रघुराम राजन यांची बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली का? वाचा सत्य

False राजकीय

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची बँक ऑफ इंग्लंडच्या गव्‍‌र्हनरपदी नियुक्ती झाली, अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टला खरे मानून यूजर्स राजन यांचे अभिनंदन तर, भारत सरकारवर टीका करत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, रघुराम राज यांची क ऑफ इंग्लंडच्या गव्‍‌र्हनरपदी नियुक्ती झालेली नाही.

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये युजरने रघुराम राजन यांचा हातात पुष्पगुच्छ असलेला एक फोटो शेयर करून लिहिले की, भारताचे आरबीआयचे माजी गव्हर्नर श्री. रघुराम राजन यांची बँक ऑफ इंग्लंडच्या प्रमुख पदी निवड. भारताचं टॅलेंट इंग्लंड, अमेरिका वापरतो आणि जगात क्र. एकची, अर्थव्यवस्था बनवतो. भारतात मात्र अडाणचावट फेकूशेठ कडून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. अनर्थशास्त्र्यांना अर्थखातं सोपवून देशाची वाट लावली जातेय..?

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

रघुराम राजन आंतरराष्ट्रीयस्तरावर आघाडीचे अर्थ तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. ते सध्या शिकागो विद्यापीठाच्या बुथ स्कूल ऑफ बिझनेमध्ये वित्त विभागाचे प्राध्यापक आहेत. त्यांची जर बँक ऑफ इंग्लडच्या गव्हर्नरपदी निवड झालेली असेल तर जगभरातील मीडियाने याची दखल घेतली असती. परंतु, इंटरनेटवर त्यांच्या निवडीची एकही बातमी आढळली नाही. त्यामुळे या दाव्याच्या सत्यतेबाबत शंका निर्माण होते.

बँक ऑफ इंग्लंडच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, अँन्ड्रयू बेली विद्यमान गव्हर्नर आहेत. 20 डिसेंबर 2019 त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. 

16 मार्च 2020 रोजी त्यांनी गव्हर्नरपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ 15 मार्च 2028 रोजी संपुष्टात येणार आहे.

अर्थात, अँन्ड्रयू बेली बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर आहेत, रघुराम राजन नाही.

मूळ वेबसाईट – बँक ऑफ इंग्लंड

रघुराम राज यांचे नाव कसे आले?

विशेष म्हणजे 2018 सालीदेखील रघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्‍‌र्हनरपदाचे संभाव्य उमेदवार असल्याची बातमी आली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती झाल्याची अफवा पसरविण्यात आली होती. अगदी काँग्रेस खासदार शशी थरूरदेखील या अफवेला बळी पडले होते. त्यांनी खोटी बातमी ट्विट करून रघुराम राजन यांच्या नियुक्तीची प्रशंसा केली होती.

रघुराम राजन यांनी स्वतःदेखील 2018 साली बँक ऑफ इंग्लंडचे गव्‍‌र्हनर होण्यास उत्सुक नसल्याचे सांगितले होते. लंडनमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, शिकागो विद्यापीठात मला चांगली नोकरी आहे. मी व्यावसायिक बँकर नसून, संशोधक आहे. माझ्या सध्याच्या कामात मी संतुष्ट आहे. मी कुठेही नोकरी किंवा पदासाठी अर्ज केलेला नाही आणि करणारही नाही.

मूळ बातमी येथे वाचा – बिझनेस स्टँडर्डअर्काइव्ह

अँन्ड्रयू बेली यांच्या आधी मार्क कार्ने बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होते. त्यांचा कार्यकाळ 31 जानेवारी 2020 रोजी संपुष्टात आला. त्याआधी 2019 सालीच नव्या गव्हर्नरचा शोध सुरू करण्यात आला होता. त्यावेळी या पदासाठी एकुण सहा संभाव्य उमेदवारांच्या यादीत रघुराम राजन यांचे नाव आघाडीवर आहे.

फायनान्शियल टाईम्स दैनिकाने संभाव्य उमेदवारांची सहा नावे प्रकाशित केली होती. रघुराम राजन यांच्यासह इंग्लंडच्या आर्थिक कर्तव्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँन्ड्रयू बेली, बँक ऑफ इंग्लंडमधील वित्त धोरणाचे डेप्यूटी गव्हर्नर बेन ब्रॉडबेंट, आर्थिक स्थिरतेचे डेप्युटी गव्हर्नर जॉन कनलिफ, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या संचालिका मिनोशे शफिक, सॅन्टँडर यूकेच्या प्रमुख श्रिती वडेरा यांच्या नावांचा समावेश होता. पैकी अँन्ड्रयू बेली यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. 

व्हायरल फोटो कधीचा आहे?

रघुराम राजन यांचा पुष्पगुच्छ घेतलेला हा फोटो भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 23 वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतानाचा आहे. इंडियन एक्सप्रेसचे छायाचित्रकार प्रशांत नाडकर यांनी 5 सप्टेंबर 2013 रोजी हा फोटो काढला होता.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, रघुराम राजन यांची बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी निवड झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही अफवा व्हायरल होत आहे. अँन्ड्रयू बेली बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर आहेत.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:रघुराम राजन यांची बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


Leave a Reply