योगी आदित्यनाथ यांनी पोलिस हवालदाराच्या अंत्यसंस्काराची राख कपाळाला लावली नाही; वाचा सत्य

False राजकीय | Political

उत्तर प्रदेशमधील बसपा आमदार राजू पाल खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांची 24 फेब्रुवारी रोजी भर दिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आली. पूर्व खासदार अतीक अहमद यांच्या साथीदारांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये उमेश पाल यांचा सुरक्षारक्षक पोलिस हवालदार संदीप निषाद यांचासुद्धा मृत्यू झाला. 

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमाने दावा केला जात आहे की,  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिस हवालदार संदीप निषादच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून चितेची राख कपाळावर लावली. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ गेल्या वर्षी योगी आदित्यनाथ होळीची रक्षा कपाळावर लावतानाचा आहे. 

काय आहे दावा ?

30 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये योगी आदित्यनाथ कपाळावर राख लावताना दिसतात. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, “प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडात शहीद झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या अंत्यसंस्कारातील राख भस्म म्हणून कपाळाला लावणारा मुख्यमंत्री याची देही याची डोळा पहायला मिळाला.”

मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह

हाच व्हिडिओ नुकतेच शहीद झालेल्या भारतीय सैनिकाच्या अंत्यसंस्काराचा असल्याचा म्हणूनही व्हायरल होत आहे.

तथ्य पडताळणी

व्हिडिओतील कीफ्रेम्सवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की हा व्हिडिओ एका वर्षापूर्वीचा आहे. 

खासदार प्राची साध्वी यांनी 22 मार्च रोजी 2022 योगी आदित्यनाथांचा हा व्हिडिओ ट्विट केला होता. त्यात म्हटले आहे की, योगी आदित्यनाथ होळीची राख कपाळाला लावत होते.

टीव्ही-9 नुसार 17 मार्च 2022 रोजी योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथे होलिका उत्सव साजरा केला होता. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. 

फॅक्ट क्रेसेंडोने गोरखपुरचे स्थानिक पत्रकार मार्कंडेय मणि त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओ गोरखपुरच्या गोरखनाथ मंदिरातील आहे. योगी आदित्यनाथ प्रथेनुसार होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी कपाळाला राख लावून दर्शन घेत होते. 

गोरखपुरचे जिल्हाधिकारी विनीत कुमार सिंह यांनीदेखील फॅक्ट क्रेसेंडोकडे या व्हिडिओची पुष्टी केली. त्यांनी स्पष्ट केले की, व्हायरल व्हिडिओ पोलिस हवालदार संदीप निषाद यांच्या अंत्यसंस्काराचा नाही. 

संदीप निषाद यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

मृत पोलिस हवालदार संदीप निषाद यांच्या कुटुंबाला उत्तर प्रदेश सरकारकडून 50 लाखर रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. पोलिस अधीक्षक अनुराग गर्ग यांनी बिसईपूर येथे संदीप यांची वडिल संतलाल यांच्याकडे मदतीचे कागदपत्र सोपवले. 

निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये योगी आदित्यनाथ उमेश पाल हत्याकांडात मृत्यू झालेल्या पोलिस हवालदाराच्या अंत्यसंस्काराची राख कपाळाला लावत नव्हते. हा व्हिडिओ गेल्या वर्षीच्या होळीचा आहे. जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:योगी आदित्यनाथ यांनी पोलिस हवालदाराच्या अंत्यसंस्काराची राख कपाळाला लावली नाही; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False