
राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्यावर पत्नीच्या नावावरून टीका करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव सारा खान असल्याचा दावा केला जात आहे. सचिन पायलट यांना त्यांच्या पत्नीचे नाव सारा पायलट करता आले नाही ते राजस्थानचा काय विकास करतील, अशी उपरोधात्मक टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
सचिन पायलट आणि त्यांची पत्नी सारा यांचा फोटो शेयर करून लिहिले की, सचिन पायलट जो अपनी धर्म पत्नी का नाम सारा खान से सारा पायलट नहीं करवा सके, क्या वो राजस्थान का विकास करवा सकते है.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम सचिन पायलट आणि त्यांची पत्नी सारा यांच्याविषयी माहिती घेतली. रेडिफ वेबसाईटवर 15 जानेवारी 2004 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश पायलट यांचे पुत्र सचिन आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लाह यांची कन्या सारा अब्दुल्लाह यांचा 15 जानेवारी 2004 रोजी दिल्लीत विवाह झाला होता. म्हणजेच लग्नापूर्वी सारा यांचे नाव सारा खान नाही तर, सारा अब्दुल्लाह असे होते.

मूळ लेख येथे वाचा – रेडिफ । अर्काइव्ह
पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे सचिन पायलट यांच्या पत्नीचे पूर्वाश्रमीचे आडनाव खान नसून, अब्दुल्लाह आहे. मग लग्नानंतर सारा यांचे नाव काय आहे? लग्नानंतर नाव बदलायचे की नाही हा पूर्णतः त्या मुलीचा निर्णय असतो. तसेच, सचिन पायलट यांनी पत्नीचे नाव बदलण्याचा आणि राजस्थानच्या विकासाचा कोणताही संबंध नाही. परंतु, केवळ तथ्य समोर आणण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी अधिक शोध घेतला.
सचिन पायलट यांनी राजस्थानमधील दौसा आणि अजमेर लोकसभा मतदार संघाचे संसदेत प्रतिनिधित्व केलेले आहे. सध्या ते टोंक विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री आहेत. गेल्यावर्षीच्या राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये सचिन पायलट यांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रात पॅन क्रमाकांच्या विवरण रकान्यात पत्नीचे नाव सारा पायलट असे दिले आहे. खाली दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही ते पाहू शकता. अजमेर येथून 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या वेळी भरलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्यांनी पत्नीचे नाव सारा पायलट असेच दिले आहे.

मूळ प्रतिज्ञापत्र येथे पाहा – अॅफिडेव्हिट 2018
सचिन पायलट यांच्या पत्नीविषयीच्या बातम्यांमध्येदेखील त्यांचे नाव सारा पायलट किंवा सारा अब्दुल्लाह पायलट असे दिले जाते. त्यामुळे त्यांचे नाव सारा खान असा दावा करून पूर्णतः असत्य आहे.

मूळ लेख येथे वाचा – डीएनए । अर्काइव्ह
निष्कर्ष
सचिन पायलट यांच्या पत्नीचे लग्नाआधी नाव सारा अब्दुल्लाह असे होते. लग्नानंतर अधिकृत कागदपत्रांवर त्यांचे नाव सारा पायलट असे दिलेले आहे. त्यामुळे त्यांचे नाव सारा खान होते किंवा त्या पायलट आडनाव लावत नसल्याचा दावा खोटा आहे.

Title:FACT CHECK: सचिन पायलट यांच्या पत्नीने स्वतःचे नाव सारा खान असेच कायम राखले आहे का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
