
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना विषाणूची लागण होऊ नये, म्हणून सांगितलेला व्यायाम अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कोणाचा आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरांचा म्हणून व्हायरल होणारा हा व्हिडिओ नेमका कुणाचा आहे, याची माहिती घेण्यासाठी यातील एक द्दश्य घेत रिव्हर्स इमेज केले. त्यानंतर एका तामिळ युटूयूब चॅनलवर हा व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, ही व्यक्ती see changes Consulting कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. प्रकाश आहेत. त्यांचा हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.
त्यानंतर गुगलवर शोध घेतल्यावर आम्हाला त्यांचे युटूयूब चॅनल आणि संकेतस्थळ आढळले. एस. प्रकाश यांनी त्यांच्या वैयक्तिक युटूयूब चॅनलवर 4 एप्रिल 2020 रोजी हा व्यायामाचा व्हिडिओ अपलोड केला असल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.
याबाबत एस. प्रकाश यांचे भागीदार आणि कंपनीचे सहसंस्थापक एम. के. आनंद यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधल्यावर ते म्हणाले, हा व्हिडिओ प्रकाश यांचा नाही. त्यांचा व्हिडिओ वेगवेगळ्या नावांनी समाजमाध्यमात पसरत आहे. परंतू हे प्रकाश नाहीत.
एम. के. आनंद यांच्या मदतीने एस. प्रकाश यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या व्हिडिओसोबत समाजमाध्यमात करण्यात येत असल्याचे दावे असत्य असल्याचे सांगितले. केवळ निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी हा व्हिडिओ मी बनवला होता. हा एक साधा व्यायामप्रकार आहे. खूप दिवसापूर्वी मी तो शिकलो आहे. मला तो उपयुक्त वाटल्याने मी तो समाजमाध्यमात सामायिक केला. डॉ. बजाज आणि डॉ. केळकर यांच्या नावाने तो समाजमाध्यमात पसरत आहे.
निष्कर्ष
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरांचा हा व्हिडिओ असल्याचा आणि या व्यायामामुळे कोरोना विषाणूची लागण होत नसल्याचा दावा असत्य आहे. हा एक साधा व्यायामप्रकार आहे.

Title:पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरांचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
