नरेंद्र मोदी यांनी मुकेश अंबानींच्या नातवाला दवाखान्यात जाऊन भेट दिल्याची फोटोसह अफवा व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

भारतील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना नुकताच नातू झाला. अंबानी कुटुंबाच्या या वारसाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर आता दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तर अंबानींचा नातू पाहण्यासाठी चक्क हॉस्पिटलमध्ये गेले. सोबत मोदी व अंबानी दाम्पत्याचा दवाखान्यातील फोटोसुद्धा फिरत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती हा दावा खोटा आढळला. सुमारे सहा वर्षांपूर्वीचा हा जुना फोटो चुकीच्या दाव्यासह पसरविला जात आहे.

काय आहे दावा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुकेश व नीता अंबानी हॉस्पिटलमधील एका रूममध्ये डॉक्टरांशी चर्चा करतानाचा फोटो शेयर करून म्हटले की, “18-18 तास काम करणारे मोदी साहेब एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून 5 स्टार हॉस्पिटलमध्ये अंबानी साहेबांचा नातू जन्मला त्या नातवाला भेटायला गेले. किती ग्रेट माणूस ना..! शेती प्रधान देशाचा शेतकरी एवढ्या कडाक्याच्या थंडीत गेली 17 दिवसांपासून न्याय हक्कासाठी आंदोलन करत बसला आहे ,त्याच्याशी बोलायला मात्र वेळ नाही शेठजीला.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तसेच काहींनी या फोटोसोबत लिहिले की, “भारताचा प्रधानमंत्री राजधानीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जाऊ शकत नाही पण आपल्या मालकाच्या नातवाला बघायला मुंबईत येऊन बघु शकतो… यावरुन शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावे तुम्ही कुणाकडे मागणी करत आहात… हाताची घडी करुन मालका पुढे उभे राहणा-याकडून आपण काय आपेक्षा करु शकतो (अर्काइव्ह)

मग खरंच नरेंद्र मोदी अंबानींच्या नातवाला भेटायला गेल्याचा हा फोटो आहे का?

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम फोटोचे निरीक्षण केल्यावर दिसते की, त्यात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. विद्यासागर राव आहेत. परंतु, सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आहेत. त्यांच्यापूर्वी विद्यासागर राव राज्यपाल होते. म्हणजे हा फोटो नक्कीच जुना असावा.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर ही शंका खरी ठरली. हा फोटो 2014 मधील. इंडिया टुडे वेबसाईटवर 25 ऑक्टोबर 2014 रोजी प्रकाशित झालेल्या बातमीत हा फोटो वापरण्यात आलेला आहे. 

मूळ बातमी – इंडिया टुडेअर्काइव्ह

बातमीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचे उद्घाटन केले होते. त्यावेळी त्यांनी दावाखान्याला भेट दिली तेव्हाचा हा फोटो आहे. या उद्घाटन सोहळ्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.

मुकेश अंबानी यांच्या नातवाचा जन्म 10 डिसेंबर 2020 रोजी झाला. यावरून सिद्ध होते की, सहा वर्षे जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे. 

अशाच पोस्टसोबत, मुकेश अंबानी यांच्या नावे शेतकऱ्यांविषयक एका वादग्रस्त विधानाच्या ट्विटचा स्क्रीनशॉटसुद्धा फोटो शेयर होत आहे. 

या कथित स्क्रीनशॉमध्ये मुकेश अंबानी यांच्या नावासह ट्विट आहे की, काँग्रेस के शासन में किसान भूख से आत्महत्या करते थे, मोदी जी के शासन में किसान 6 महिनों के राशन साथ ले दिल्ली घूम रहे है

हा स्क्रीनशॉट शेयर करून युजर्स म्हणत आहेत की, शेतकऱ्यांविषयी असे बोलणाऱ्या अंबनीच्या नातवाला पंतप्रधान भेटायला गेले.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मुकेश अंबानी यांचे ट्विटर अकाउंटच नाही. त्यांच्या नावावर अनेक फेक अकाउंट तयार झालेले आहेत. 

सदरील स्क्रीनशॉटमध्येच दिसते की, हे अकाउंट एप्रिल 2020 मध्ये सुरू झाले आहे. ते अधिकृतसुद्धा नाही (ब्लू टिक व्हेरिफाईड). अकाउंटच्या बायोमध्ये सहसा नाव कोणी लिहित नाही आणि स्वतःलाच ‘श्री’ वगैरे असेसुद्धा म्हणत नाहीत. 

विशेष म्हणजे मुकेश अंबनींच्या नावावरील विविध फेक अकाउंट्सची बातमीसुद्धा आलेली आहे. म्हणजेच अंबानींच्या नावे खोडसाळपणा करण्यात आला आहे.

मूळ बातमी – साक्षी इंग्लिश 

निष्कर्ष

नरेंद्र मोदी यांनी मुकेश अंबनींच्या नातवाला भेट दिलेली नसून, व्हायरल होत असलेला फोटो 2014 मधील हॉस्पिटल उद्घाटनाचा आहे. तसेच मुकेश अंबानी यांनी शेतकऱ्यांविरोधात कोणतेही विधान केलेले नाही. तो स्क्रीनशॉट मुकेश अंबानी यांच्या नावावरील फेक ट्विटर अकाउंटचा आहे.

Avatar

Title:नरेंद्र मोदी यांनी मुकेश अंबानींच्या नातवाला दवाखान्यात जाऊन भेट दिल्याची फोटोसह अफवा व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •