FACT CHECK: अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का?

False राजकीय

अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष खासदार म्हणून निवडूण आलेल्या नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. पुराव्यासाठी पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटोदेखील शेयर केला आहे. महाराष्ट्रातील एकमेव अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणा यांनी निकालानंतर खरंच भाजपमध्ये प्रवेश केला का? याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाह – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

खासदार नवनीत राणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पत्र स्वीकारतानाचा फोटो शेयर करून त्यासोबत लिहिले की, अमरावतीच्या खासदार नवनित राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश! फोटोमध्ये नवनीत यांचे पती रवी राणा आणि आणखी एक व्यक्तीसुद्धा आहे.

तथ्य पडताळणी

नवनीत राणा यांनी खरंच भाजपमध्ये प्रवेश केला का याचा शोध घेतला. गुगलवर अलिकडच्या काळात अशी काही बातमी आल्याचे आढळले नाही. भाजप, देवेंद्र फडणवीस किंवा स्वतः नवनीत राणा यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरदेखील अशी काही माहिती उपलब्ध नाही. राज्यातील एकमेव अपक्ष उमेदवार असलेल्या राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे राजकीय वर्तुळातील मोठी बाब ठरेल. असे झाले असते तर दैनिकांमध्ये यासंबंधी बातमी नक्कीच आली असती. परंतु, तसे काही झालेले नाही.

विविध कीर्वड्सने शोध घेताना दैनिक जागरणने 2017 साली दिलेली एक बातमी सापडली. यामध्ये म्हटले होते की, 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभेला लढलेल्या नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. एवढेच नाही तर बातमीत नवनीत यांच्या प्रवेशानंतर त्यांचे पती आमदार रवी राणा हेदेखील भाजपमध्ये दाखल होतील, असेही म्हटले आहे. गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये (2014) रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.

मूळ बातमी य़ेथे वाचा – दैनिक जागरणअर्काइव्ह

नवनीत राणा यांनी 2017 भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. त्यांनी यंदा अपक्ष म्हणून निवडणूक जरी लढविली असली तरी त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा पाठिंबा होता. रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष महाआघाडीत सहभागी झाल्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा नवनीत राणा यांच्यासाठी सोडण्यात आली होती. मागच्या लोकसभेला राणा यांचा शिवसेनेकडून पराभव झाला होता.

यावरून हे तर स्पष्ट होते की, नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती नाही. मग पोस्टमध्ये दिलेल्या फोटोची सत्यता काय? याचा फॅक्ट क्रेसेंडोने शोध घेतला. नवनीत राणा यांचे अधिकृत फेसबुक अकाउंटची तपासणी करताना 12 जून 2019 रोजीची एक पोस्ट सापडली. यामध्ये नवनीत राणा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोसुद्धा आहे. नवनीत राणा यांनी शेयर केलेल्या या पोस्टनुसार, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीमध्ये रोजगार निर्मितीसाठी हरमन फिनोकेम कंपनीला 125 एकर जागा देण्याची आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या हातात जे पत्र आहे ते या मागणीचे निवेदन आहे. फोटोत आमदार रवी राणा आणि हरमन फिनोकेमचे संचालक भुपेंद्रसिंग मन्हस दिसत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोने अमरावतील राजकीय सुत्रांकडे विचारणा केली असता नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याची माहिती मिळाली. रवी राणा यांच्या स्वीय सहाय्यक यांनीही हा फोटो मुख्यमंत्र्याशी उद्योग-रोजगारनिर्मितीसंबंधी केलेल्या बैठकीतील असल्याचे सांगितले.

निष्कर्ष

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यांनी 12 जून रोजी उद्योग-रोजगारनिर्मितीसंबंधी केलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना निवेदन देतानाचा फोटो पक्षप्रवेशाचा म्हणून चुकीच्या पद्धतीने पसरविला जात आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK: अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False