हा फोटो पश्चिम बंगालमध्ये रेल्वेवरील दगडफेकीत जखमी झालेल्या मुलीचा नाही. वाचा सत्य

False सामाजिक

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात देशात प्रदर्शने होत आहेत. काही शहरांमध्ये आंदोलनाला हिंसक वळणदेखील लागले. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काही शहरांत रेल्वेवर दगडफेकीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमिवर एका जखमी मुलीचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, पश्चिम बंगालमधील रेल्वेवरील दगडफेकीत ही मुलगी रक्तबंबाळ झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो बांग्लादेशीमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

डोक्याला जखम झालेल्या मुळे चेहरा रक्ताने झाकोळलेल्या मुलीचे दोन फोटो शेयर करून सोबत लिहिले की, विरोध NRC आणि CAB चा…. कोणासाठी?? तर बांगलादेशी घुसखोरांना वाचविण्यासाठी आणि दगडफेक कोणावर??.. तर आमच्या भारतातल्या लोकांवर पश्चिम बंगाल मधील घटना आहे.. शांतीप्रिय समाजाने शांततेच्या मार्गाने शांत डोक्याने ट्रेन वर केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या या चिमुकलीचा फोटो बघा.. थोडी तरी चीड असेल अंगात तर पोस्ट फॉरवर्ड करा, शेअर करा.. आणि सरकारला कठोर कारवाई करण्यास भाग पाडा.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील फोटो नेमका कुठला आहे हे तपासण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. समोर आलेल्या परिणामांतून कळाले की, हा फोटो 12 नोव्हेंबर 2019 रोजी बांग्लादेशमधील ब्राह्मणबरिया शहराजवळ दोन रेल्वेंची समोरासमोर टक्कर झाली होती. या अपघातात 16 जणांचा मृत्यू आणि सुमारे 100 प्रवासी जखमी झाले होते. अधिक सविस्तर येथे वाचा – युनायटेड न्यूज ऑफ बांग्लादेश

न्यूज-24 लाईफच्या बातमीनुसार, या अपघतात ही मुलगी जखमी झाली होती. या मुलीचे नाव महिमा पहलेखा असून, या अपघातामध्ये तिच्या आईचा मृत्यू झाला. जखमी महिमाला ब्राह्मणबरिया सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या मुलीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर बांग्लादेशमधील मंत्री इनामुल हक शमीम यांनी तिचे कुटुंब मिळेपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली होती. नंतर मुलीच्या काकांनी तिला घरी नेले.

मूळ बातमी येथे वाचा – न्यूज-24 लाईफअर्काइव्हद बिझनेस स्टँडर्डअर्काइव्ह । 

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, पश्चिम बंगालमध्ये रेल्वेवर झालेल्या दगडफेकीत ही मुलगी जखमी झाली नव्हती. हा फोटोच मूळात भारतातला नाही. बांग्लादेशमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या रेल्वे अपघातामध्ये ही मुलगी जखमी झाली होती. हा तेव्हाचा फोटो आहे. त्यामुळे अफवांवर वाचकांनी विश्वास ठेवू नये.

Avatar

Title:हा फोटो पश्चिम बंगालमध्ये रेल्वेवरील दगडफेकीत जखमी झालेल्या मुलीचा नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False