
हमासच्या संघटनेने इस्रायलवर शनिवारी पहाटेच्या सुमारास मोठा दहशतवादी हल्ला केला.
या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका बहुमजली इमारतीवर हवाई हल्ला होतो आणि ती इमारत कोसळते.
दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ हमासच्या संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्याचा आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नाही. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एका इमारतींवर दोन वेळा हवाई हल्ला होतो आणि ती इमारत कोसळते.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “इस्रायलने फिलिस्तीनींना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. हमासने आज केलेल्या भीषण हल्ल्यामध्ये इस्रायलचे अनेक नागरिक जखमी झाले आहेत, मृत झाले आहेत.”
मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नाही.
न्यूज 5 सेलेव्हंडने 14 मे 2021 रोजी आपल्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर केला होता.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “इस्रायल आणि हमास यांच्यातील वाढत्या संघर्षादरम्यान गाझामधील 14 मजली अल-शोरौक टॉवरवर इस्रायली हवाई हल्ला करून इमारत कोसळताना व्हिडिओमध्ये दिसते.”
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर अल जझीरा न्यूजने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर आकाउंटवर 13 मे 2021 रोजी शेअर केला होता. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हाच तो क्षण आहे जेव्हा गाझा शहरातील मीडिया कार्यालये अर्थात 14 मजली अल-शोरौक टॉवर हल्ला झाला होता. 2021 मध्ये मे महिण्यात अनेक इस्रायली हवाई हल्ले झाल्यामूळे पूर्णपणे नष्ट झाले.”
इस्रायलवरील हल्ला
इस्रायलच्या सीमेवर हमास ही दहशतवादी संघटना आणि इस्रायली लष्करात धुमश्चक्री सुरू आहे. हमासच्या संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी पहाटे इस्रायलवर अचानकपणे हल्ला केला होता. या वेळी हमासने इस्रायलवर 5 हजार स्फोटके डागले होती. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली.
सध्या इस्रायली सैन्याने गाझा पट्टीमध्ये हमासच्या विरोधात ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स सुरू केले आहे. इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, देश ‘युद्धात आहे’
या युद्धात आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धामूळे अमेरिकेच्याही चिंता वाढवल्या आहेत.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 2 वर्षांपूर्वीचा आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील सध्याच्या युद्धाचा नाही. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:इस्रायलने बहुमजली इमारतीवर हवाई हल्ल्याचा केल्याचा व्हिडिओ जुना; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Missing Context
