JNU हल्ल्यात या SFI कार्यकर्त्याने मारहाणीचा बनाव केला होता का? विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वसतिगृहात झालेल्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण करण्यात आली. यात जखमी झालेला स्टुडेंट फेडरेशन ऑफ इंडियाचा (एसएफआय) कार्यकर्ता सूरी कृष्णन याचे हात व डोक्याला पट्टी बांधलेले फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले. परंतु, या फोटोंची आणि विमानतळावरील त्याचे धुमधडाक्यात झालेल्या स्वागताचे फोटो यांची तुलना करून त्याने मारहाण झाल्याचा बनाव केल्याचे सूचित केले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये युजरने लिहिले की, “परवा JNU मध्ये झालेल्या वादात लेफ्ट च्या SFI संघटनेचा एक नेता, सूरी हा “गंभीर” (तसे म्हणायचं) जखमी झाले, ICU त भरती झालेत. त्याचे दोन्ही हात तुटले त्यामुळे त्याला व्हील चेयर वर बसवले गेले, इतके मारले त्याला भगव्या लोकांनी. आणि अवघ्या 24 तासांच्या आत, डॉक्टरांनी अथक परिश्रमाने त्यांच्यावर चमत्कारिक उपचार केल्याने, ते काल अगदी ठणठणीत बरे होऊन अगदी वाजत गाजत घोषणा करत केरळ ला रवाना झालेत.”

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

पोस्टमधील फोटोंना रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, फोटोत दिसणारा व्यक्ती जेएनयूचा विद्यार्थी व स्टुडेंट फेडरेशन ऑफ इंडियाचा (SFI) कार्यकर्ता सूरी कृष्णन आहे. टेलिग्राफने दिलेल्या बातमीनुसार, सूरीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी मारल्याचा आरोप करण्यात आला होता. सूरीने जखमी होण्याचे नाटक केल्याचा सोशल मीडियावर आरोप होऊ लागल्यानंतर त्याने व्हिडियोद्वारे स्पष्टीकरण दिले होते. ते तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

या व्हिडियोमध्ये सूरीने त्याला लागलेल्या जखमा दाखवल्या. व्हडियोमध्ये स्पष्ट दिसते की, त्याच्या कपाळावर मारहाणीचे निशाण आहे, डोक्याला 5-6 टाके पडलेले आहेत. सूरीने म्हटले की, ‘त्या दिवशी जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्यात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली. त्यामध्ये डोक्याला टाके पडले असून, हाताला जबर मार लागला आहे. टाके दिले असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने मी डोक्याची पट्टी काढली. मोठ्या मुश्किलीने मला हात हालवता येत आहे.’

पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे सूरीला ” ICU त भरती” किंवा त्याचे “दोन्ही हात तुटले” नव्हते. सूरी यांच्यावर एम्समध्ये उपचार करण्यात आले होते. इंडिया टुडेने त्यांचा मेडिकल रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, सुरीच्या डोक्याला 6 इंचाची जखम झाली होती. हाताला मुक्का मार लागलेला आहे. यामध्ये कुठेही गंभीर हात फ्रॅक्चर झाल्याचे म्हटलेले नाही. 

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडे

सूरीवर पाच जानेवारी रोजी उपचार करण्यात आले. त्यानंतर सात जानेवारी रोजी तो केरळला घरी गेला. तेव्हा त्याचे एसएफआयतर्फे तिरुवनंतपूरम विमानतळावर स्वागत करण्यात आले होते. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सूरी कृष्णन यांना जेएनयूमध्ये खरंच मारहाण झाली होती. जखमी होण्याचे त्यांना नाटक केले नव्हते. परंतु, पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे त्यांचा हात तुटला नव्हता. त्याच्या डोक्याला टाके पडले असून, हाताला केवळ मार लागला आहे. म्हणून विमानतळावर सूरीच्या डोक्यावर आणि हाताला पट्टी नाही.

Avatar

Title:JNU हल्ल्यात या SFI कार्यकर्त्याने मारहाणीचा बनाव केला होता का? विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •