FAKE ALERT: सुमित्रा महाजन महाराष्ट्राच्या राज्यपाल झाल्याची खोटी बातमी व्हायरल. वाचा सत्य

False राजकीय | Political

सलग आठ वेळा इंदुर लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याची किमया करणाऱ्या सुमित्रा महाजन यांना यंदा लोकसभेचे तिकिट देण्यात आले नाही. लोकसभेच्या अध्यक्ष राहिलेल्या महाजन यांना पक्षातर्फे त्याबदल्यात काय मिळते याविषयी कयास लावले जात आहेत. अशातच सोशल मीडियावर वावड्या उठल्या की, त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही माहिती खरी मानून अनेकांनी ती शेयर व लाईक केली. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची सत्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

3 जून, 2019 रोजी केलेल्या या पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीमती सुमित्रा महाजन यांचे हर्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस हर्दिक शुभेच्छा.

तथ्य पडताळणी

सुमित्रा महाजन यांची अशी काही नियुक्ती झाली आहे का याचा गुगलवर शोध घेतला. तेव्हा या आशयाची कोणतीही बातमी समोर आली नाही. सुमित्रा महाजन यांच्या ट्विटर अकांउटवरदेखील याविषयी काही ट्विट केलेले नाही. राज्यपालांची नियुक्ती ही मोठी बातमी असते. ती जाहीर होताच सर्व दैनिकांच्या वेबसाईटवर ती प्राधान्याने चालविली गेली असती. परंतु, तसे काही आढळून आले नाही. याउलट सकाळ आणि दैनिक जागरण दैनिकांनी सुमित्रा महाजन यांना भाजपतर्फे राज्यपालपद दिले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविणारी बातमी दिली आहे.

सकाळच्या 1 जून रोजीच्या बातमीनुसार, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विविध राज्यांचे राज्यपाल बदलण्याची तयारी झाली आहे. त्यानुसार लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना महाराष्ट्राचे राज्यपालपद मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेला उमेदवारी न दिल्याने त्याबदल्यात भाजपतर्फे त्यांचा असा सन्मान करण्यात येण्याची शक्यता बातमीत वर्तविण्यात आली आहे. बातमीत केवळ शक्यता म्हटली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – सकाळअर्काइव्ह

दैनिका जागरणने 31 मे रोजी म्हटले की, सुमित्रा महाजन, सुषमा स्वराज, उमा भारती अशा ज्येष्ठ नेत्यांना लोकसभेचे तिकिट नाकारल्यामुळे त्यांना मोठ्या राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. पक्षातील या दिग्गज नेत्यांचे पुनर्वसन करण्यासाठी भाजपकडून अशा हालचाली सुरू आहेत. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

मूळ बातमी येथे वाचा – दैनिक जागरणअर्काइव्ह

देशाचे राष्ट्रपती पाच वर्षांच्या कार्यकाळाकरिता राज्यपालांची नियुक्ती करीत असतात. त्यामुळे राज्यपाल नियुक्तीची घोषणा सर्वप्रथम राष्ट्रपती कार्यालयाकडूनच प्रसारित केली जाते. राष्ट्रपती कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर सुमित्रा महाजन यांच्या नियुक्तीची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. कार्यालयाद्वारे शेवटचे प्रेस रिलीज 31 मे रोजी काढण्यात आली होती.

मूळ वेबसाईटला येथे द्या – राष्ट्रपती कार्यालय

चेन्नमनेनी विद्यासागर राव हे महाराष्ट्राचे विद्यामान राज्यपाल आहेत. ते तेलंगणा राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहराज्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राचे 17 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती.  महाराष्ट्राच्या राजभवनाच्या अधिकृत वेबसाईटवरसुद्धा नव्या राज्यपालांच्या नियुक्तीचे कोणतेही पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने मग थेट राजभवनाशी संपर्क करून याबाबत पुष्टी करून घेतली. तेथील जनसंपर्क कार्यालयाने माहिती दिली की, राज्यपालांच्या नियुक्तीची माहिती राष्ट्रपती भवनाद्वारे दिली जाते. त्यांनी अद्याप सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्तीची माहिती दिलेली नाही.

त्यानुसार मग आम्ही राष्ट्रपती कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क केला असता सांगण्यात आले की, राष्ट्रपतींच्या सर्व निर्णाय/नियुक्तीची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे राज्यपालांची नियुक्ती झाली की नाही हे खात्रीशीरपणे जाणून घेण्यासाठी राष्ट्रपती कार्यालयाची वेबसाईट तपासावी.

निष्कर्ष

सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली नाही. तशी कोणतीही अधिकृत घोषणा राष्ट्रपती कार्यालयाने अद्याप (4 जून 2019) केलेली नाही. त्यामुळे नियुक्तीची पोस्ट असत्य आहेत.

Avatar

Title:FAKE ALERT: सुमित्रा महाजन महाराष्ट्राच्या राज्यपाल झाल्याची खोटी बातमी व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False