शत्रुचे मुंडके आणले म्हणून या भारतीय सैनिकाचे कोर्ट मार्शल करण्यात आलेले नाही. हा नाटकातील फोटो आहे. वाचा सत्य

False सामाजिक

न्यायालयात रडणाऱ्या एका सैनिकाचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैनिकाचे कापलेल डोकं नेताना पाहिल्यानंतर एका भारतीय फौजीने मागे पळत जाऊन दोन शत्रू सैनिकांना ठार करीत त्यांचे मुंडके घेऊन आला होता. परंतु, हा पराक्रम करणाऱ्या सैनिकाला परवानगी न घेता असे केले म्हणून सैन्यातून काढण्यात आले. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची पडताळणी केली असता हे खोटं असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

बलवान या भारतीय सैनिकाचे कोर्ट मार्शल करण्यात आले आहे. शत्रूने आपल्या सैनिकांच्या छावणीवर हल्ला केला. त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी हेड ऑफिसला सात वेळा फोन केला पण त्यांचे काहीच उत्तर आले नाही. तो पर्यंत दोन आपले जवान शहीद झाले होते आणि जेव्हा आपल्या एका सैनिकाचा कापलेलं डोकं त्यांच्या हाती बघितलं आणि ते डोकं आपल्या सीमेच्या पार घेऊन जात आहेत, हे जेव्हा आपल्या या सैनिकाने बघितले, तेव्हा त्या सैनिकाला राहवलं नाही. त्याने फेकून दिला हातातील ट्रान्समीटर आणि उचलली बंदूक आणि गेला त्याच्या पाठीमागे आणि परत आला तो दोन शत्रूचे मुंडके हातात घेऊनच. 

मग यात त्याने काय वाईट केलं. एका शिपायाला जे त्यावेळी केलं पाहिजे होत तेच त्यांनी केलय आणि तुम्ही त्याच कोर्ट मार्शल करताय आणि प्रश्न उलट विचारताय की जे तू केलंस त्यांची परवानगी कुणाच्या बापाकडून आणली होती. अरे मी म्हणतो लाज वाटत नाही कशी असे प्रश्न विचारायला?

पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट सुमारे 2800 पेक्षा जास्त वेळा शेयर आणि त्या खाली 10 हजार कमेंट्स आल्या आहेत. 

संपूर्ण पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा फोटो खरंच कोर्ट मार्शल झालेल्या जवानाचा आहे का याची पडताळणी केली. गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो “कोर्ट मार्शल” या नाटकातील आहे.

अनेक लिंकमध्ये हा फोटो ‘कोर्ट मार्शल’ नाटकातील असल्याचे म्हटले आहे. स्वदेश दीपक नामक प्रसिद्ध नाटककाराने हे 1991 साली नाटक लिहिले होते. हिंदी भाषेतील या नाटकाचे आतापर्यंत 4000 पेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत. अनेक लोकप्रिय कलाकारांनी या नाटकात भूमिका वठविलेल्या आहेत. 

एका सैनिकावर वरीष्ठ अधिकाऱ्याचा खून केला म्हणून कोर्ट मार्शलची कारवाई करण्त येते असे या नाटकाचे कथानक आहे. यातून सैन्यातील जातीवादावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

या नाटकाचे दिग्दर्शक अरविंद गौड यांनी 12 फेब्रुवारी 2014 रोजी ट्विट करून नाटकातील फोटोचा गैरवापर करण्याविषयी नाराजी व्यक्ती करीत तसे न करण्याचे आवाहन केले होते. सोबत या नाटकातील फोटोदेखील शेयर केला होता. “कोर्ट मार्शल नाटकातील फोटोद्वारे फेसबुकवर अफवा पसरवू नये,” असे त्यांनी लिहिले होते.

नाटकात मुख्य भूमिका आणि सदरील व्हायरल फोटोमध्ये रडताना दिसणाऱ्या अभिनेत्याचे नाव विरेन बसोया आहे. त्याची मिंट वृत्तपत्राने मुलाखत घेतली होती. खाली दिलेल्या व्हिडियोच्या 19 व्या सेंकदापासून विरेनला पाहू शकता.

आता दोन्ही फोटोंची तुलना केल्यावर स्पष्ट होईल की, हा फोटो विरेन बसोया या अभिनेत्याचाच आहे. याचाच अर्थ की, सदरील फोटोत खरा जवान नसून, तो नाटकातील एक कलाकार आहे. नवभारत टाईम्सनेदेखील 2016 साली या फोटोविषयी माहिती दिली होती.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, ‘कोर्ट मार्शल’ नाटकातील फोटो शेयर करून खऱ्या सैनिकावर भारतीय सैन्याने कारवाई केल्याचा खोटा मेसेज फिरवला जात आहे. पाकिस्तानच्या सैनिकांना मारले म्हणून या सैनिकाला शिक्षा देण्यात आली नव्हती.

Avatar

Title:शत्रुचे मुंडके आणले म्हणून या भारतीय सैनिकाचे कोर्ट मार्शल करण्यात आलेले नाही. हा नाटकातील फोटो आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False