FALSE ALERT: कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी शशी थरूर यांनी ड्राफ्ट तयार केला होता का?

False आंतरराष्ट्रीय राजकीय

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) बुधावारी भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश न्यायालयाने पाकिस्तानला दिले. यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडण्यासाठी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ड्राफ्ट तयार केला होता. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

कुलभूषण जाधव प्रकरणी भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि शशी थरूर यांचा फोटो शेयर करून म्हटले आहे की, विश्वकप आणि चंद्रयान करीता मोदी यांना श्रेय देणारा मीडिया हे सांगणार नाही की, आंतरराष्ट्रीय कोर्टात केस लढविणारे हरीश साळवे आणि त्यांना ड्राफ्ट बनवून देणारे शशी थरूर दोघेही काँग्रेस पक्षाचे आहेत.

तथ्य पडताळणी

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी हरीश साळवे यांना कुलभूषण जाधव प्रकरणात ड्राफ्ट तयार करून दिला का याचा गुगलवर याचा शोध घेतला असता अनेक बातम्या समोर आल्या. विशेषतः इंडिया टुडेने 11 एप्रिल 2017 रोजी दिलेल्या बातमीत माहिती दिली होती की, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारताने याविरोध निषेध व्यक्त केला. यानंतर तत्कालिन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शशी थरूर यांना पाकिस्तानची निंदा करणारा ठराव तयार करण्याची विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने या ठरावाच्या मसुद्याला मंजुरी दिल्यानंतर तो संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार होता.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडेअर्काइव्ह

म्हणजे शशी थरूर यांना केवळ संसदेत मांडण्यात येणाऱ्या ठरावाचा मसुदा तयार करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडण्याचे काम दिले नव्हते. 

सुषमा स्वराज यांचा नकार

येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इंडिया टुडेच्या बातमीमध्येच सर्वात खाली लिहिलेले आहे की, शशी थरूर यांना संसदेतील ठराव तयार करण्याचे काम दिल्याचे वृत्त खोटं असल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले. स्वराज यांनी स्वतः ट्विट करून थरूर यांना ठराव तयार करण्याची विनंती केली नसल्याचे स्पष्ट केले.

सुषमा स्वराज यांनी इंडिया टुडेच्या या बातमीची लिंक ट्विट करून या बातमीचे खंडन केले. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, माझ्या मंत्रालयात प्रतिभावान लोकांची कमी नाही. माझ्याकडे सक्षम सचिवांची मदत उपलब्ध आहे. हे ट्विट तुम्ही खाली वाचू शकता.

अर्काइव्ह

आज तकनेदेखील सुषमा स्वराज यांच्या नकाराची बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीचा स्क्रीनशॉट तुम्ही खाली वाचू शकता. या व्यतिरिक्त एनडीटीव्हीनेसुद्धा सुषमा स्वराज यांनी खुलासा केल्यानंतर बातमीत बदल केला होता.

मूळ बातमी येथे वाचा – आज तकअर्काइव्ह

यावरून हे सिद्ध होते की, कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडण्यासाठी शशी थरून यांनी ड्राफ्ट तयार केला नव्हता. उलट संसदेत मांडण्यात येणाऱ्या निंदा ठरावाचा मसुदा तयार करण्याची त्यांना जबाबदारी दिल्याचे वृत्त होते. परंतु, सुषमा स्वराज यांनी त्याचेही खंडन केले.

हरीश साळवे यांचे काँग्रेस कनेक्शन

पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, वकील हरीश साळवे काँग्रेस पक्षाचे आहेत. हे खरं आहे का?

हरीश साळवे देशातील लोकप्रिय आणि सर्वात महागड्या वकिलांपैकी एक आहेत. ते वाजपेयी सरकारच्या काळात (1999-2002) भारताचे महाधिवक्तासुद्धा होते. ते कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य असल्याचे माहिती उपलब्ध नाही. परंतु, त्यांचे वडील नरेंद्रकुमार साळवे काँग्रेसचे नेते होते.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया एक्सप्रेसवन इंडियालोकसत्ता

हरीश साळवे यांचे वडील काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. मध्यप्रदेशमधील बेतुल लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार (1967–1977) होते. त्यानंतर ते 1978 ते 2002 दरम्यान राज्यसभेचे खासदार होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पी. व्ही नरसिंहराव यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी मंत्रीपद भूषविले. तसेच ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत. याचा अर्थ की, हरीश साळवे नाही तरी, त्यांचे वडील काँग्रेसचे नेते होते. (संदर्भः इंडिया टुडेविकीपीडिया)

निष्कर्ष

शशी थरूर यांनी कुलभूषण जाधव यांच्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात ड्राफ्ट तयार नव्हता. सुषमा स्वराज यांनीसुद्धा हे वृत्त खोटं असल्याचा खुलासा केला होता. तसेच हरीश साळवे यांचे वडील काँग्रेसचे नेते होते. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FALSE ALERT: कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी शशी थरूर यांनी ड्राफ्ट तयार केला होता का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False