तथ्य पडताळणीः खरंच बसपने संविधान जाळणाऱ्या उमेदवाराला तिकीट दिले का?

False राजकीय

फेसबुकवरील पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, गेल्या वर्षी दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्या राजवीर सिंह नामक एका जणाला बहुजन समाज पक्षाने (बसप) उत्तर प्रदेशमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. यावरून बसप हा पक्ष संविधान विरोधी काम करीत असल्याचे म्हटले जात आहे. ही पोस्ट तुम्ही खाली पाहू शकता. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याच्या पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – शिवाजी शिंदेअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पाहुया की, संविधान जाळण्याचे प्रकरण नेमके काय होते.

यूथ फॉर इक्वॅलिटी फाउंडेशन (आझाद सेना) आणि आरक्षण विरोधी पार्टी या दोन संघटनांनी दिल्ली येथील संसद मार्गावर 9 ऑगस्ट 2018 रोजी संविधानाची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षणाविरोधात घोषणाबाजी केली होती. या घटनेविरोधात अखिल भारतीय भीम सेनेचे राष्ट्रीय प्रमुख अनिल तंवर यांनी 10 ऑगस्ट रोजी संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यासंदर्भात येथे अधिक वाचा – पीटीआयअर्काइव्ह

या घटनेचा व्हिडियोदेखील त्यावेळी व्हायरल झाला होता. एका ट्विटर यूजरने शेयर केलेला व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

अर्काइव्ह

या घटनेचे देशभरात पडसाद उमटले होते. पोलिसांनी तंवर यांच्या तक्रारीनंतर अटकसत्र सुरू केले. नवभारत टाईम्सने 12 ऑगस्ट रोजी दिलेल्या बातमीनुसार, दिल्ली पोलिसांनी आरक्षण विरोधी पार्टीच्या दीपक गौड (वय 40) याला याप्रकरणी अटक केली होती. चौकशी दरम्यान दीपकने सांगितले की, अभिषेक शुक्लासोबत मिळून त्याने संविधानाची प्रत जाळण्याचा निर्णय घेतला होता. एससी/एसटी कायद्यातील सुधारणांना विरोध करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केले होते.

अधिक वाचण्यासाठी येथे वाचा – नवभारत टाईम्सपीटीआयअर्काइव्ह

आता पाहुया की, राजवीर सिंह कोण आहेत.  अमर उजालाने 18 मार्च रोजी दिलेल्या बातमीनुसार, बसप प्रमुख मायावती यांनी राजवीर सिंह यांची फतेहपूर सिक्री लोकसभा प्रभारी म्हणून निवड केली होती. ते दिल्ली येथील मार्बल व्यापारी आहेत.

संपूर्ण बातमी येथे वाचा – अमर उजालाअर्काइव्ह

पीटीआयच्या बातमीनुसार, बसपने लोकसभा निवडणुकीसाठी 22 मार्च रोजी 11 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये फतेहपूर सिक्री मतदार संघातून राजवीर सिंह यांना उमेदवारी मिळाली होती. मूळ बातमी येथे वाचा – पीटीआयअर्काइव्ह

मग राजवीर सिंह यांचा संविधान जाळण्याच्या घटनेशी काय संबंध आहे?

फॅक्ट क्रेसेंडोने दिल्लीतील ज्या संसद मार्ग पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता तेथे संपर्क केला. तेव्हा ठाण्याचे एसएचओ दिनेश कुमार यांनी राजवीर सिंह यांचा संविधानाची प्रत जाळण्याच्या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचे सांगितले. हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे एफआयआरची प्रत दिल्ली पोलिसांच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली नाही.

मग आम्ही दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिलेल्या अनिल तंवर यांच्याशी संपर्क केला. तेव्हा त्यांनीदेखील राजवीर सिंह यांचा संविधान जाळण्याशी काहीच संबंध नसल्याचे सांगितले. त्यांनी आम्हाला या प्रकरणातील एफआयरची (FIR No- 0075, Date- 10/08/2018) प्रत दाखवली. याप्रकरणी Prevention of Insults to National Honours Act, 1971 तसेच आयपीसीच्या 153-ए,  505 आणि 34 कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता.

यामध्ये अभिषेक शुक्ला, संजय शर्मा,  दीपक गौड, आशुतोष कुमार, अनूप दुबे, कृष्ण मोहन राय, रोहित गुप्ता, आशुतोष झा, संतोष शुक्ला, प्रवेश साहनी, कामीनी झा,  श्रीनिवास पांडे यांच्याविरोधात संविधानाची प्रत जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये कुठेही राजवीर सिंह यांचे नाव नाही. यावरून हे स्पष्ट होते की, राजवीर सिंह यांचा संविधानाची प्रत जाळून केलेल्या आंदोलनाशी काहीच संबंध नाही.

विशेष म्हणजे बुधवारी (27 मार्च) बसपने फतेहपूर सिक्री येथून राजवीर सिंह यांच्या नावावर काट मारीत आमदार श्रीभगवान शर्मा उर्फ गुड्डू पंडित यांना उमेदवारी दिली. टाईम्स ऑफ इंडिया आणि नवभारत टाईम्सच्या बातमीनुसार, राजवीर सिंह यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु, त्यांना पक्षाने फॉर्म-बी दिला नव्हता. नंतर त्यांच्या जागी गुड्डू पंडित यांनी बसपतर्फे लोकसभेचा अर्ज भरला.

मूळ बातमी येथे वाचा – नवभारत टाईम्सटाईम्स ऑफ इंडिया

निष्कर्ष

दिल्ली पोलिस आणि मुख्य तक्रारदार यांनी राजवीर सिंह यांचा संविधान जाळल्या प्रकरणाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील एफआयआरमध्येसुद्धा त्यांचे नाव नाही. तसेच राजवीर सिंह आता बसपचे फतेहपूर सिक्री येथील लोकसभा उमेदवारदेखील नाहीत. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणीः खरंच बसपने संविधान जाळणाऱ्या उमेदवाराला तिकीट दिले का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False