सत्य पडताळणी: नरेंद्र मोदींच्या समर्थनात पाकिस्तानात खरंच मोर्चा काढण्यात आला का?

False राजकीय

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ भारतच नाही तर, पाकिस्तानातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन मिळत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर आता तेथील नागरिकांनी एक पाऊल पुढे जाऊन मोदींच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याचा व्हिडियो प्रसारित केला जात आहे. हा व्हिडियो बलुचिस्तानमधील असल्याचे म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये युट्यूबवरील एका 1.54 मिनिटांच्या व्हिडियोची लिंक शेयर करण्यात आली आहे. ‘नरेंद्र मोदींच्या समर्थनात पाकिस्तानात मोर्चा!’ असे व्हिडियोचे शीर्षक आहे. व्हिडियोमध्ये काही महिला आणि पुरुष भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन मोदींच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत. मग खरंच हा मोर्चा पाकिस्तानात निघाला का?

तथ्य पडताळणी

पाकिस्तानमध्ये असा काही मोर्चा निघाला का याचा गुगलवर शोध घेतल्यावर तसे काही आढळून आले नाही. म्हणून मग लक्ष व्हिडियोकडे वळविले. व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर काही बाबी लक्षात येतात.

  • एकापेक्षा अधिक ठिकाणावरील क्लिप एकत्र करून हा व्हिडियो तयार केलेला आहे.
  • व्हिडियोमध्ये भारतीय जनता पार्टी जिंदाबाद, जीत हमारी इन्शाह अल्लाह, नरेंद्र भाई कदम बढाओ, अमित शहाजी कदम बढाओ हम तुम्हारे साथ है या घोषणा दिलेल्या आहेत
  • आर्मीच्या वर्दीतील जवानसुद्धा बंदोबस्त करताना दिसतात.
  • व्हिडियोच्या एकदम सुरुवातीला उभी असलेली जीप टाटा कंपनीची आहे.
  • लोकांनी भाजपचे झेंडे हाती घेतलेले आहेत.

व्हिडियोमधील लोक नरेंद्र मोदी आणि अमित शहा बरोबरच सोफी साहब यांच्या नावानेदेखील घोषणा देत आहेत. ते “सोफी साहब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” म्हणताना स्पष्ट ऐकले जाऊ शकते. मोदींच्या समर्थनातील मोर्चामध्ये हे सोफी साहब कोण याविषयी कुतुहल निर्माण होते. तसेच व्हिडियोमध्ये एका व्यक्तीला हारतुरे घातलेले आहे. जणु काही हे लोक त्याचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे रॅलीतील हा व्यक्ती कोण हे शोधणे महत्त्वाचे आहे.

सोफी साहब तुम आगे बढो असे गुगलवर शोधले असता पंजाब केसरी दैनिकाने युटुयूबवर अपलोड केलेला एक व्हिडियो समोर आला. अनंतनाग से BJP उम्मीदवार Sofi Yousuf ने भरा नामांकन, लोगों में दिखा जबरदस्त जोश, असे या व्हिडियोचे नाव आहे. यामध्येदेखील सोफी साहब तुम आगे बढो अशा घोषणा दिलेल्या आहेत. व्हिडियोनुसार, जम्मू काश्मीर येथील अनंतनाग मतदारसंघातून भाजपतर्फे सोफी युसूफ यांनी 30 मार्चला लोकसभेचा अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी काढलेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद लाभला. हा व्हिडियो खाली दिलेला आहे.

भाजपच्या जम्मु काश्मीर विभागाने ट्विटकरून तेथील उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यानुसार, भाजपने पहिल्या यादीत अनंतनाग येथून सोफी युसूफ, बारामुल्ला येथून मोहम्मद मकबूल वार आणि श्रीनगर येथून खालिद जहांगीर यांना उमेदवारी दिली होती. अनंतनाग येथे सोफी युसूफ यांच्यासमोर पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे हस्नैन मसूदी यांचे आव्हान आहे. याविषयी अधिक येथे वाचा – डेक्कन हेराल्ड

भाजपच्या जम्मु काश्मीर विभागाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सोफी युसूफ अर्ज दाखल करण्यासाठी जात असतानाचा एक व्हिडियो शेयर करण्यात  आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. हा व्हिडियो 31 मार्च रोजी शेयर करण्यात आला होता. यामध्ये लिहिले की, अनंतनागमध्ये मोदी मोदीचा जयघोष. हजारो कार्याकर्त्यांच्या उपस्थित भाजपचे लोकसभा उमेदवार सोफी युसूफ यांनी अनंतनाग येथे अर्ज दाखल केला.

अर्काइव्ह

फास्ट काश्मीर या दैनिकाने 30 मार्च रोजी खाली दिलेला व्हिडियो अपलोड केला होता. हा व्हिडियो सोशल मीडियावर पाकिस्तानचा म्हणून फिरवला जाणाऱ्या व्हिडियोशी मिळताजुळता आहे. यावरून हे स्पष्ट होते की, काश्मिरमधील अनंतनाग येथील भाजप उमेदवाराच्या रॅलीचा व्हिडियो पाकिस्तानमधील असल्याचा खोटा दावा केला जात आहे.

फेसबुक

निष्कर्ष

नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ पाकिस्तानमध्ये मोर्चा काढण्यात आलेला नाही. तसा व्हिडियो भारतातीलच आहे. काश्मिरमधील अनंतनाग येथून भाजपकडून लढत असलेले सोफी युसूफ यांचा निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी 30 मार्च रोजी काढलेल्या मोर्चाचा हा व्हिडियो आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:सत्य पडताळणी: नरेंद्र मोदींच्या समर्थनात पाकिस्तानात खरंच मोर्चा काढण्यात आला का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False