
भारतातील सर्वात सुंदर लाइट शो, उमेद भवन पँलेस जोधपूर, हा लाईट शो बघायला ३०००/ रुपये प्रती व्यक्ती तिकीट आहे. एक छोटी झलक बघा, अशी माहिती MH.10. Sangli या पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive
तथ्य पडताळणी
जोधपूर येथील उमेद भवन पँलेसमध्ये अशा लाईट शोचे आयोजन करण्यात येते का? यासाठी तीन हजार रुपये प्रती व्यक्ती इतके शुल्क आकारण्यात येते का? याची माहिती घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील दृश्य घेत ती रिव्हर्स इमेज सर्च केली. त्याला आम्हाला अशा लाईट शोचे आयोजन करण्यात येत असल्याचे कोणतेच वृत्त अथवा माहिती दिसून आली नाही. त्यामुळे आम्ही उमेद भवन पँलेसच्या अधिकृत संकेतस्थळाचा शोध घेतला. या संकेतस्थळावरही या लाईट शोबद्दल कोणतीही माहिती नव्हती. या संकेतस्थळावर असलेल्या क्रमांकावर आम्ही संपर्क करुन लाईट शोच्या वेळेविषयी आणि शुल्काविषयी माहिती विचारली. त्यावेळी आम्हाला माहिती देण्यात आली की, उमेद भवन पँलेसमध्ये अशा कोणत्याही लाईट शोचे आयोजन करण्यात येत नाही. त्यानंतर आम्ही त्यांना समाजमाध्यमांमध्ये फिरत असलेल्या व्हिडिओविषयी माहिती दिली. यावर त्यांनी सांगितले की, पुर्वी लाईट शोचे आयोजन करण्यात येत होते. त्यासाठी तीन हजार रुपये इतके शुल्क आकारण्यात येत होते. आता मात्र असा कोणताही लाईट शो होत नाही. राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाला अशा कोणत्या शोची माहिती आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही राजस्थान पर्यटन विभागाशी संपर्क केला. त्यावेळी उमेद भवन पँलेस ही खासगी मालमत्ता असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी अशा कोणत्या लाईट शोचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती विभागाकडे उपलब्ध नसल्याचेही सांगण्यात आले. समाजमाध्यमांमध्ये पसरत असलेला हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याविषयी माहिती नसल्याने आम्ही आमचा शोध पुढे नेला. वेगवेगळे शब्दप्रयोग करत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. dataton.com या संकेतस्थळावर 3 मार्च 2018 रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ एका लग्न समारंभाचा आहे. हा व्हिडिओही आपण या संकेतस्थळावर पाहू शकता.
आमच्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली की, हा व्हिडिओ जोधपूर येथील उमेद भवन पँलेसमध्ये होणाऱ्या लाईट शोचा नाही. तो 3 मार्च 2018 रोजी झालेल्या एका लग्न समारंभातील आहे.
निष्कर्ष
जोधपूर येथील उमेद भवन पँलेसमध्ये सध्या कोणत्याही लाईट शोचे आयोजन करण्यात येत नाही. हा व्हिडिओ उमेद भवन पँलेसमध्ये 3 मार्च 2018 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका लग्न समारंभातील आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या पोस्टसोबत देण्यात आलेली माहिती असत्य असल्याचे सिध्द होत आहे.

Title:Fact check : जोधपूर येथील उमेद भवनमधील या लाईट शोचे सत्य काय?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
