यातून हे सिध्द होत आहे की शिवसेनेच्या प्रचारगीताच्या व्हिडिओतील छायाचित्राचे विडंबन करण्यात आले होते. हे विडंबन केलेले छायाचित्रच आता शिवसेनेचा नवा लोगो म्हणून समाजमाध्यमात पसरत आहे. दरम्यान खाली खोट्या आणि खऱ्या छायाचित्राची तुलना करण्यात आली आहे.
निष्कर्ष
शिवसेनेच्या प्रचारगीताच्या व्हिडिओतील छायाचित्राचे विडंबन करण्यात आले होते. हे विडंबन केलेले छायाचित्रच आता शिवसेनेचा नवा लोगो म्हणून समाजमाध्यमात पसरत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact : धर्मनिरपेक्ष शिवसेनेचा नवा लोगो म्हणून पसरविण्यात येणारे हे छायाचित्र बनावट
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
