
स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबर) फुल दुर्मिळ म्हणून समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र पसरत आहे. 50 वर्षांमध्ये एकदाच फूलणारे “ॐ कार पुष्प ” असल्याचा दावाही या छायाचित्रासोबत करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली.
काय आहे पोस्टमध्ये?
स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबर) दुर्मिळ फुल पाठविले आहे. दर्शनाचा लाभ घ्यावा! कृपया झूम करून पहावे. औंदुबराचे फुल कधी कुणास दिसत नाही. दर्शनाचा लाभ घ्यावा!!! 50 वर्षामध्ये एकदाच फूलणारे “ॐ कार पुष्प ” निसर्गाची अगाध लीला !! (पुढे पाठवा कारण आणखी लोक बघू शकतील.)
तथ्य पडताळणी
उंबराच्या झाडाला फुल येते का व जस असेल तर ते कसे असते याविषयी सर्वप्रथम माहिती घेतली. त्यानुसार, उंबराचे फुल दिसत नसल्याचा दावा विकीपीडियावर करण्यात आला आहे. मग हे छायाचित्र कशाचे आहे, याचा शोध घेतला.
पोस्टमधील छायाचित्र रिव्हर्स इमेज केले असता विविध परिणाम समोर आलेत. त्यानुसार, हे छायाचित्र फुलाचे नसून, एका वनस्पतीचे असल्याचे कळाले.
ही छायाचित्रे Cycad वर्गाच्या वनस्पतीच्या प्रजाती असल्याचे दिसून आले. या प्रजातीच्या 111 वनस्पती असून त्यातील 11 वनस्पती भारतात उपलब्ध आहेत. त्यानंतर आम्हाला Cycas Pectinata प्रजातीची प्रतिमा दिसून आली. ती आपण खाली पाहू शकता. ही वनस्पती भारताच्या उत्तर पूर्वेकडील काही भागात आढळून येते. पाम वृक्षाप्रमाणे असलेल्या या झाडाचे वैशिष्टये आणि अन्य माहिती आपण खालील व्हिडिओत पाहू शकता.
या झाडाला फुले येत नसल्याचे या माहितीतून स्पष्ट होते. या झाडाच्या दोन नव्या प्रजाती डॉ. रिटा सिंग, जे.एस. कुरयजाम, पी. राधा यांनी 2015 मध्ये ओडिशामध्ये शोधून काढल्या. Cycadaceae आणि सायकास नायगेरॅनिसिस या त्या दोन नव्या प्रजाती आहेत. डायनासोर अस्तित्वात होते त्या काळापासून त्या अस्तित्वात असल्याचे मानण्यात येते.
Cycads Wiki | Cycas Pectinata Wiki |
The Saturn Herald | Gymnosperm Wiki |
केरळमधील मलाबार येथील वनस्पती उद्यानाचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. कपूर यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही तळहाताच्या आकाराची शंकू आकार वनस्पती असून ती केरळमध्ये आढळते. त्यात नर आणि मादी असे आकार असतात. यातील व्हायरल प्रतिमा ही नर जातीची आहे. हे रोप दरवर्षी फुलते. या वनस्पतीला gymnosperm cycas म्हणतात.
यावरून स्पष्ट होते की, औदुंबराचे दुर्मिळ फुल म्हणून पसरविला जाणारा पोटो मूळात एक वनस्पती आहे.
दरम्यान, चार वर्षांपूर्वी मिरज येथील एका उंबराच्या झाडाला फुल आल्याची अफवा पसरली होती. दैनिक लोकसत्ताच्या संकेतस्थळावरील 9 ऑक्टोबर 2016 रोजीच्या बातमीनुसार, हे फुल म्हणजे झाडाला उमललेल्या फुलासारखी बुरशी असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते. हे छायाचित्रही समाजमाध्यमात चुकीच्या माहितीसह पसरत असल्याचे आम्हाला दिसून आले.
निष्कर्ष
स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे (उंबराचे) दुर्मिळ फुल म्हणून समाजमाध्यमात पसरत असलेले हे छायाचित्र एका शंकाकृती वनस्पतीचे आहे. एका झाडाला आलेल्या बुरशीचे छायाचित्रही समाजमाध्यमात चुकीच्या माहितीसह परत असल्याचे आढळून आले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:हे स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराचे दुर्मिळ फुल नाही. ती तर वनस्पती आहे. वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
