हे फ्रान्समधील नव्या प्रकारचे झेब्रा क्रॉसिंग नाही. ती कॅनडामधील फक्त जाहिरात आहे. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

केवळ भारतातच नाही तर रस्ता सुरक्षेचा मुद्दा संपूर्ण जगात गंभीर आहे. विदेशातही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेफिकीर चालकांची समस्या डोकेदुखी ठरत आहे. म्हणून तर लोकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकार व सामाजिक संस्थांतर्फे उपक्रम चालविले जातात. अशीच एक मोहीम कॅनडामधील क्युबेक नावाच्या प्रोव्हिन्समध्ये राबविण्यात आली. त्यासाठी एक जाहिरातही तयार करण्यात आली जी चर्चेचा विषय ठरत आहे. परंतु, या व्हिडियोतील मूळ संदेश राहिला बाजूला आणि लोक त्यातून वेगळाच अर्थ काढत आहे.

पादचाऱ्यांनी रस्ता ओलंडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे अपेक्षित आहे. परंतु, चालक झेब्रा क्रॉसिंगपाशी वाहन थांबवित नसल्यामुळे रस्ता ओलंडताना अनेक अपघात होता. याला रोखण्यासाठी फ्रान्समध्ये नव्या प्रकारची झेब्रा क्रॉसिंग सिस्टिम आल्याचा दावा केला जात आहे. एका मिनिटांच्या व्हिडियोत दिसते की, झेब्रा क्रॉसिंगवर पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असून गाडी आल्यावर त्या उभ्या राहतात आणि रस्ता बंद होतो व पादचाऱ्यांना रस्ता ओलंडण्यासाठी वेळ दिला जातो. अशा पद्धतीचे झेब्रा क्रॉसिंग भारतातही असावी अशी इच्छादेखील अनेक युजर्सने व्यक्त केली. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियो नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी की-फ्रेम्स निवडूण गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा कळाले की, हा व्हिडियो फ्रान्समधील नाही. हा व्हिडियो कॅनडामधील क्युबेक नावाच्या प्रोव्हिन्स मधील आहे. तेथील सरकारने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना होणाऱ्या त्रासाविषयी चालकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी एक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याअंतर्गत ही जाहिरात तयार करण्यात आली होती.

सविस्तर येथे वाचा – एक्सप्रेस अँड स्टारयाहू न्यूज

बातमीतील माहितीनुसार, कॅनडातील क्युबेक ऑटोमोबाईल इन्शुअरन्स कॉर्पोरेशन (SAAQ) नामक कंपनीतर्फे ऑक्टोबर महिन्यात पादचारी सुरक्षा अभियान चालविण्यात आले होते. त्याअंतर्गत विविध जाहिराती तयार करण्यात आल्या होत्या. त्यातीलच ही एक आहे. क्रॉसिंगवरील पट्ट्या जेव्हा उभ्या राहतात त्यावर फ्रेंच भाषेतून एक संदेश लिहिलेला दिसतो. त्यांचे भाषांतर असे – पादचाऱ्यांना रस्ता ओलंडण्यासाठीची ही जागा आहे. प्रतिक्षा केल्याबद्दल धन्यवाद. कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवरून ही जाहिरात शेयर करण्यात आलेली आहे.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकयुट्यूबट्विटर

सोशल मीडियावर जेव्हा लोकांनी अशा प्रकारचे झेब्रा क्रॉसिंग किती सुरक्षित आहेत याविषयी प्रश्न उपस्थित केले तेव्हा ‘साक’ कंपनीने खुलास केला की, हे खरे क्रॉसिंग नाहीत. केवळ जाहिरातीमध्ये ते वापरण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पादचाऱ्यांना रस्ता ओलंडताना प्राधान्य द्यावे हा संदेश देण्यासाठी उभे राहणारे झेब्रा क्रॉसिंग या जाहिरातीमध्ये वापरण्यात आले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, जाहिरातीमध्ये दिसणारे झेब्रा क्रॉसिंग खरे नाहीत.

मूळ ट्विट येथे पाहा – ट्विटर

निष्कर्ष

नव्या प्रकारचे झेब्रॉ क्रॉसिंग दाखवणारा व्हिडियो फ्रान्समधील नाही. कॅनडामधील क्युबेक येथील एका विमा कंपनीने रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत तयार केलेली ती जाहिरात आहे. हे खरे क्रॉसिंग नाहीत. वाहनचालकांनी पादचाऱ्यांना रस्ता ओलंडताना प्राधान्य द्यावे हा संदेश देण्यासाठी उभे राहणारे झेब्रा क्रॉसिंग या जाहिरातीमध्ये वापरण्यात आले आहेत.

Avatar

Title:हे फ्रान्समधील नव्या प्रकारचे झेब्रा क्रॉसिंग नाही. ती कॅनडामधील फक्त जाहिरात आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •