‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ अशा घोषणांचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनातील नाही; वाचा सत्य

False राजकीय

काही युवक पाकिस्तान व खलिस्तान समर्थनार्थ नारेबाजी करत असल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील ही घटना आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती हा दावा खोटा आढळला. सुमारे पाच वर्षांपूर्वीचा हा जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह पसरविला जात आहे.

काय आहे दावा?

‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’, ‘पंजाब बनेगा खालिस्तान’ असे नारेबाजी करणाऱ्या युवकांचा एक व्हिडिओ शेअर करून म्हटले की, “हा पहा कृषी बिलाला विरोध करणारा पंजाबचा युवा शेतकरी काय नारे देत आहे? हयाच शेतकरी कृषी बिलाला शवसेना, राष्टवादी कांग्रेस, आणि कांग्रेस समर्थन देत आहे महाराष्ट्राचे दुर्भाग्य.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

शेतकरी आंदोलनाविषयक चुकीचे दावा करणाऱ्या अनेक पोस्टचे सत्य फॅक्ट क्रेसेंडोने समोर आणलेले आहे. त्यामुळे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ खरंच शेतकरी आंदोलनाशी काही संबंध आहे का हे तपासणे आवश्यक आहे.

त्यानुसार व्हिडिओतील की-फ्रेम्स निवडूण रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हा व्हिडिओ तर 2015 मधील आहे. 

‘काश्मीर पल्स’ नावाच्या एका युट्यूब चॅनेलवर 19 ऑक्टोबर 2015 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ आढळला. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि हा व्हिडिओ एकच आहे.

या व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काश्मीरमधील बारामुल्ला शहरातील आहे. शीख समुदायाचा पवित्रग्रंथ ‘गुरू ग्रंथ साहिब’ची झालेल्या विटंबनेचा निषेध करण्यासाठी या तरुणांनी हे प्रदर्शन केले होते.

अधिक सर्च केल्यावर डेक्कन क्रोनिकल्स वेबसाईटवरील 19 ऑक्टोबर 2015 रोजीची बातमी आढळली. पंजाबमध्ये ‘गुरू ग्रंथ साहिब’चे पाने फाडून एका गुरूद्वारासमोर फेकण्यात आले होते. त्यामुळे क्रोधित झालेल्या शीख समुदायाने विविध ठिकाणी निषेध व्यक्त केला होता.

मूळ बातमी – डेक्कन क्रोनिकल्स | अर्काइव्ह

बारामुल्ला येथेसुद्धा काही तरुणांनी रस्त्यावर उतरून विटंबनेचा निषेध करीत पाकिस्तान समर्थनात नारे लावले होते. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, ‘काश्मीर बनेगा पाकिस्तान’ असे नारे लावल्याचा हा व्हिडिओ शेतकरी आंदोलनातील नाही. तो 2015 मध्ये बारामुल्ला शहरात झालेल्या निषेध प्रदर्शनाचा व्हिडिओ आहे. तो चुकीच्या माहितीसह शेतकरी आंदोलनाशी जोडला जात आहे.

Avatar

Title:‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ अशा घोषणांचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनातील नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False