SBI च्या वायफाय कार्डमधून तुमच्या न कळत सगळे पैसै चोरी होऊ शकतात का? वाचा सत्य

False

रोखी व्यवहारांऐवजी ऑनलाईन व्यवहार करण्यावर सध्या जोर दिला जात आहे. अशावेळी सरकार आणि बँकांतर्फे ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान राहण्याचेही आवाहन केले जाते, सुरक्षेचे उपाय सांगितले जातात. मात्र, ऑनलाईन बँकिंग फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत असताना ऑनलाईन किंवा कार्ड पेमेंटविषयी लोकांच्या मनात अनेक शंका असतात.

यात आता आणखी एकाची भर पडली आहे. सोशल मीडियावर सध्या एसबीआयच्या वायफाय कार्डविषयीचा एक व्हिडियो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडियोत दावा केला जात आहे की या कार्डद्वारे पिन नंबर न टाकता ग्राहकांच्या खात्यातून कितीही पैसे काढता येतात. त्यामुळे असे कार्ड बँकेला परत देण्याचे किंवा ब्लॉक करण्याचा सल्ला यामध्ये दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा व्हिडियो पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

काय आहे व्हिडियोमध्ये?

प्रकाश पाटील नामक एक व्यक्ती व्हिडियोत बोलत आहे. एका दुकानात एसबीआयच्या वायफाय कार्डद्वारे 10 रुपयांचे ट्रानजॅक्शन करून तो सांगतो की, स्वाईप मशीनवर (POS) केवळ कार्ड धरले असता त्याच्या खात्यातून पैसे कमी झाले. ना कार्ड स्वाईप केले ना, ना पीन क्रमांक विचारला. थेट पेमेंट झाले. त्यामुळे अशा वायफाय कार्डमधून पीन क्रमांकाशिवाय पैसै काढतात येतात. “तुमच्या डेबिट/क्रेडेट कार्डवर असे वायफायचे चिन्ह असेल ते लवकरात लवकर बँकेला परत करा. किंवा ते ब्लॉक करून टाका. अन्यथा तुमच्या खात्यातून सगळे पैसे जाऊ शकतात”, असे म्हणून व्हिडियो संपतो.

फेसबुकवर हा व्हिडियो मोठ्याप्रमाणावर शेयर केला जात आहे.

तथ्य पडताळणी

सामान्यतः कार्ड पेमेंट करताना आपण पॉस मशीनमध्ये कार्ड स्वाईप किंवा इनसर्ट करतो. त्यानंतर हवी असलेली रक्कम नमूद केल्यावर चार अंकी पासवर्ड (PIN) विचारला जातो. तो टाकल्यावर ट्रानजॅक्शन पूर्ण होते. हा चार अंकी पिन किंवा कार्डच्या मागील बाजूस असलेला तीन अंकी सीव्हीव्ही क्रमांक कोणालाही न सांगण्याची सूचना केली जाते.

परंतु, वायफाय कार्डद्वारे पेमेंट करताना चार अंकी पिन न विचरता पैस डिडक्ट होत असतील तर नक्कीच आश्चर्य वाटू शकते. सर्वप्रथम हे वायफाय कार्ड आहे ते समजून घेऊया. 

CONTACTLESS CARD म्हणजेच WiFi CARD

सामान्य भाषेत ज्याला वायफाय कार्ड म्हणतात मूळात त्याचे नाव ‘कॉन्टॅक्टलेस कार्ड’ असे आहे. तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर जर वायफायचे चिन्ह असेल तर तुमचे कार्ड Contactless Card आहे, असे समजावे. एसबीआयने 2015 साली सर्वप्रथम कॉन्टॅक्टलेस कार्ड बाजारात आणले होते. Visa आणि MasterCard या दोन कंपन्यांमार्फत ते तयार करण्यात येते.

कॉन्टॅक्टलेस कार्ड कसे काम करते?

पेमेंट करताना पॉस मशीमध्ये हे कार्ड स्वाईप किंवा इनसर्ट करण्याची गरज नाही. खरेदी केल्यानंतर जेवढे बिल झाले तेवढी रक्कम पॉस मशीनमध्ये टाकायची. मग मशीनजवळ हे कार्ड न्यायचे आणि टॅप करायचे. बस्स! पिन न टाकता आपोआप पेमेंट होऊन जाते. मशीनवर पेमेंट झाल्याचे दिसते.

याचा फायदा काय?

वेळीची बचत. दुकानात किंवा इतर ठिकाणी पेमेंट करताना स्वाईप आणि पिन टाकण्याच्या फंद्यात न पडता सरळ कार्ड टॅप करायचे. शिवाय कार्ड तुमच्या हातातच राहत असल्यामुळे ते दुसऱ्या कोणाकडे देण्याचा धोका नाही.

पण हे सुरक्षित आहे का?

एसबीआयच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, हे कार्ड पूर्णतः सुरक्षित आहे. कॉन्टॅक्टलेस कार्डमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीवर आधारित चीप आहे. जेव्हा पॉस मशीनवर कार्ड टॅप करतो तेव्हा NFC तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ट्रानजॅक्शन डिटेल्स व कार्डच्या माहितीची देवाणघेवाण होते. त्यानंतर पेमेंट प्रक्रिया अत्यंत सुरक्षितरीत्या पूर्ण होते. प्रत्येक ट्रानजॅक्शनला एक युनिक आयडेंटीफिकेशन कोड निर्माण होतो. यामुळे एकच ट्रानजॅक्शन रिपीट होत नाही.

