महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’मधील गर्दीच्या नावाने ‘मराठा मोर्चा’चा जुना व्हिडिओ व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

महाविकास आघाडीच्या वतीने 17 डिसेंबर रोजी ‘हल्ला बोल’ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. 

या मोर्चाला कितपत प्रतिसाद मिळाला यावरून सोशल मीडियावर वाद सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाची ‘नॅनो’ मोर्चा अशी हेटाळणी केली. 

फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विराट गर्दीचा व्हिडिओ ट्विट केला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती आढळले की, राऊत यांनी पाच वर्षे जुन्या मराठा मोर्चाचा व्हिडिओ शेअर केला.

काय आहे दावा ?

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडियोमध्ये हातात भगवा झेंडा लोक एका पूलावरून चालताना दिसतात. राऊत लिहितात की, “देवेंद्र फडणवीस ज्यास ‘नॅनो’ मोर्चा म्हणून हिणवलं, तो हाच मोर्चा आहे. देवेंद्रजी, असं वागणं बरं नाही,”

Archive

मूळ पोस्ट – ट्विटर 

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओ रिव्हर्स ईमेजवर सर्च केले असता कळाले की, हा व्हिडिओ पाच वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. व्हिडिओमध्ये ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा ऐकू येतात.

हा धागा पकडून अधिक माहिती घेतल्यावर कळाले की, 9 ऑगस्ट 2017 रोजी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी राज्यभरात 57 मोर्चे काढण्यात आले होते. शेवटच्या टप्प्यात मुंबईमध्येदेखील एक विराट मोर्चा काढण्यात आला होता. हा व्हिडिओ त्या मराठा क्रांती मोर्चाचा आहे. 

वरील व्हिडिओ आणि राऊत यांनी शेअर केलेला व्हिडिओ एकच आहे. दोन्हींची तुलना केल्यावर ही बाब लगेच लक्षात येते. 

खाली दिलेल्या तुलनात्मक व्हिडिओमध्ये एकाच वेळेस पांढऱ्या रंगाची कार आणि काही दुचाकी वाहने जाताना दिसतात.

महाविकास आघाडीचा ‘हल्ला बोल मोर्चा’

छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचा अपमान, सीमावती भागाबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली भडकाऊ वक्तव्ये, बेरोजगारी, महागाई याविरोधात महाविकास आघाडीने १७ डिसेंबर रोजी ‘हल्ला बोल’ महामोर्चा आयोजित केला होता.

न्युज-18 लोकमत यांनी महाविकास आघाडीच्या ‘हल्ला बोल’ मोर्चाचे सीएसटी स्थानकावरून एका इमारतीवर जे. जे. मार्गे जाणाऱ्या महारॅलीचे दृश्य दाखविले आहे.

एएनआय वृत्तसंस्थे महाविकास आघाडीच्या ‘हल्ला बोल’ मोर्चाचे फोटो शेअर केले आहेत.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ महाविकास अघाडी आयोजीत ‘हल्ला बोल मोर्चा’चा नसून पाच वर्षांपूर्वीच्या मराठा क्रांती मोर्चाचा आहे. चुकीच्या माहितीसह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’मधील गर्दीच्या नावाने ‘मराठा मोर्चा’चा जुना व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading