मोबाईलच्या रेडिएशनमुळे स्टीलची घासणी जळू शकते का? काय आहे ‘त्या’ व्हिडियोमागचे सत्य?

False आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

मोबाईल रेडिएशनच्या दुष्परिणामांविषयी अनेक दावे केले जातात. मोबाईलच्या रेडिएशनमुळे मेंदूतीतील तंतू नष्ट होण्यापासून ते पौरुषत्व कमी होण्यापर्यंत सर्रास व्हायरल मेसेज फिरत असतात. यात भर पाडणारा एक व्हिडियो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

या व्हिडियोमध्ये मोबाईल फोनमधून निघणाऱ्या कथित रेडिएशनमुळे स्टीलची घासणीला आग लागल्याचे दाखवले आहे. त्यामुळे झोपताना उशीपाशी मोबाईल न ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा व्हिडियो पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली.

काय आहे व्हिडियोमध्ये?

सुमारे 40 सेंकदाच्या या क्लिपमध्ये स्टीलच्या घासणीचे वर्तुळ करून त्यामध्ये मोबाईल ठेवला आहे. मग त्या मोबाईलवर एक कॉल येतो. जशी फोनची रिंग वाजते तशी घासणी पेट घेते. सोबत म्हटले की, राञी झोपतांना कोणीही डोक्याजवळ,ऊशीजवळ मोबाईल ठेऊऩ झोपु नका मोबाईलचे रेडीएशन बघा. 

फेसबुकवर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडूण गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्हिडियो सर्वप्रथम Viral Video Lab नावाच्या युट्यूब चॅनेलने 27 डिसेंबर 2019 रोजी अपलोड केला होता. ‘आयफोन कशाप्रकारे मेंदुला नुकसान पोहचवू शकतो’ अशा टायटलसह हा व्हिडियो शेयर केलेला होता. चॅनेलतर्फे या व्हिडियोमागचे खरं कारण माहिती नसल्याचे सांगण्यात आले. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर कळेल की, स्टीलच्या घासणीने पेट घेतल्यानंतरही घासणी जशीच्या तशीच राहते. खाली दिलेल्या फोटो क्र. 1 मध्ये फोनची रिंग वाजताच घासणीने पेट घेतल्याचे दिसते. मात्र फोटो क्र 2 मध्ये व्हिडियोच्या शेवटी ही आग विझते आणि घासणी जशी होती तशीच राहते. जर आग लागली असती तर घासणी जळून जायला हवी. पण, तसे झाले नाही. यावरून व्हिडियो सत्यतेविषयी शंका निर्माण होते.

व्हिडियो खरा आहे की, खोटा हे तपासण्यासाठी फोनचे रेडिएशन खरंच अशी आग लावू शकते का? स्टीलच्या घासणीचे गुणधर्म काय? याची टप्प्याने माहिती घेऊ.

1. मोबाईलचे रेडिएशन

मोबाईल फोनमध्ये वापरण्यात येणारे वायरलेस तंत्रज्ञान रेडिओ फ्रिक्वेन्सीवर काम करते. रेडियो फ्रिक्वेन्सी Non-Ionizing रेडिएशन असते. अणुमधून इलेक्ट्रॉन वेगळं करण्याला Ionizing म्हणतात. परंतु, रेडियो फ्रिक्वेन्समध्ये तेवढी ऊर्जा नसते. मोबाईल रेडिएशन साधारण पणे 800 or 900 MHz असते. म्हणजे अत्यंत कमी परिणामकारक असते. त्यामुळे स्टीलच्या घासणीला आग लागू शकत नाही. अधिक माहिती येथे वाचा – फोर्ब्स 

2. स्टीलची घासणी (Steel Wool)

कमी-ग्रेडचे कार्बन स्टील वायर, अॅल्युमिनियम, कांस्य किंवा स्टेनलेस स्टील अशा विविध धातूंना बारीक करून त्यांच्या तंतुचा गोळा करून Steel Wool तयार केले जाते. भांडे व विविध पृष्ठभाग घासण्यासाठी, सफाईसाठी ते काम येतात. स्टील वूल हे अतिशय ज्वलनशील वस्तू आहे. अतिउष्णता किंवा अगदी साध्या 9-व्होल्टच्या बॅटरीनेसुद्धा त्याला आग लावली जाऊ शकते. स्टील वूल ओलं असले तर ते पेट घेऊ शकते. खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये ते तुम्ही पाहू शकता.

वरील व्हिडियोमध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता की, कशाप्रकारे स्टील वूल पेट घेऊ शकते. पेटल्यानंतर स्टील वूल नष्ट होते. तसेच, मोबाईल रेडिएशन Non-Ionizing असते. याचा अर्थ ते स्टील वूलला पेटवू शकत नाही. हा व्हिडियो आणि व्हायरल व्हिडियो पाहिल्यावर लगेच कळते की, मोबाईलमुळे लागलेली आग डिजिटल इफेक्ट आहे.

मग हा व्हिडियो तयार कसा केला असेल?

Snopes वेबसाईटने या व्हडियोला स्लो करून त्यामागील एडिटिंग टेक्निक उजागर केली आहे. त्यानुसार, व्हिडियोमध्ये दिसणाऱ्या ठिणग्या खऱ्या नसून, एडिटिंग सॉफ्टवेयरद्वारे इफेक्ट देऊन टाकण्यात आल्या आहेत. खाली दिलेल्या व्हिडियोतून ते अधिक स्पष्ट होईल.

Tech ARP नावाच्या वेबसाईटनुसार हा व्हिडियो खालील पद्धतीने तयार केला जाऊ शकतो.

1. सर्वप्रथम स्टील वूलमध्ये मोबाईल ठेवून ट्रायपॉडवर कॅमेरा ठेवून तो हलत असल्याचा इफेक्ट देत व्हिडियो तयार करा. 

2. मग फोन काढून घ्या व स्टील वूलला वेगवेगळ्या भागात आग लाव आणि व्हिडियो चित्रित करा.

3. आता पहिल्या व्हिडियोमध्ये हा दुसरा व्हिडियो एडिटिंग सॉफ्टवेयरच्या मदतीने मॉर्फ करा. 

स्टील वूलमध्ये फोन ठेवल्याने खरंच आग लागते का हे पाहण्यासाठी ‘स्नोप्स’ने स्वतः तसे करून पाहिले. अपेक्षेप्रमाणे तसे काही झाले नाही. याचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, मोबाईल रेडिएशनमुळे स्टील वूलला आग लागल्याचा व्हिडियो बनावट आहे. एडिटिंग सॉफ्टवेयरच्या मदतीने डिजिटल इफेक्ट देऊन हा व्हिडियो तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नये.

Avatar

Title:मोबाईलच्या रेडिएशनमुळे स्टीलची घासणी जळू शकते का? काय आहे ‘त्या’ व्हिडियोमागचे सत्य?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •