नागालँडमध्ये भारताचा झेंडा जाळून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला का? वाचा सत्य

False सामाजिक

भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी सोशल मीडियावर भारताचा झेंडा जाळणाऱ्या एका मुलीचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला. एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना नागालँडमध्ये तिरंगा झेंड्याचा जाळून अपमान करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनीसुद्धा हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून फॅक्ट करण्याची विनंती केली.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक

काय पोस्टमध्ये?

15 ऑगस्ट रोजी शेयर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये 26 सेंकदाचा व्हिडियो आहे. यामध्ये एक मुलगी भारताचा झेंडा जाळताना दिसते. असे करीत असताना ती म्हणेत की, Today, I want to burn this flag of occupation and seek your support for the Naga cause (आज मी आमच्यावर कब्जा केलेल्या देशाचा झेंडा जाळून नागालँडच्या लोकांची मदत करण्याचे आवाहन करते.)

युजरने व्हिडियोसोबत कॅप्शन दिली की, आज भारत जश्न-ए-आजादी मना रहा हैऔर नागालैंड में तिरंगा जलाकर तिरंगा का अपमान किया जा रहा है…!! नागालैंड के लोग भले ही कुछ भी करते रहेलेकिन गद्दार मुसलमान है..!

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडियो नेमका काय आहे याची पडताळणी केली. यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हा व्हिडियो 2017 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आढळले. युट्यूबवर 22 ऑगस्ट रोजी Nagaland wants freedom and support Pakistan या नावाने अपलोड केलेला व्हिडियो दीड मिनिटांचा आहे. यामध्ये सदरील मुलगी म्हणते- 

“पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. तुमच्याप्रमाणेच आम्हीसुद्धा 14 ऑगस्ट हा दिवस नागालँडचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो. कारण पाकिस्तानप्रमाणे नागालँडलासुद्धा याच दिवशी इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले होते. दुर्दैवाने आम्ही स्वतंत्र राहू शकलो नाही. भारताने नागालँडचा ताबा घेऊन आम्हाला गुलाम बनविले. काश्मीर आणि शीखांप्रमाणेच नागालँडची जनतासुद्धा ब्राम्हणी दहशतवादापासून मुक्तीसाठी लढत आहे. आज मी भारताचा झेंडा जाळून नागालँडला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुम्हाला (पाकिस्तान) मदतीसाठी आवाहन करते.”

यानंतर ही मुलगी भारताचा झेंडा जाळते. पुढे म्हणते की, “आम्ही भारतीय नाही आणि आमची भूमी भारताची नाही. 15 ऑगस्ट आमच्यासाठी काळा दिवस आहे. नागालँडचा स्वतःचा इतिहास, संस्कृती, भाषा, देश आणि सैन्य आहे. आता आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे.” आणि शेवटी महात्मा गांधीचे म्हणने दिले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – न्यू इंडियन एक्सप्रेसअर्काइव्ह

न्यू इंडियन एक्सप्रेस आणि झी-24 बांग्ला वगळता कोणत्याही मोठ्या मीडियाने या बातमीला 2017 मध्ये प्रसिद्धी दिली नाही. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत या व्हिडियोच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. नागालँड क्राईम ब्रांचने माहिती दिली की, या व्हिडियोसंदर्भात त्यांच्याकडे तक्रात आली नव्हती. हा व्हिडियो भारतात चित्रित करण्यात आला की, बाहेर याची चौकशी केली जाईल, असे सायबर शाखेचे उपाधीक्षक व्ही. एम. होमे यांनी सांगितले. 

याचा अर्थ हा व्हिडियो दोन वर्षांपूर्वीचा आहे. तसेच या व्हिडियोतील मुलगी नागालँडमधील आहेच याचा कोणताही पुरावा नाही. सदरील मुलीने नागालँडच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानची मदत मागितल्यामुळेदेखील अनेकांनी या व्हिडियोच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

निष्कर्ष

नुकतेच पार पडलेल्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पसरविल्या जाणाऱ्या व्हिडियोमुळे भ्रम निर्माण होत आहे. एक तर ही घटना यंदा घडलेली नाही. तसेच दोन वर्षांपूर्वी आलेल्या या व्हिडियोच्या सत्यतेबाबतही काही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आज भारत जश्न-ए-आजादी मना रहा है…और नागालैंड में तिरंगा जलाकर तिरंगा का अपमान किया जा रहा है…!! हा दावा चुकीचा ठरतो.

Avatar

Title:नागालँडमध्ये भारताचा झेंडा जाळून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False