पुण्यात मोदींच्या प्रचारसभेसाठी झाडे तोडण्यात आली. सभा काही तासांची, पण वर्षानुवर्षे उभी असलेल्या झाडांचा काही वेळात फडश्या पाडण्यात आला, अशी माहिती Being Hindu या पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी

पुण्यात नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेसाठी झाडे तोडण्यात आली का? याबाबत वृत्तपत्रात बातम्या आल्या का, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला दैनिक सकाळने 15 ऑक्टोबर 2019 रोजी प्रसिध्द केलेले खालील वृत्त दिसून आले. 

Archive

दैनिक लोकसत्ताच्या संकेतस्थळावरही 15 ऑक्टोबर 2019 रोजी याबाबतचे वृत्त प्रसिध्द करण्यात आल्याचे दिसून येते. नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात झाडांची कत्तल, एसपी कॉलेजच्या आवारातील झाडांवर कुऱ्हाड असे या वृत्ताच्या शीर्षकात म्हटले आहे. 

Archive

वृक्षतोडीच्या या घटनेवर काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी पुणे महापालिकेकडे तक्रार केल्याचे द इंडियन एक्स्प्रेसने 16 ऑक्टोबर 2019 रोजी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

विविध राजकीय पक्षांकडून आणि पर्यावरणवाद्यांकडून टीका करण्यात आल्यानंतर पुणे महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी आशिष महाडदळकर यांनी फॅक्ट क्रेसेंडोशी बोलताना स्पष्ट केले की, “पुण्यातील टिळक रस्त्यावर झाड पडून ‘पीएमपी’ बसचालकाचा मृत्यू झाल्याने महाविद्यालयीन व्यवस्थापनाने वृक्ष छाटणीची परवानगी मागितली होती. तेथील गरज ओळखून तातडीने परवानगी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मैदानावर फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झाडाच्या फाद्या छाटण्यास परवानगी देण्यात आली होती. याठिकाणी यापूर्वीच 4 वृक्षाच्या फांद्या पडल्या होत्या. या ठिकाणी असलेली सुबाभळीची झाडेही कुमकुवत झाली होती. पुण्यात आलेल्या महापुराचा आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा, मनुष्यहानीचाही आम्ही विचार केला. टिळक रस्त्यावरील झाड पडून घडलेल्या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने परवानगी देण्यात आली. मैदानावरील झाडे कापण्यात आली नाहीत, तर ती छाटली आहेत. याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली आहे.” दैनिक सकाळनेही याबाबतचे वृत्त दिनांक 16 ऑक्टोबर 2019 रोजी प्रसिध्द केले आहे.

स. प. महाविद्यालयाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि भाजप नेते उज्जवल केसकर यांच्याशी आम्ही याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही झाडे धोकादायक असल्याने ती तोडण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर या धोकादायक झाडांची छाटणी संस्थेने केली आहे. या छाटणीचा आणि नरेंद्र मोदी यांच्या सभेचा कोणताही संबंध नाही. वृक्ष छाटणी करण्यात आलेले ठिकाण आणि सभेचा मांडव परस्परापासून दूर आहे.

निष्कर्ष

पुण्यातील स. प. महाविद्यालयातील वृक्ष छाटणी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करण्यात आलेली नाही, असे पुणे महापालिकेने आणि स. प. महाविद्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. वृक्षांच्या फांद्याची छाटणी करण्यात आल्याची बाब मात्र सत्य आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी ही पोस्ट अर्धसत्य आणि संमिश्र स्वरुपाची आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी झाडे तोडण्यात आली का?

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: Mixture