
सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये राजकीय द्वंद्व रंगले आहे. काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची एका हॉटेलात भेट घेतली होती. या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात येऊ लागले.
अशातच सोशल मीडियावर पोस्ट फिरवल्या जात आहेत की, सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेची उमेदवारी मागे घेतली. काहींनी असेदेखील लिहिले की, त्यांनी प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.
15 एप्रिलला अपलोड केलेल्या या पोस्टमध्ये म्हटले की –
शिंदेंनी घेतली माघार
अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडी घडत आजचा रविवार संपला. कालच्या बाळासाहेब आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीवरून कॉंग्रेसच्या आयटी सेलच्या ट्रोल्सने वंचित बहुजन आघाडीचा कॉंग्रेसला पाठिंबा अशा पोस्टी व्हायरल केल्या होत्या. तसेच वंचित बहुजन आघाडीत उभी फूट अशा बातम्या टिनपाट पाक्षिकांमधे छापून आणल्या होत्या. यावर बाळासाहेबांना प्रतिक्रिया विचारली असताना त्यांचा उद्वेग त्यातून व्यक्त झाला.
दरम्यान या सर्व घडामोडींपासून अनभिज्ञ असलेल्या शिंदेंना बाळासाहेबांची प्रतिक्रिया समजली. तसेच प्रणिती शिंदे यांच्या भाषणाचा काही भाग व्हायरल होऊन प्रचंड नाराजी पसरल्याचे समजल्यावरून शिंदेंनी प्रथम प्रणिती शिंदे यांना कार्यकर्त्यांसमोरच कठोर शब्दात सुनावले. कोण कुठला माणूस असे ज्यांच्याबद्दल तू काल बोललीस ते आपण ज्यांच्यामुळे अन्न खातो त्या बाबासाहेबांचे नातू आहेत याचे तरी विस्मरण होऊ द्यायचे नव्हते. आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी आपल्याकडून अशी गंभीर चूक व्हायला नको होती असे त्यांनी अत्यंत खेदाने सांगितले. आपण पट्टेवाला आणि नंतर अधिकारी बनलो ते केवळ बाबासाहेबांमुळेच. नाहीतर आजही आमचा समाज चामडी कमावतो असे ते म्हणाले. प्रणितीने ते दिवस पाहीलेले नाहीत. तिला कल्पना नाही ही माझी चूक आहे असे ते म्हणाले.
त्यानंतर कॉंग्रेसच्या आयटीसेलने पसरवलेल्या अफवांबाबत ते म्हणाले. की ही सदिच्छा भेट होती. मी त्या पिढीचा प्रतिनिधी आहे ज्या पिढीत वैरभाव ठेवले जात नाही. पण त्या भेटीने जर असे राजकारण केले जात असेल तर हे अतिशय दु:खदायक आहे असे ते म्हणाले. या सर्व प्रकारामुळे व्यथित होऊन त्यांनी उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली. निवडणुका येत असतात आणि जात असतात, मात्र झालेला प्रकार हा बाळासाहेबांच्या मनाला लागला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे.
कॉंग्रेस पक्षाकडून यावर काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
तथ्य पडताळणी
सोलापूर येथे लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी (18 एप्रिल) मतदान होत आहे. मग सुशीलकुमार शिंदे या क्षणी माघार घेऊ शकतात का याची आम्ही पडताळणी केली.
भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेमधील वेळापत्रकानुसार, दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 29 मार्च होती. या तारखेनंतर उमेदवारी अर्ज मागे घेता येणार नाही.

मूळ अधिसूचना येथे वाचा – गॅझेट । अर्काइव्ह
भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच सोमवारी (15 एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारांची यादी (फॉर्म 7-अ) प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आहे. याचाच अर्थ की, सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढवत आहे.

मूळ यादी येथे वाचा – भारतीय निवडणूक आयोग । अर्काइव्ह
सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाषण केले. काँग्रेसची मतं कापून भाजपला फायदा मिळावा अशी सुपारी वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे, अशी त्यांनी टीका यावेळी केली. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचा काही प्रश्नच नाही.

मूळ बातमी येथे वाचा – टीव्ही 9 मराठी । अर्काइव्ह
आम्ही सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीदेखील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख केव्हाच निघून गेल्याचे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी उमेदवारी मागे घेण्याच्या वृत्ताचे खंडन केले.
निष्कर्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (29 मार्च) निघून गेली असून सुशीलकुमार शिंदे यांचे नाव अंतिम उमेदवारी यादीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे वृत्त असत्य आहे.
*****

Title:ELECTION 2019 : सुशीलकुमार शिंदे यांनी खरंच सोलापूर येथून लोकसभा उमेदवारी मागे घेतली का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
