
काही दिवसांपासून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, रिझर्व्ह बँकेतर्फे 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा मार्च ते एप्रिल दरम्यान चलनातून बंद करण्यात येणार आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉट्सअॅपवर हेल्पलाईनवर (9049053770) शेअर करीत सत्यतेबाबत विचारणा केली.
पडताळणीअंती कळाले की, रिझर्व्ह बँकेने हा दावा फेटाळून लावला आहे.
काय आहे दावा?
सोशल मीडियावर 5, 10 आणि 100 रुपयांचा फोटो शेयर करीत सोबत दावा केला जात आहे की, “मार्च – एप्रिल महिन्यांपर्यंत 100, 10 आणि 5 रूपयांच्या जुन्या सिरीजच्या नोटा बंद होणार आहे. आरबीयकडून बँकांना तसे आदेश देण्यात आल्याचे समजते आहे.”
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम नोटबंदीसंदर्भात कोणती बातमी प्रकाशीत झाली आहे का याचा शोध घेतला. त्यानुसार टीव्ही 9 ने प्रकाशित केलेली बातमी आढऴली. बातमीनुसार, एप्रिल 2021 पर्यंत 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटांचे चलन बंद करण्याच्या विचारात आहे. मात्र त्यासाठी जुन्या नोटा बदलवून घेण्याची अंतिम तारिख अद्याप सांगण्यात आलेली नाही.
या नंतर अधिक शोध घेतल्यास ट्विटरवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 25 जानेवारी 2021 रोजी केलेले ट्विट आढळले. त्यात त्यांनी वरील घटना स्पष्ट करीत सांगितले की, 5,10 आणि 100 च्या नोटा परत घेण्यात येणार आहे, असे प्रकाशित झालेले रिपोर्ट खोटे आहे. त्यांचे अधिकृत ट्विट खाली दिले आहे.
अधिक शोध घेतल्यावर पत्र व सूचना कार्यालयाने (पीआयबी) 24 जानेवारी 2021 रोजी केलेल्या ट्विटमध्ये वरील दावा फेटाळत स्पष्ट केले की, रिझर्व्ह बँकने 5, 10 किंवा 100 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केलेली नाही. ‘पीआयबी’ने केलेले ट्विट खाली पाहू शकता.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा बंद होणार नाहीत. रिझर्व्ह बँकने व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Title:RBI 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा बंद करणार आहे का? वाचा सत्य
Fact Check By: Milina PatilResult: False
