फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय? वाचा त्यामागचे सत्य

Partly False आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

फ्रान्समध्ये सध्या धार्मिक तेढ व संतापाचे वातावरण आहे. अशातच सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की, तेथील सरकारने सम्राट अशोक यांच्या सन्मानार्थ फ्रान्समध्ये अशोक स्तंभाची उभारणी केली आहे. या कथित स्मारकाची काही छायाचित्रेसुद्धा व्हायरल होत आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आणि त्यासोबत करण्यात येणारा दावा आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठविला आणि त्यांची पडताळणी करण्याची विनंती केली.

आम्ही केलेल्या पडताळणीअंती असे लक्षात आले की, हे फोटो फ्रान्समधील स्मारकाचेच आहेत; परंतु दोन वर्षांपूर्वी भारत सरकारनेच हे स्मारक तेथे उभारले होते.

काय आहे दावा

भारताचे राष्ट्रचिन्ह असणाऱ्या अशोकस्तंभाच्या सिंहचतुर्मुख शीर्षाचे स्मारक उभारतानाचे फोटो शेयर करून कॅप्शन दिली की, फ्रान्स या देशाने अभिमानाने स्थापन केला सम्राट अशोकांचा अशोकस्तंभ

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह | फेसबुकआर्काइव- 1 | आर्काइव- 2 

तथ्य पडताळणी 

फ्रान्स सरकारने कधी आणि कुठे हे स्मारक उभारले याचा शोध घेतला. विविध की-वर्ड्सद्वारे शोधले असता आकाशवाणीने (AIR) 2018 मध्ये शेयर केलेले फोटो आढळले. त्यात म्हटले की, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी फ्रान्समधील Villers-Guislain येथे 10 नोव्हेंबर 2018 रोजी युद्धस्मारकाचे अनावरण केले होते. 

परराष्ट्र मंत्रालयाचे संपर्कअधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनीदेखील या स्मारकाचे फोटो शेयर करून हीच माहिती दिली होती. सोबत म्हटले की, पहिल्या महायुद्धात बलिदान दिलेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे स्मारक उभारण्यात आले.

ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ फ्रान्समधील Villers-Guislain येथे हे युद्धस्मारक उभारण्यात आले होते. या स्मारकाची उभारणी भारत सरकारनेच केली, असे ट्विटमध्ये स्पष्ट म्हटले आहे.  

लोकसत्ताच्या बातमीनुसार, ब्रिटिश सैन्यातून लढताना हौतात्म्य आलेल्या भारतीय सैनिकांना फ्रान्समधील वेगवेगळ्या स्मशानभूमींमध्ये दफन केलेले आहे. फ्रान्सच्या भूमीत चिरनिद्रा घेत असलेल्या भारतीय सैनिकांचे 57 ठिकाणी पुतळे उभारण्याच्या प्रकल्पाला हाती घेण्यात आल्याचे कर्नल (निवृत्त) दीपक दहिया यांनी माहिती दिली होती.

अर्काइव्ह

‘द हिंदू’च्या बातमीनुसार, पहिल्या महायुद्धाच्या शतकपूर्तीनिमित्त 2018 मध्ये भारत सरकारने फ्रान्समध्ये हे युद्ध स्मारक उभारले होते. या युद्धात फ्रान्समध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या सन्मानार्थ भारताचे राष्ट्रचिन्ह (सिंहचतुर्मुख शीर्ष) असलेले हे असणारे स्मारक स्थापन करण्यात आले, अशी माहिती निवृत्त स्क्वॉड्रन लीडर राणा टी. एस. छिना यांनी दिली होती.

मूळ बातमी – The Hindu | आर्काइव 

1 ऑगस्ट 1914 रोजी साली पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. मित्र राष्ट्रांच्या मदतीसाठी या महायुद्धात ब्रिटिश फौजांकडून भारताच्या 15 लाख सैनिकांनी सहभाग घेतला होता. यापैकी 13 लाख सैनिक तर विदेशी भूमीवरील युद्धात सामील होते. चार वर्षाअंती 11 नोव्हेंबर 1918 रोजी महायुद्ध संपले. यात सुमारे 72 हजार भारतीय सैनिकां वीरगती प्राप्त झाली होती. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भारत सरकारने दोन वर्षांपूर्वी हे युद्धस्मारक बांधले. फ्रान्समधील हे स्मारक पॅरिसपासून 200 किमी दूर आहे. खाली दिलेल्या गुगल मॅपमध्ये ते पाहू शकता.

मूळ लिंक – गुगल मॅप्स

अशोकस्तंभ म्हणजे काय?

सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश ह्यांच्या संदर्भात दिलेल्या आज्ञा ज्या दगडी आरसपानी स्तंभांवर कोरून ठेवलेल्या आहेत,  त्यांना ‘अशोकस्तंभ’ म्हणतात. सर्व अशोकस्तंभांत सारनाथ येथील स्तंभास सांस्कृतिक व कलात्मकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे. हा स्तंभ अशोकाने मृगदाव येथे उभारला होता. सातव्या शतकानंतर केव्हा तरी तो उद्‌ध्वस्त केला गेला असावा; कारण 1905 मध्ये केलेल्या उत्खननात पुरातत्त्वसंशोधन विभागास त्याचे फक्त स्तंभशीर्षच सापडले. भारताने पहिल्या प्रजासत्ताकदिनी (26 जानेवारी 1950) हेच स्तंभशीर्ष राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, फ्रान्समधील अशोकस्तंभाची म्हणून शेयर होणारी छायाचित्रे मुळात एक भारतीय युद्धस्मारक आहे. पहिल्या महायुद्धात हौतात्म्य आलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भारत सरकारतर्फे फ्रान्समध्ये हे स्मारक उभारण्यात आले होते. भारताचे राष्ट्रचिन्ह (सिंहचतुर्मुख शीर्ष) असे या स्मारकाचे स्वरूप आहे. त्यामुळे या फोटोंसंदर्भात ‘फ्रान्स सराकरने अशोकस्तंभ उभारला’ हे विधान चुकीची ठरते. ते मुळात भारतानेच बांधलेले स्मारक आहे.

Avatar

Title:फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय? वाचा त्यामागचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Partly False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •