VIDEO: मराठी माणसाने पेट्रोल दरवाढीबाबत प्रश्न विचारल्यावर मोदींनी त्याला चूप बसविले का?

False राजकीय

इंधन दरवाढीचा ‘शतकी’ वेग पाहता इंटरनेटवर पेट्रोल-डिझेलच्या भावाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक क्लिप सध्या खूप व्हायरल होत आहे. यामध्ये एका मराठी माणसाने त्यांना पेट्रोलबाबत प्रश्न विचारल्यावर ते त्याला मराठीतूनच खाली बसायला सांगतात आणि उत्तर देणे टाळताना दिसतात. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. 

काय आहे दावा?

नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामान्य नागिरकांशी संवाद साधत असतानाची ही क्लिप आहे. यामध्ये मोदी मराठीतून म्हणतात की, “हरीभाई बोला, काय म्हणता.” 

त्यावर एक जण उठतो आणि म्हणतो की, “राम, राम, ते पेट्रोलचे भाव वाढले…”

मोदी लगेच त्याला म्हणतात, “बसा, बसा…”

या क्लिपद्वारे दावा केला जात आहे की, मोदींनी इंधन दरवाढीच्या प्रश्नाला बगल देत प्रश्न विचारणाऱ्याला असे गप्प केले. 

अनेकांनी ही क्लिप गंमत म्हणून शेअर केली तर, काहींनी तिला खरे मानले

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

मोदींनी खरंच प्रश्न विचारणाऱ्याला असे चूप बसविले का, याचा शोध घेतला. त्यासाठी मूळ व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे. 

कीवर्ड्सच्या माध्यमातून ओरिजिनल व्हिडिओ मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 मे 2018 रोजी जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. 

तेव्हा नाशिकमधील हरीभाऊ यांना मोदींना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली होती. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ उपलब्ध आहे.

वरील मूळ व्हिडिओ ऐकल्यावर लगेच कळते की, यामध्ये हरीभाऊ नामक व्यक्तीने मोदींना पेट्रोल दरवाढीविषयी प्रश्न विचारला नव्हता. मुद्रा कर्ज योजनेमुळे त्याला कसा फायदा झाला हे त्याने सांगितले होते. 

तो बोलण्यासाठी उठल्यावर मोदींना त्याला बसूनच बोलण्याची विनंती केली. त्यासाठी ते “बसा, बसा” म्हटले होते. 

हरीभाऊ ठाकूर असे या व्यक्तीचे नाव असून तो मुझ्झफरनगर, यूपी येथून तीस वर्षांपूर्वी नाशिकला स्थायिक झाला होता. तेथे त्याची टपरी होती. मुद्रा योजनेची माहिती मिळवल्यावर त्याने कर्ज घेतले आणि व्यवसाय सुरू केला. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती सुधारली. 

म्हणून त्याला पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. मोदींशी बोलणे झाल्यावर त्याने माध्यमांना प्रतिक्रियासुद्धा दिली होती. ती तुम्ही खाली पाहू शकता. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, नरेंद्र मोदींच्या मूळ व्हिडिओला एटिड करून चुकीच्या माहितीसह पसरविण्यात येत आहे. मूळ व्हिडिओमध्ये हरीभाऊ याने पेट्रोल भाववाढीविषयी प्रश्न विचारला नव्हता. त्याने मुद्रा कर्ज योजनेविषयी संवाद साधला होता.

Avatar

Title:मराठी माणसाने पेट्रोल दरवाढीबाबत प्रश्न विचारल्यावर मोदींनी त्याला चूप बसविले का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Altered