नरेंद्र मोदी खरंच म्हणाले का – हिंदुंच्या विश्वासासाठी मुस्लिमांना मारणे गरजेचे होते?

False राजकीय

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नावे मुस्लिमद्वेषी आणि राम मंदिरासंबंधी वादग्रस्त विधान केल्याचा प्रचार केला जात आहे. त्यासाठी हिंदी वर्तमानपत्रांतील बातम्यांचे कात्रण शेयर केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्यांची सत्य पडताळणी केली.

अर्काइव्ह

पोस्टमध्ये राम मंदिर कधीच बांधले जाणार नाही, असे अमित शहा म्हटल्याची एक बातमी आहे. दुसरी बातमी नरेंद्र मोदी यांच्याविषयी आहे. हिंदुंचा विश्वास टिकविण्यासाठी मुस्लिम आणि शेतकऱ्यांना मारणे गरजेचे होते, असे ते म्हटल्याचे बातमीचे शीर्षक आहे.

तथ्य पडताळणी

पोस्टमधील कात्रणांमधील बातम्याचे केवळ शीर्षक वाचता येते. बातमीतील मजकूर फार अंधुक आहे. या बातम्या कधी आणि कोणत्या वर्तमानपत्रात छापून आल्या हेसुद्धा दिलेले नाही. या बातम्यांची लिंकदेखील दिलेली नाही.

या बातम्यांची सत्यता तपासण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह असे म्हणाले होते का हे तपासले. परंतु, इंटरनेटवर या बातम्या किंवा ते असे म्हणाल्याचे आढळले नाही. बातम्यांमध्ये दिलेले वक्तव्य आणि त्याची गांभीर्यता लक्षात घेता, मोदी-शाह जर असे म्हणाले असते तर नक्कीच त्याची मोठी बातमी झाली असती. त्याची भरपूर चर्चाही झाली असती. परंतु, तसे काहीच आढळले नाही.

मग आम्ही या फोटोला यांडेक्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून अंकुर सिंग नावाच्या व्यक्तीचे एक ट्विट आढळले. त्याने 28 ऑगस्ट 2018 रोजी केलेल्या या ट्विटमध्ये मोदी आणि शाह यांच्या बातम्यांचे कात्रण खोटे असल्याचे म्हटले. सोबत मुलायम सिंग यांच्या एका बातमीचे कात्रण दिले आहे.

अर्काइव्ह

मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्यासाठी हिंदुंवर गोळीबार करणे आवश्यक होते, असे मुलायम सिंग म्हटल्याची ही अमर उजाला या वर्तमानपत्रातील बातमी आहे. अमर उजालाच्या वेबसाईटवर आम्हाला ती बातमी सापडली. गोली नहीं चलवाता तो मुसलिमों का भरोसा टूट जाता या मथळ्याखाली 7 फेब्रुवारी 2014 रोजी ती प्रसिद्ध करण्यात आली होती. संपूर्ण बातमी येथे वाचा – अमर उजालाअर्काइव्ह

ऑनलाईन बातमीचे शीर्षक वर्तमानपत्रातील बातमीपेक्षा वेगळे आहे. करहल येथील एका सभेत मुलायम सिंग यांनी असे वक्तव्य केले होते.

अमर उजालाच्या बातमीचे कात्रण आणि फेसबुक पोस्टमधील कात्रणा यांची तुलना केली असता, हे स्पष्ट होते की, मोदींची बातमी फोटोशॉप करून एडिट करण्यात आलेली आहे. शिवाय मोदींच्या मथळ्यात व्याकरणाच्या चुका आहेत. मुस्लिमों आणि किसानों या शब्दांमध्ये स्वल्पविराम (,) दिलेला नाही.

आता राहिली अमित शाह यांच्या बातमीची सत्यता तर, गुगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे आम्हाला रिपब्लिक टीव्हीच्या एका ट्विटखाली अनिलकुमार शुक्ला नावाच्या एका व्यक्तीचे ट्विट सापडले. यामध्ये अखिलेश यादव यांच्या एका बातमीचे कात्रण दिले आहे.

अर्काइव्ह

बातमीतील मजकुरावरून शोध घेतला असता ती बातमी जागरण दैनिकाच्या वेबसाईटवर आढळली. 84 कोसी परिक्रमा पर गरमायी सियासत नावाची बातमी 23 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. ही बातमी येथे वाचा – जागरणअर्काइव्ह

विश्व हिंदु परिषदेच्या 84 कोसी परिक्रमावर उत्तर प्रदेश सरकारतर्फे बंदी घालण्यावरून सुरू असलेल्या वादाची ही बातमी आहे. यामध्ये अखिलेश यादव राम मंदिर होऊ न देणार नाही असे म्हटलेले नाही. त्यामुळे कात्रणातील बातमी जरी सत्य असली तरी शीर्षक फोटोशॉप करून बदलण्यात आले आहे.

जागरणची बातमी आणि फेसबुकमधील अमित शाह यांची बातमी यांची तुलना केल्यावर स्पष्ट होते की, अमित शाह यांची बातमी पूर्णतः खोटी असून फोटोशॉप करून तयार करण्यात आली आहे.

निष्कर्ष

अमर उजाला आणि जागरण या वृत्तपत्रांमधील बातम्यांशी छेडछाड करून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविषयी खोट्या बातम्या तयार करण्यात आल्या आहेत. केवळ शीर्षक वाचण्यायोग्य ठेवून बातमीतील मजकुर अंधुक करण्यात आला आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:नरेंद्र मोदी खरंच म्हणाले का – हिंदुंच्या विश्वासासाठी मुस्लिमांना मारणे गरजेचे होते?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False