नरेंद्र मोदींच्या रॅलीत केजरीवालांचा जयघोष? बनावट व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

Altered राजकीय

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी पार पडले. सलग 27 वर्षे गुजरातमध्ये सत्ता राखून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रचाराच्या आघाडीवर होते. त्यांनी सुरतमध्ये काढलेल्या भव्य रोड शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओत त्यांच्यासमोर लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनात घोषणा दिल्याचे ऐकू येते. दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरत येथील रॅलीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा जयघोष झाला.  

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

आमच्या पडताळणीत हा बनावट असल्याचे समोर आले आहे.

काय आहे दावा ?   

व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी गाडीतून रस्त्याच्या कडेला जमलेल्या लोकांना अभिवादन करत जात असताना ‘केजरीवाल, केजरीवाल, केजरीवाल’ असे नारे ऐकू येतात. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “गुजरात निवडणूक प्रचार दौऱ्यादरम्यान मोदीजींच्या रोडशोमध्ये केजीरीवालांचा नामघोष.

मुळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओ संबंधित कीव्हर्ड सर्च केले असता फेसबुकवर हाच व्हिडिओ आढळला परंतु, त्यामध्ये केजरीवाल यांच्या नावाचे नारे ऐकू येत नाहीत. 

अमरेश गुप्ता उमंग नामक व्यक्तीने शेअर केलेला व्हिडिओ खाली पाहू शकता. सुरतमध्ये 27 नोव्हेंबर रोजी झालेल्या रोड शोमधील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ‘मोदी, मोदी’ असे नारे लावले जात आहेत. 

मुळ पोस्ट – फेसबुक | अर्काइव्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युट्यब चॅनलवर या रोड शोचा संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे. मोदींसाठी रस्त्याच्या दुर्तर्फा मोठी गर्दी जमा झाली होती. मोठ्या संख्येने लोक मोदींच्या नावाच्या घोषणा देत होते.

संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर कळते की, रॅलीमध्ये कुठेही केजरीवाल यांच्या नावाचे नारे लावलेले गेलेले नाहीत. 

याच युट्यूब चॅनेलवर ‘मोदी, मोदी’च्या घोषणा ऐकू येणारा व्हिडिओ आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. 

मूळ व्हिडिओ आणि व्हायरल व्हिडिओ यांची तुलना केल्यावर फरक लगेच लक्षात येतो की, केजरीवाल यांच्या घोषणा एडिट करून टाकण्यात आल्या आहेत. 

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. नरेंद्र मोदींच्या सुरत रॅलीमध्ये लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या नावाचे नारे लावले नव्हते.  खोट्या दाव्यासह बनावट व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नरेंद्र मोदींच्या रॅलीत केजरीवालांचा जयघोष? बनावट व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Altered