कॉन्टॅक्टलेस कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी ते पॉस मशीन जवळ 4 सेंटीमीटर अंतरापर्यंत न्यावे लागते. त्यापेक्षा दूर धरले तर ते काम करत नाही. तसेच एका विशिष्ट पोझिशनमध्ये ते धरावे लागते. त्यामुळे आसपास पॉस मशीन असली तरी वायाफायद्वारे कनेक्ट होऊन तुमचे पैसे जाणार नाहीत. समजा कोणी मशीन तुमच्या खिशावजवळ घेऊन आले तरी पेमेंट होणार नाही.

पिन नंबर न टाकता तुम्ही केवळ 2 हजार रुपयांपर्यंतच पेमेंट करू शकता. दोन हजारांपेक्षा अधिक रक्कम द्यायची असल्यास सामान्य कार्डप्रमाणे तुम्हाला पिन नंबर टाकावा लागेल. तसेच केवळ टॅप करून तुम्ही दिवसातून फक्त पाच वेळेसच पेमेंट करू शकता. म्हणजे एकुण मर्यादा 10 हजार रुपयांची आहे.

याविषयी अधिक येथे वाचा – SBI Contactless CardMasterCard Contactless Card

मग व्हायरल व्हिडियोतील दाव्यामध्ये कितपत सत्यता आहे?

वरील माहितीवरून दिसून येते की, व्हायरल व्हिडियोमध्ये कारण्यात आलेला दावा अतार्किक आहे. एका वेळेला केवळ 2 हजारांपर्यंतच पेमेंट आणि ते देखील दिवसातून पाचच वेळा करता येते. त्यामुळे जर कोणी तुमचे कार्ड चोरी केले किंवा न कळत घेऊन गेले तर ते पहिल्या वेळेला दोन हजार रुपयांपर्यंत ट्रानजॅक्शन करू शकतात. त्यानंतर तुम्हाला मेसेज येईल. यावरून तुम्हाला कळेल की, तुमचे कार्ड कोणी तरी वापरले आहे. तेव्हा लगेच फोन करून तुम्ही कार्ड ब्लॉक करू शकता. तसेच एका मागून एक जर ट्रानजॅक्शन करण्याचा प्रयत्न केला तर पिन विचारण्यात येतो. त्यामुळे अधिक नुकसान होण्याचा धोका टळतो.

सविस्तर येथे वाचा – Axis Bank Contactless Cards

हरवलेल्या किंवा चोरी गेलेल्या कॉर्डचा वापर करून झालेले नुकसान अनेक बँकांतर्फे भरून देण्यात येते. कार्ड चोरी/हरवल्याची माहिती तात्काळ बँकेला दिली तर काही बँका जितके पैस काढले तितके परत देतात. यासंबंधी आपल्या बँकेला तुम्ही विचारू शकता.

कार्ड वापरण्यासाठी अधिकृत पॉस मशीन गरजेची आहे. बँकेकडे नोंदणीकृत व्यापाऱ्यांनाच या मशीन देण्यात येतात व त्यासाठी फीदेखील वसूल करण्यात येते. त्यामुळे कार्ड कोठे वापरण्यात आले याचा माहिती मिळेल. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून, बँक स्टेटमेंटची नियमित तपासणी करावी.

हे कार्ड वापरून कोणी तुमच्या बँक डिटेल्स हॅक नाही करू शकत. तसेच ऑनलाईन व्यवहारासाठी वापरताना पिन क्रमांक आवश्यक आहे. याचाच अर्थ की, कॉन्टॅक्टलेस कार्ड म्हणजे चोरांसाठी नंदनवनच असा तर्क लावणे चुकीचे आहेत. इतर कार्डप्रमाणेच हे कार्ड वापरताना काळजी घ्यावी लागते. आणि विचार केला तर कळेल की, हे कार्ड वापरून जर खरंच एवढे नुकसान होऊ शकत असते तर बँकांनी ते वापरले असते का?

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानेसुद्धा (NPCI) गेल्यावर्षी रुपे कॉन्टॅक्टलेस कार्ड बाजारात आणले. यावरून लक्षात येईल की, कॉन्टॅक्टलेस कार्ड आधुनिक आर्थिक व्यवहारातील पुढचे पाऊल आहे. जसे जसे तंत्रज्ञान विकसित होत आहे तसे डिजिटल पेमेंटच्या पद्धतीसुद्धा बदलत आहेत. केवळ आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे.

निष्कर्ष

कॉन्टॅक्टलेस कार्डचा वापर करून कोणीही तुमचा पिन माहित नसताना खात्यातून सगळे पैसे काढून तुमची फसवणूक करू शकतो, हा दावा करणे म्हणजे अतिशयोक्ती आहे. डिजिटल पेमेंट करण्यासाठी कॉन्टॅक्टलेस कार्ड किंवा वायफाय कार्ड एक सुरक्षित पर्याय आहे. हे कार्ड वापरून तुम्ही एका वेळेला केवळ 2000 रुपयांपर्यंतच पिन न टाकता ट्रानजॅक्शन करू शकता. त्यामुळे पिन न टाकता कोणीही कितीही पैसे काढू शकतो हा दावा खोटा आहे.

Avatar

Title:SBI च्या वायफाय कार्डमधून तुमच्या न कळत सगळे पैसै चोरी होऊ शकतात का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False